पिंपरी, ता. १० : निर्बंध लादूनही शहरात अवजड वाहनांची सर्रास रहदारी सुरू आहे. नियमांचे उल्लंघन करून शहरात प्रवेश करणाऱ्या अवजड वाहनांवर पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिस विभागाच्यावतीने कारवाई केली जात आहे. गेल्या महिन्यात पाच हजारांहून अधिक अवजड वाहनांवर कारवाई करून विभागाने ६० लाख रूपयांहून अधिक दंड वसूल केला आहे.
पिंपरी-चिंचवड हे औद्योगिक नगरी आहे. त्यामुळे रोज नव्याने अवजड वाहनांचा प्रवेश होतो. मात्र या वाहनांमुळे शहराच्या अंतर्गत वाहतुकीवर परिणाम होऊन वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत असते. त्यामुळे छोट्या आणि हलक्या वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. सकाळी आणि सायंकाळच्यावेळी कामावरून घरी निघालेल्या चाकरमान्यांना वाहतुकीच्या समस्येचा त्रास सहन करावा लागतो. एकाच वेळी सर्व वाहने निघत असल्याने वाहतूक व्यवस्थेवर ताण निर्माण होतो. त्यामुळे वाहतुकीचे तीन तेरा वाजतात. त्यासाठी सकाळी आठ ते अकरा आणि सायंकाळी पाच ते नऊ वाजण्याच्या सुमारास अवजड वाहनांना शहरात बंदी करण्यात आली आहे.
मात्र, तरी देखील अवजड वाहने निर्धारित क्षमतेपेक्षा जादा माल घेऊन, वाहन योग्यता प्रमाणपत्राशिवाय (फिटनेस) आणि निर्धारित वेळेपेक्षा इतर वेळेत शहरामधून प्रवेश करत असल्याने वाहतूक विभागाने कारवाईचे शस्त्र उपसले आहे. दिवसातून किमान २०० ते २५० वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.
किती आहे दंड ?
वाहतूक विभागाने ठरवून दिलेल्या वेळेत अवजड वाहनांनी प्रवेश न केल्यास त्यांच्याकडून प्रवेश बंदीचा (नो एंट्री) ५०० रूपये दंड आकारला जातो. तर दुसरा दंड १ हजार ५०० रूपये आकारला जातो.
कुठे आहे प्रवेशावर बंधन ?
त्रिवेणीनगर ते तळवडे, परंडवाल चौक ते कुदळवाडी पूल, कृष्णा चौक, ज्योतिबा चौक, भक्ती-शक्ती चौक ते त्रिवेणीनगर, तळवडे ते भक्ती शक्ती चौक, रिव्हर व्ह्यू चौक ते महावीर चौक, नाशिक फाटा चौक ते हॅरिस पूल, काळेवाडी फाटा ते तापकीर चौक, कस्पटे वस्ती ते सांगवी वाहतूक विभाग, बिर्ला हॉस्पिटल ते भूमकर चौक, तापकीर चौक ते थेरगाव फाटा यासह एकूण ६३ ठिकाणी अवजड वाहनांना निर्धारित वेळेत प्रवेश दिला जातो.
पिंपरी-चिंचवड शहरात अवजड वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रहदारीच्यावेळी अशा वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. बांधकामासाठी वापरलेली अवजड वाहने तसेच इतर वाहने मोठ्या प्रमाणात शहरात नियमबाह्य वाहतूक करत आहेत. सर्वांनीच नियमांचे पालन करावे आणि वाहतूक विभागाला सहकार्य करावे. अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
- बापू बांगर, पोलिस उपआयुक्त वाहतूक शाखा, पिंपरी-चिंचवड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.