सोमाटणे, ता. २७ : द्रुतगती मार्गावरील जुना उर्से टोलनाका येथील सुविधा हटविल्याने सध्या येथील बसथांबा प्रवाशांसाठी अत्यंत धोकादायक ठरत आहे. आवश्यक सुविधा नसल्याने प्रवाशांना रस्त्यावर उभे राहून जीव धोक्यात घालून वाहनांची वाट पाहावी लागत आहे.
वाहनांची उपलब्धता, वेळेची बचत, बसथांब्याची सोय, पोलिस सुरक्षा, पाणी व स्वच्छतागृह, तसेच रिक्षांची सोय या कारणांमुळे गेल्या अडीच दशकांपासून उर्से टोलनाका येथून रोज शेकडो प्रवासी उर्से-सातारा-कोल्हापूर तसेच उर्से-मुंबई या मार्गांवर प्रवास करत होते व आजही करत आहेत. मात्र, सुमारे सहा महिन्यांपूर्वी टोलनाक्याचे स्थलांतर झाल्यानंतर येथील सर्व सुविधा नवीन टोलनाक्यावर हलविण्यात आल्या. त्यामुळे पुणे बाजूच्या मार्गाने प्रवास करणारे प्रवासी उघड्यावर आले आहेत. येथून प्रवास करताना आवश्यक असणाऱ्या बसथांबा शेड, पोलिस सुरक्षा, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह तसेच एसटी बस थांबेल याची खात्री या मूलभूत सुविधा सध्या उपलब्ध नाहीत. परिणामी, प्रवाशांना भर उन्हात व धोकादायक ठिकाणी रस्त्यावर उभे राहून वाहनांची प्रतीक्षा करावी लागत आहे. वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे येथे अपघाताचा धोका अधिक आहे. एक किलोमीटर अंतरावरून एसटी बस दिसताच प्रवाशांना लहान मुलांसह हात वर करून बस थांबविण्याचा प्रयत्न करावा लागतो. चालकाने थांबविले तरच प्रवाशांना बस मिळते, अन्यथा पुढील बसची प्रतीक्षा करावी लागते. हा प्रकार गेल्या सहा महिन्यांपासून सुरू आहे.
संरक्षणासाठी पोलिस यंत्रणा नसल्याने प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे असून आपणच आपली काळजी घ्यावी लागते, अशी व्यथा प्रवासी सागर जाधव यांनी व्यक्त केली. शासनाने तातडीने जुना उर्से टोलनाका येथे अधिकृत बसथांबा मंजूर करून निवारा शेड, पाणी, स्वच्छतागृह व पोलिस सुरक्षेची व्यवस्था करावी, अशी मागणी जमीन हक्क परिषद (मावळ)चे संस्थापक माऊली सोनवणे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
‘‘द्रुतगती मार्गावरील जुनी इमारत रिंगरोड विभागाला देण्यात आल्याने येथील पोलिस चौकीचे स्थलांतर करावे लागणार आहे. रस्ते विकास महामंडळ देईल त्या जागेवर पोलिस चौकीचे स्थलांतर करण्यात येईल. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पोलिस तैनात राहतील.
- शिप्रसाद पवार, सहायक पोलिस निरीक्षक, महामार्ग
‘‘जुना उर्से टोलनाका येथे उतरलेल्या प्रवाशांना तळेगाव, वडगाव किंवा जुन्या पुणे-मुंबई महामार्गाकडे जाण्यासाठी रिक्षाचालक कमी दरात सेवा देतात. मात्र, द्रुतगती मार्गावर उर्से येथे आयटीएमएस प्रणाली असल्याने दंडात्मक कारवाईच्या भीतीने रिक्षा थेट रस्त्यापर्यंत नेता येत नाहीत. त्यामुळे वृद्ध व लहान मुलांना रिक्षा स्टँडपर्यंत चालत जावे लागते. वृद्ध प्रवाशांचा हा त्रास वाचवण्यासाठी रस्त्यापर्यंत रिक्षांना परवानगी देण्यात यावी.
- दिलीप डोळस, रिक्षाचालक
PNE25V80159, PNE25V80160
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.