पिंपरी, ता. ४ : ‘किमान काम समान वेतन नाही,’ ‘कंत्राटदाराकडून खच्चीकरण होतंय,’ ‘बॅंक खात्यात वेतन देऊन काही रक्कम परत मागितली जाते,’ अशा समस्या घेऊन ठेकेदारांकडील कामगार महापालिका अधिकाऱ्यांकडे येतात. मात्र, त्यांना ‘तुमचा आमच्याशी काही संबंध नाही’ असे उत्तर मिळते. त्यामुळे कंत्राटी कामगारांनी दाद मागावी कोणाकडे? ठेकेदारांना महापालिका पाठीशी घालत आहे का? असे प्रश्न उपस्थित होत असून ‘कंत्राटदार तुपाशी आणि कामगार उपाशी’ अशी स्थिती निर्माण झाली आहे.
महापालिकेच्या विविध विभागांतील कामे आणि सुविधा पुरवण्यासाठी सुमारे साडेसहा हजार कंत्राटी कामगार आहेत. यामध्ये आरोग्य विभागाअंतर्गत साफसफाई, स्वच्छता, नालेसफाई, उद्याने, स्मशानभूमी, शाळा, दवाखाने, रुग्णालयांतील स्वच्छता; वैद्यकीय विभागाकडील रुग्णालयांत डॉक्टरांसह पॅरामेडिकल सेवा; सुरक्षा आदी सेवा कंत्राटदारांमार्फत सुरू आहेत. त्याच्या मोबदल्याची रक्कम ठेकेदारांना दिली जाते. त्यांच्यामार्फत कंत्राटी कामगारांना दरमहा वेतन दिले जाते. मात्र, ते वेतन ठेकेदाराकडून वेळेत मिळत नाही. शिवाय, वेगवेगळ्या प्रकारे त्रास दिला जातो, असा आरोप केला जात आहे. त्याबाबत महापालिकेतील संबंधित विभागप्रमुखांकडे तक्रार केल्यास, ‘ठेकेदार आणि तुम्ही बघून घ्या, आमच्यापर्यंत येऊ नका,’ असे उत्तर दिले जाते. त्यामुळे न्याय कोणाकडे मागायचा? असा प्रश्न कामगारांसमोर आहे.
कंत्राटी कामगारांच्या समस्या
- कंत्राटदाराकडून किमान काम समान वेतन नाही, उलट खच्चीकरण केले जाते
- बॅंक खात्यात वेतन देऊन काही रक्कम परत मागितली जाते
- १२ ते १५ हजार रुपये वेतनात काम करावे लागते, भविष्य निर्वाह निधी जमा केला जात नाही
- बोनस मिळत नाही, ‘ईएसआय’ सुविधा नाही, रजा मंजूर केली जात नाही
- रजेपोटी वेतन कपात, पाच टक्के घरभाडे व सेवाशुल्कही दिले जात नाही
चालू वर्षातील किमान वेतन दर
कामगार प्रकार / मूळ वेतन (अ) / विशेष भत्ता (ब)/ एकूण वेतन
कुशल / १४,००० / ९,१००/ २३,१००
अर्धकुशल / १३,००० / ९,१०० / २२,१००
अकुशल / ११,५००/ ९,१००/ २०,६००
कंत्राटी कामगारांचे भत्ते (टक्क्यांमध्ये)
घरभाडे : ५
ईपीएफ (१५ हजारांपर्यंत) : १३
बोनस : ८.३३
रजा वेतन : ५.७७
सेवा शुल्क : ५
(कामगार कल्याण निधी दर सहामाही ७५ रुपये मिळायला हवा)
असंघटित कामगारांची संघटना नसल्यामुळे अन्यायाविरुद्ध आवाज उठवताना अडचणी येतात. कामावरून काढण्याची भीती असल्याने तक्रार करत नाहीत. आम्ही बोललो, तर कंत्राटदार त्यांना कामावर ठेवत नाही. कामगार कल्याण विभागाने त्यांचे प्रश्न सोडवावेत.
- बबन झिंजुर्डे, अध्यक्ष, महापालिका कर्मचारी महासंघ
कंत्राटी कामगारांना संबंधित ठेकेदार किमान वेतनश्रेणीनुसार वेतन देतात. त्यांचा भविष्यनिर्वाह निधी जमा केला जातो. यासह इतर सुविधा दिल्या जातात. कोणावर अन्याय होत असल्यास आमच्याकडे तक्रार करावी. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल.
- संदीप खोत, उपायुक्त, कामगार कल्याण
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.