गणेशोत्सवात गोंगाट नको, जल्लोष हवा
‘डीजे’ टाळून पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देण्याचे आवाहन
पिंपरी, ता. २६ : घरकुल परिसरात ‘डीजे’च्या आवाजामुळे काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला. ‘डीजे’च्या दणदणाटाबाबत सर्वसामान्य नागरिकांनी त्रागा व्यक्त केला, तरी काही अतिउत्साही मंडळे आणि प्रशासनाकडून ‘डीजे’वापराबाबतचे नियम पाळले जात नाहीत, असा आरोप होतो. त्यामुळे पोलिस प्रशासन ‘डीजे’च्या आवाजावर नियंत्रण ठेवणार का?, गणेशोत्सव मंडळे सामाजिक भान ठेऊन पारंपारिक वाद्यांना प्राधान्य देणार का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ‘‘गणेशोत्सवात गोंगाट नको, जल्लोष हवा’’ असे आवाहन पर्यावरणप्रेमींनी केले आहे.
गणेशाच्या आगमन आणि विसर्जन मिरवणुकीवेळी बहुतांश मंडळे पारंपरिक वाद्यांचा गजर करतात. पण, काही मंडळे अजूनही ‘डीजे’ लावतात. या आवाजामुळे गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर दुष्परिणाम होतो. अनेकांना कायमचे बहिरेपण येते. तर, हृदयाचे ठोके वाढल्यामुळे काहींचा आकस्मित मृत्यू होतो. चिडचिड होणे, मानसिक संतुलन बिघडणे असे समस्यांना तोंड द्यावे लागते. पण, याकडे दुर्लक्ष करुन सर्रास ‘डीजे’ लावतात.
शहरात दहीहंडी उत्सव नुकताच साजरा झाला. बहुतांश मंडळांनी करमणुकीसाठी ‘डीजे’ लावले होते. त्याचा दणदणाट रात्री उशिरापर्यंत सुरू होता. परिणामी, काही ज्येष्ठ नागरिक कंटाळून लहान मुलांना घेऊन शांततेच्या ठिकाणी गेले. अनेकांनी नातेवाइकांकडे मुक्काम केला. या आवाजावर कोणाचेही नियंत्रण नव्हते.
गेल्या वर्षी ध्वनी मर्यादेचे उल्लंघन
गेल्या वर्षी गणेशोत्सवात पिंपळे निलख, थेरगाव, वाकड, निगडी प्राधिकरण, आकुर्डी, रावेत, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, कासारवाडी, बोपोडीसह विविध ठिकाणी आवाजाच्या पातळीची मर्यादा ओलांडल्याचे नोंदविले गेले. काही ठिकाणी १०८ डेसिबलची नोंद झाली होती.
सतत मोठा आवाज कानावर पडला, तर बहिरेपण येण्याची शक्यता असते. ८५ डेसिबलवर आवाज गेला, तर त्याचा दुष्परिणाम पूर्ण शरीरावर होतो. डीजेचा आवाज उच्च श्रेणीचा असल्यामुळे आतल्या पेशींना इजा होते. ज्येष्ठ नागरिकांना भोवळ (चक्कर) येणे, रक्तदाब वाढणे, कानाच्या नसा कमकुवत होणे असे त्रास होतात. कानाची एक नस हृदयाला जोडलेली असते, ती मोठ्या आवाजामुळे उत्तेजीत होते. त्यामुळे हृदयाची गती वाढते. प्रसंगी झटकाही येऊ शकतो.
- डॉ. सुधीर भालेराव, कान-नाक-घसा तज्ज्ञ
लहान मुले, गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिक, विविध व्याधीत्रस्त नागरिकांच्या कानावर सतत मोठा आवाज पडल्यावर मानसिक परिणाम होतो. चिडचिड होणे, झोप न लागणे, एकाग्रता कमी होणे अशा समस्या उद्धवू शकतात.
- डॉ. मंजित संत्रे, मानसोपचार तज्ज्ञ
शहरात सण-उत्सावात डीजेचा वापर वाढला आहे. त्यात आवाजाची मर्यादा ओलांडली जाते. सर्वांनी योग्य पद्धतीने सण-उत्सव साजरे केल्यास भारतीय संस्कृती टिकून राहील. पिंपरी-चिंचवड शहर डीजेमुक्त करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.
- राजेश जाधव, नागरिक
सणउत्सव साजरे करताना मंडळानी सामाजिक भान जपले पाहिजे. सण-उत्सव साजरे करण्याला कोणाचा विरोध नाही. पण, नियम पाळून ते साजरे केले पाहिजेत. डीजेचा वापर न करता मंडळांनी समाजासमोर चांगला आदर्श निर्माण केला पाहिजे.
- भास्कर गोखले, पर्यावरण प्रेमी
गेल्या वर्षी गणेशोत्सवात आवाजाची पातळी (डेसिबल)
दिवस ०७/०९ - ८/०९ - ११/०९ - १३/०९ - १७/०९
चापेकर चौक, चिंचवड गाव - ८६.६ - ९२.३ - ८८.९ - ८५.६ - ९५.८
शांतीनगर, पिंपरी - ८९.२ - ७९.८ - ८४.५ - ८२.६ - १०८.९
भोसरी गावठाण - ७९.१ - ८६.९ - ७७.८ - ८१.४ - ८६.२
आवाजाची मर्यादा किती ? (डेसिबल)
शांतता क्षेत्र : ५० (दिवस), ४० (रात्री)
निवासी क्षेत्र : ५५ (दिवस), ४५ (रात्री)
व्यावसायिक क्षेत्र : ६५ (दिवस), ५५ (रात्री)
औद्योगिक क्षेत्र : ७५ (दिवस), ७० (रात्री)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.