पिंपरी, ता. २८ : आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना त्वरित संपर्क व जलद प्रतिसादासाठी अग्निशमन विभागाचा नियंत्रण कक्ष नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक सक्षम केला जात आहे. हे नवीन तंत्रज्ञान वापराचे प्रशिक्षण नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांना द्या. नागरिकांकडून आपत्तीबाबत मिळणाऱ्या माहितीचे व्यवस्थित संकलन केले जाते का, याची खात्री करा, असे आदेश महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांनी दिले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त जांभळे-पाटील यांनी संत तुकारामनगर येथील अग्निशामक विभागाच्या कार्यालयात भेट देऊन येथील कामकाजाचा आढावा घेतला. याप्रसंगी सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे, सहशहर अभियंता अनिल भालसाकळे, उपअग्निशमन अधिकारी ऋषीकांत चिपाडे, कार्यकारी अभियंता महेश कावळे आदी उपस्थित होते.
यावेळी जांभळे-पाटील यांनी फोन प्रतिसादाची तत्परता तपासली. नियंत्रण कक्षाला फोन आल्यानंतर किती वेळात प्रतिसाद मिळतो, कोणती माहिती घेतली जाते, ती माहिती घेण्यासाठी किती वेळ लागतो याचा आढावा घेतला. तसेच, नियंत्रण कक्षात फोन आल्यास त्वरित प्रतिसाद देण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. कॉल आल्यावर नियंत्रण कक्षातील स्क्रीनवर एक डिजिटल फॉर्म आपोआप उघडतो. या फॉर्ममध्ये संबंधित घटनेबाबतची प्राथमिक माहिती, ठिकाण, आपत्तीचा प्रकार, किती नागरिक अडकल्याची शक्यता, तसेच कॉल करणाऱ्याचे नाव व संपर्क क्रमांक अशी माहिती भरली जाते. फॉर्म पूर्ण भरल्यानंतर संबंधित माहिती जवळच्या अग्निशमन केंद्राला तत्काळ पाठवली जाते, जेणेकरून बचाव पथक त्वरित घटनास्थळी रवाना होऊ शकेल. याशिवाय, प्रत्येक कॉलची नोंद ठेवली जाते, याचीही त्यांनी माहिती घेतली.
पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज
पवना, इंद्रायणी, मुळा नद्यांवरील धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढल्यास नदीपात्रात विसर्ग सुरू केला जातो. नदीची पातळी वाढून पूरजन्य स्थिती उद्भवण्याची शक्यता असते. त्यासाठी अग्निशमन विभागातील जलपरी या विशेष वाहनाची जांभळे-पाटील यांनी पाहणी केली. बोटी, लाइफ जॅकेट, रोप, ओबीएम, बचाव साहित्य यांची कार्यक्षमता तपासण्यात आली. आपत्तीच्यावेळी त्वरित बचावकार्य सुरू करता यावे, यासाठी पथके आणि साहित्य सदैव तत्पर ठेवा, अशा सूचना त्यांनी दिल्या.
‘‘गणेशोत्सव काळात मिरवणुका, मंडप, रोषणाई यांमुळे अपघात किंवा आपत्कालीन घटना घडण्याची शक्यता असते. त्यामुळे अग्निशमन विभागाने सर्व उपकरणे कार्यरत ठेवावीत. मंडप उभारणीसाठी अग्निसुरक्षा नियमांचे पालन केल्याचे तपासावे. नियंत्रण कक्षातील हेल्पलाइन नंबर अधिक नागरिकांपर्यंत पोहोचवा. मिरवणुकीदरम्यान वाहतूक, वीज आणि इतर विभागांशी समन्वय ठेवून कार्यवाही करा.
- प्रदीप जांभळे-पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.