पिंपरी, ता. २४ : कामगारनगरी, उद्योगनगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराचा सांस्कृतिक नगरी म्हणून झपाट्याने विकास होत आहे. शहरात नाट्य संकुल उभारण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. पण, जागेआभावी हे काम रखडले होते. अखेर नाट्य संकुलासाठी जागा उपलब्ध करुन देण्याच्या सूचना महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना देणार, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (ता. २३) शहरात नाट्य संकुल उभारण्याची घोषणा केली.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखेच्या २९ व्या वर्धापन दिनानिमित्त प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. या प्रसंगी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मध्यवर्ती संघटना, मुंबईचे विश्वस्त अशोक हांडे कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष अजित पवार होते. मात्र, संमेलनाला येऊ न शकल्यामुळे त्यांचा मध्यवर्ती शाखेचे विश्वस्त अशोक हांडे, उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर आणि नियामक मंडळाचे सदस्य सुहास जोशी यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
ज्येष्ठ नाट्य संगीतकार ज्ञानेश पेंढारकर यांना ‘कै. बालगंधर्व पुरस्कार’, अभिनेता, कवी-अभिनेता संकर्षण कऱ्हाडे यांना ‘आचार्य प्र.के. अत्रे पुरस्कार’, दिग्दर्शक, अभिनेता प्रवीण तरडे यांना ‘कै. अरुण सरनाईक पुरस्कार’, अभिनेत्री स्पृहा जोशी यांना ‘कै. स्मिता पाटील पुरस्कार’, नाट्य-सिने-मालिका लेखक अरविंद जगताप यांना ‘कै. जयवंत दळवी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. तसेच ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. सुरेश साखवळकर यांचा नाट्य परिषद मध्यवर्तीचा ‘जीवन गौरव पुरस्कार’ मिळाल्यानिमित्त यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात सुवर्णा काळे, रति देशमुख, संदीप देशमुख, संदीप जगदाळे, सोमनाथ तरटे, राष्ट्रीय खेळाडू प्रांजल जाधव, राज्यनाट्य स्पर्धा २०२४ चे पुरस्कार विजेते मनोहर जुवाटकर, कमलेश बिचे, विनायक परदेशी, अथर्व कुलकर्णी, श्रुती भोसले, दिनेश साबळे यांना सन्मानित करण्यात आले.
प्रास्ताविकात भाऊसाहेब भोईर यांनी पुरस्कारांमागील भूमिका मांडली. यावेळी पुरस्कार्थींनी सत्काराला उत्तर देत मनोगत व्यक्त केले. सोमनाथ तरटे यांच्या संबळ वादनाने कार्यक्रमाचा समारोप झाला. सूत्रसंचालन चित्रा खरे यांनी, तर सुहास जोशी यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.