आळंदी, ता. २७ : पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील हवालदार रश्मी शितोळे (धावडे) यांनी पोलिस दलात भरती झाल्यानंतर नोकरीसोबतच राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत यशाचे शिखर गाठण्याचे स्वप्न उराशी बाळगले. त्यादृष्टीने त्या सराव करू लागल्या. मात्र, पतीचे अपघाती निधन झाले आणि कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. नेमबाजीचा सराव थांबवला. ‘आता सर्व काही संपले’ अशी भावना मनात येत होती. अशा परिस्थितीत मुलांचा सांभाळ करत नोकरीची जबाबदारी सांभाळणे हेही मोठे आव्हान होते. मात्र, या कठीण काळात सहकारी आणि वरिष्ठांनी त्यांना धीर दिला. पुन्हा एकदा खेळाकडे वळण्याचा आत्मविश्वास दिला. त्यातूनच रश्मी यांनी राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले.
भोसरी येथे राहणाऱ्या रश्मी २००७ पासून पोलिस खात्यात कार्यरत आहेत. सुरुवातीपासूनच त्यांना खेळाची विशेष आवड होती. २००९ पासून त्यांनी नोकरी सांभाळत विविध शूटिंग स्पर्धांमध्ये सहभाग घ्यायला सुरुवात केली. अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. राष्ट्रीय स्पर्धेत उत्तम कामगिरी करावी, या उद्देशाने त्यांच्या पतीने त्यांना सुमारे सहा लाख रुपये किमतीचे शस्त्र खरेदी करून दिले होते. दुर्दैवाने ही भेट त्यांची शेवटची ठरली. कारण अवघ्या चार दिवसांनी पावसाळी ट्रेक आणि वर्षा सहलीचा आनंद घेत असताना त्यांच्या पतीचा अपघाती मृत्यू झाला. या घटनेनंतर रश्मी खचून गेल्या. मात्र, सहकाऱ्यांनी त्यांना मानसिक आधार दिला. बालेवाडी मैदानातील प्रशिक्षक शेहजाद मिर्झा यांनी दिलेल्या मार्गदर्शनामुळे आणि प्रशिक्षणामुळे त्यांनी पुन्हा एकदा खेळासाठी उभारी घेतली.
दिल्लीतील कर्णिशिंग शूटिंग रेंज, तुगलकाबाद येथे ११ ते १८ डिसेंबर दरम्यान झालेल्या ६८ व्या ओपन राष्ट्रीय नेमबाज स्पर्धेत रश्मी यांनी ०.२२ बोर फ्री पिस्टल ५० मीटर या प्रकारात सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. मनावरील दुःख काही काळ बाजूला ठेवत त्यांनी पूर्ण एकाग्रतेने आणि निष्ठेने खेळ केला व विजयापर्यंत मजल मारली. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी पोलिस मुख्यालयात त्यांचा सन्मान केला. यावेळी त्यांनी पुढील खेळासाठी आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासनही दिले.
‘‘राष्ट्रीय स्पर्धेतील यश दिवंगत पती स्वप्नील धावडे यांना अर्पण केले आहे. दुःखाच्या काळात साथ देणारे सहकारी, वरिष्ठ अधिकारी आणि प्रशिक्षक शेहजाद मिर्झा यांचे त्यांचे मनापासून आभार. सातत्याने मिळालेल्या पाठबळामुळेच पुन्हा उभे राहणे शक्य झाले.’’
- रश्मी शितोळे (धावडे)
८०२६६