पालखीच्या पुणे मुक्कामात
पोलिसांकडून अडवणूक नको
संत तुकाराम महाराज सोहळ्याचे सोहळाप्रमुख माणिक महाराज मोरे यांची मागणी
देहू, ता. २१ : आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा देहूतून पंढरपूरकडे २८ जूनला प्रस्थान ठेवणार आहे. पुण्यात नाना पेठेतील निवडुंग्या विठ्ठल मंदिरात पालखी सोहळा दोन दिवस मुक्कामी असतो. या काळात संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने काही भाविकांना दर्शनासाठी पास दिले जातात. मात्र, पास दाखवूनही पोलिस त्यांना दर्शनासाठी सोडत नाहीत. तसेच संस्थानचे पदाधिकारी, सेवेकरी यांनाही मंदिरात प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे दर्शन पास असणाऱ्यांना पोलिसांनी अडवू नये. अन्यथा, पालखी सोहळा भाविकांच्या दर्शनासाठी मंदिरात ठेवण्याऐवजी रस्त्यावरच ठेऊ, अशी भूमिका संत तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रमुख माणिक महाराज मोरे यांनी मंगळवारी (ता. २१) घेतली.
हवेलीचे प्रांताधिकारी संजय असवले यांच्या अध्यक्षतेखाली पालखी सोहळ्याच्या तयारीबाबत आढावा बैठक घेण्यात आली. संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख संतोष महाराज मोरे, विश्वस्त संजय महाराज मोरे, अजित महाराज मोरे, पिंपरी चिंचवडचे अप्पर तहसीलदार जयराज देशमुख, नायब तहसीलदार प्रवीण ढमाले, मुख्याधिकारी निवेदिता घार्गे, मंडलाधिकारी दिनेश नरवडे, तलाठी संजय काळे उपस्थित होते.
असवले म्हणाले, ‘‘संस्थानच्या विविध मागण्यांची पूर्तता जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात येईल. इंद्रायणी नदीतील जलपर्णी काढण्यासाठी पिंपरी-चिंचवडच्या आयुक्तांची मदत घेण्यात येईल. सरकारच्या वतीने पुरविण्यात येणाऱ्या स्वच्छतागृहांची देखभाल जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडे देण्यात येईल. लोणी येथील पालखी तळ मुक्कामाच्या ठिकाणी विविध सोयीसुविधा पुरविण्यासाठी काम सुरू आहे.
बैठकीतील अन्य मागण्या
- इंद्रायणी नदीतील जलपर्णी काढावी
- पालखी मार्गावरील खड्डे बुजवावेत
- पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात महिलांसाठी स्वच्छतागृहांची संख्या वाढवावी
- गायरानात दिंड्यांना जागा उपलब्ध करून द्यावी
- देहू ते उरुळी कांचनपर्यत पालखी मार्गाची पाहणी करावी
- लोणी येथील नव्याने केलेल्या पालखी तळावर सोयीसुविधा मिळाव्यात
- आकुर्डी येथील पालखी मुक्कामाची जागा अरुंद असल्याने योग्य नियोजन करावे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.