पिंपरी : लिलावामध्ये वाहने खरेदी करून देण्याचे आमिष दाखवून बनावट कागदपत्रांच्या आधारे एका व्यापाऱ्याची वीस लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना एमआयडीसी भोसरी येथे घडली. याप्रकरणी अनिल बाबूराव जावळेकर (वय ६३, रा. अशोकनगर, रेंजहिल्स रस्ता, पुणे) यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी नितीन भानुदास काळे (रा. प्रतापनगर, सातारा), राहुल सिद्धार्थ मोरे (रा. सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी फिर्यादी यांना लिलावामध्ये ट्रक, टेम्पो, दुचाकी अशी वाहने ३७ लाख रुपये किमतीला खरेदी करून देतो असे सांगितले. त्यानंतर हिंदुजा फायनान्स सातारा, इंडसइंड बँक सातारा आणि जालना येथील बनावट कोटेशन रिसिट तयार केली. ती कागदपत्रे फिर्यादी यांना व्हॉट्सॲपवर पाठवली. फिर्यादी यांच्याकडून २० लाख रुपये घेऊन त्यांना व्यवहार पूर्ण न करता बनावट कागदपत्रे तयार करून त्यांची फसवणूक केली.
मोटारीच्या धडकेत रिक्षा चालकाचा मृत्यू
पिंपरी : भरधाव मोटारीने एका रिक्षाला धडक दिली. यामध्ये रिक्षा चालकाचा मृत्यू झाला. ही घटना रहाटणी येथे घडली. याप्रकरणी रिक्षातील प्रवासी महिलेने काळेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोटार चालकावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी महिला एका रिक्षातून जगताप डेअरी ते शिवार गार्डन चौक या मार्गाने जात होत्या. त्यावेळी बीआरटी मार्गातून आरोपीने त्याच्या ताब्यातील मोटार वेगात आणली. या मोटारीने रिक्षाला समोरून जोरात धडक दिली. या अपघातात रिक्षा चालकाचा मृत्यू झाला. तर फिर्यादी महिला गंभीर जखमी झाल्या.
मोटारीच्या धडकेत डॉक्टर जखमी
पिंपरी : भरधाव मोटारीने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार डॉक्टर जखमी झाला. ही घटना चिखली येथे घडली. सोहन राजेश देशमुख (वय ३९, रा. बोऱ्हाडेवाडी, चिखली) असे जखमी डॉक्टरचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोटारचालक उत्कर्ष जाधव (वय १९, रा. सुदर्शननगर, नेवाळे वस्ती, चिखली) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
जांबे गाव येथून गांजा जप्त
पिंपरी : जांबे गाव येथे हिंजवडी पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका रिक्षा चालकांकडून साडेबारा हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला. जुबेर मौला अत्तार (वय ३५, रा. जांबे, मुळशी) असे ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे. आरोपीने त्याच्याकडे बेकायदारित्या विक्रीसाठी गांजा बाळगला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर हिंजवडी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून बारा हजार ४५० रुपये किमतीचा गांजा जप्त केला.
दारूविक्री प्रकरणी एकावर कारवाई
पिंपरी : बेकायदारित्या दारूविक्री करणाऱ्या तरुणावर पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई केली. मुद्देमाल जप्त करून त्याच्यावर संत तुकाराम नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई वल्लभनगर येथे करण्यात आली. दीक्षित दिनकर शेट्टी (वय २८, रा. नाशिक फाटा, कासारवाडी) असे आरोपीचे नाव आहे. वल्लभनगर येथे पोलिसांनी आरोपीची दुचाकी अडवून तपासणी केली असता, दुचाकीवरील दोन बॉक्समध्ये १५ हजार ९६५ रुपये किमतीची दारू आढळून आली.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.