पिंपरी, ता. २२ ः माई बालभवन आणि इंडियन ब्लाईंड फुटबॉल फेडरेशन (आयबीएफएफ)च्यावतीने देहूरोड येथे आयोजित राष्ट्रीय दृष्टिहीनांच्या फुटबॉल स्पर्धेमध्ये महिला गटात यजमान महाराष्ट्र संघाने उपविजेतेपद मिळविले. तर पुरुष गटात दिल्लीचा संघ विजेता ठरला.
स्पर्धेचे उद्घाटन पहिले सुवर्णपदक विजेते पॅरॉलिंपिक जलतरणपटू मुरलीकांत पेटकर यांच्या हस्ते झाले.
माई बाल भवन संस्थेच्या संस्थापिका दिवंगत प्रतिज्ञा देशपांडे-इंगळे आणि दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या स्मरणार्थ ही पुरुषांची आठवी तर महिलांची चौथी राष्ट्रीय स्पर्धा भरवण्यात आली. स्पर्धेचे महिला गटातील पुरस्कारांचे वितरण अर्जुन पुरस्कार विजेत्या शकुंतला खटावकर (कबड्डी), रेखा भिडे (हॉकी) यांच्या हस्ते तर पुरुष गटातील पुरस्कारांचे वितरण संजय शेठ यांच्या हस्ते झाले.
महिलांच्या गटातील अंतिम सामना यजमान महाराष्ट्र आणि हरियाणा संघांत झाला. निर्धारित वेळेत दोन्ही संघ गोलशून्य बरोबरीत राहिले. त्यामुळे, सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये खेळविला गेला. त्यामध्ये, हरियाणा संघाने विजेतेपद मिळविले. संपूर्ण स्पर्धेत महाराष्ट्राची कर्णधार स्वाती माने, कोमल गायकवाड यांनी उत्कृष्ट कामगिरी नोंदविली. कोमल हिने ६ गोल नोंदविले. तिला उत्कृष्ट खेळाडू, स्वाती माने हिला उत्कृष्ट उदयोन्मुख खेळाडू आणि हरियाणाची पूजा हिला स्पर्धेची मानकरी म्हणून गौरविण्यात आले.
पुरुष गटातील अंतिम लढत दिल्ली विरुद्ध उत्तराखंड यांच्यात झाली. त्यामध्ये दिल्ली संघाने १-० असा विजय मिळविला. स्पर्धेतील उदयोन्मुख खेळाडू म्हणून मेघालयाचा जॉन इमर्गिन, उत्कृष्ट गोलरक्षक म्हणून आदित्य सजवान (उत्तराखंड), उत्कृष्ट खेळाडू कलिंगसन डी. (मेघालय) तर प्रदीप पटेल याला स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूचा बहुमान मिळाला. स्पर्धेचे संयोजन रुचिरा इंगळे यांनी केले. शुभम काटकर, शैलेश बराटे, प्रवीण देशपांडे, मंगेश भोसले, महेंद्र गायकवाड आदींचे मोलाचे सहकार्य लाभले.
PNE24U57446
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.