पिंपरी, ता. ९ : ‘ट्रॅफिकमुक्त चाकण कृती समिती’ने गुरुवारी (ता. ९) पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) कार्यालयावर मोर्चा काढला. या पार्श्वभूमीवर ‘पीएमआरडीए’ने ‘एनएचआय’, ‘एमआयडीसी’, ‘एमएसआयडीसी’ (महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळ), ‘पीडब्लूडी’ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. या अधिकाऱ्यांनी चाकणची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी बाह्यवळण मार्गांसह अन्य उपाययोजनांची माहिती दिली. या बैठकीमुळे ‘चाकणची वाहतूक कोंडी’ निर्णायक वळणावर आल्याचे बोलले जात आहे.
चाकण येथील वाहतूक कोंडी, औद्योगिक क्षेत्रातील समस्या, पुणे-नाशिक उन्नत मार्ग, तळेगाव-चाकण उन्नत मार्ग, चाकण-शिक्रापूर महामार्गाचे रुंदीकरण व बाह्यवळण मार्गांची कामे प्रलंबित आहेत. कोंडी सोडविण्यासाठी नवीन महामार्ग, चौकांचा विकास, महामार्ग रुंदीकरण केले जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सप्टेंबरमध्ये चाकण परिसराची पाहणी केल्यानंतर समन्वयक म्हणून ‘पीएमआरडीए’ची नियुक्ती केली. मात्र, त्यानंतरही केवळ बैठका आणि कागदी घोडे नाचविण्याशिवाय काहीही न झाल्याचा आरोप करत नागरिकांनी मोर्चा काढला. या नंतर कृती समितीसोबत ‘पीएमआरडीए’ आयुक्त डॉ. योगेश म्हसे, मुख्य अभियंता रिनाज पठाण, राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संचालक संजय कदम, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडाळाचे मुख्य अभियंता कालिदास भांडेकर, अधीक्षक अभियंता नीलेश मोढवे, कार्यकारी अभियंता प्रकाश भडंगे, ‘एमएसआयडीसी’ अधीक्षक अभियंता संजय मुलगीलवार, चाकण नगर परिषदेचे सीओ अंकुश जाधव, ‘पीडब्लूडी’चे वरिष्ठ अभियंता भारतकुमार बाविस्कर यांच्यासह खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार बाबाजी काळे उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी शिष्टमंडळ आणि लोकप्रतिनिधींना निविदा प्रक्रिया, जमीन अधिग्रहणासह विविध टप्प्यांवर सुरू असलेल्या कामांची माहिती देत वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिलेली आश्वासने
- नाशिक फाटा ते राजगुरुनगर उन्नत मार्गासाठी निविदा मागविल्या असून, प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी सहा महिने लागणार आहेत. साधारणतः एप्रिलपर्यंत हे काम सुरू होण्याची शक्यता.
- उन्नत मार्गासाठी अतिरिक्त १४.१ हेक्टर जमीन आवश्यक असून यापैकी १०.२३ हेक्टर ‘पीएमआरडीए’ आणि ३.७८ हेक्टर जमीन पिंपरी चिंचवड महापालिका संपादित करुन देणार आहे. ‘पीएमआरडीए’ हद्दीतील सातपैकी ४ गावांचे संयुक्त मोजमाप पूर्ण झाले. तर तीन गावांचे संयुक्त मोजमाप शुल्क ‘पीएमआरडीए’ने खेड उपजिल्हाधिकाऱ्यांकडे भरले आहे. महापालिकेने जमीन हस्तांतरणाचा आरखडा मंजूर करुन मान्यतेसाठी पाठवला आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे दावे
- चाकण टप्पा क्र. ४ (महिंद्रा कंपनीसमोर) चार किलोमीटर रस्त्याचे कॉंक्रीटीकरण ८० टक्के पूर्ण झाले असून, उर्वरित डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार
- टप्पा क्रमांक ३ स्पायसर चौक ते स्कोडा कंपनी रस्त्याचे कॉंक्रीटीकरण आणि साइड पट्टी डांबरीकरणाची निविदा मंजुरीसाठी मुख्यालयाकडे पाठवली आहे. डिसेंबर २०२६ पर्यंत काम पूर्ण करण्याचे नियोजन
- टप्पा क्रमांक १ व २ मधील १४.७० किलोमीटर मुख्य रस्त्याचे कॉंक्रीटीकरण आणि साइड पट्टी डांबरीकरण कामाची निविदा मागविण्यात आल्या आहेत. मे २०२७ पर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट
- टप्पा क्रमांक पाचमधील ४ किलोमीटर कामाची निविदा मुख्यालयाकडे पाठविली आहे. मे २०२७ पर्यंत काम पूर्ण करण्याचे नियोजन
‘एमएसआयडीसी’ची माहिती
- तळेगाव-चाकण-शिक्रापूर (राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८ डी) महामार्गाचे काम ‘बीओटी’ तत्वावर करण्यात येणार असून १७ ऑक्टोबर रोजी निविदा उघडण्यात येणार आहे. शासन मंजुरी आणि भूसंपादनानंतर तीन वर्षांत महामार्गाचे काम पूर्ण करण्याचे नियोजन
‘पीएमआरडीए’ प्रशासन म्हणते...
- चाकण बाह्यवळण मार्गासाठी एकूण चार गावांत भूसंपादन करायचे असून जमीन मोजणी सुरू आहे
- ४०.७४ किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी प्राधिकरणाने ५५८.१२ कोटींना मान्यता दिली आहे. १३ रस्त्यांसाठी निविदा मागविल्या आहेत. उर्वरित भूसंपादन आणि कामे प्राधान्याने करणार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.