पिंपरी, ता. २९ : महापालिका निवडणुकीची घोषणा होताच एकीकडे राजकीय वातावरण तापत असताना दुसरीकडे प्रचारयंत्रणाही वेगाने सक्रिय होत आहे. उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी काटेकोर नियोजन केले आहे. यासाठी थेट आपल्या नातेवाइकांना प्रचारात उतरवले असून त्यांना खास निमंत्रण दिले जात आहे. अनेक ठिकाणी हे नातेवाईक आठवडाभरापासूनच उमेदवारांकडे मुक्कामाला आले आहेत. त्यामुळे घर परिसराला प्रचार कार्यालयाचे रूप आले आहे. काहींनी घरासमोर मंडप उभारण्यासह जेवणावळीची व्यवस्थाही केली आहे.
शहरातील प्रभागाची भौगोलिक रचना मोठी असून मतदानासाठी अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे कमी कालावधीत अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचे मोठे आव्हान उमेदवारांपुढे आहे. त्यामुळे अनेकांनी इतर ठिकाणी राहणाऱ्या सगे-सोयऱ्यांचीही मदत घेतली आहे. कामांची विभागणीही केली आहे. काहीजण मतदार याद्यांची तपासणी करत आहेत, काही बूथनिहाय मतदारांशी संपर्क साधत आहेत. तर, काही जण सोशल मीडिया, व्हॉट्स ॲप ग्रुप्स आणि फोन कॉलद्वारे प्रचार करत आहेत. नातेवाईक महिलांकडे घराघरांत भेटी देण्याची जबाबदारी दिली असून, तरुण वर्गाकडे डिजिटल प्रचाराची धुरा सोपवली आहे.
तळवडे, निगडी, चिखली, भोसरी, मोशी, दिघी, चऱ्होली, चिंचवड, पिंपरी, थेरगाव, ताथवडे, वाकड, रहाटणी, रावेत, पिंपळे गुरव, पिंपळे निलख, काळेवाडी, सांगवी, दापोडी, कासारवाडी आदी परिसरांतील उमेदवारांच्या घरापुढे सध्या मंडप उभारल्याचे दिसून येत आहे.
जेवणासाठी केटरिंगची सुविधा
या प्रचारयंत्रणेसोबतच पाहुण्यांच्या जेवण व राहण्याचीही चोख व्यवस्था करण्यात येत आहे. घरातील महिला वर्गाला कामाचा भार नको, यासाठी थेट केटरिंगची सोय केली जात आहे. काही ठिकाणी दररोज शेकडो लोक जेवणाचा लाभ घेत आहेत. यासाठी स्वतंत्र मंडप उभारणीही केली आहे.
रोज दोन तास तरी द्या
प्रचारात सहभागी होण्यासाठी नातेवाइकांना संपर्क साधला जात आहे. दिवसभर नाही जमले तरी दोन तास तरी द्या, असे साकडे घातले जात आहे. त्यानुसार नातेवाईकदेखील वेळ मिळेल तसा प्रचारात सहभाग नोंदवत आहेत.
अशीही होतेय मदत
काही उमेदवारांचे नातेवाईक शहरासह लगतच्या गावांत वास्तव्यास असतात. अशांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या जवळच्या नातेवाइकांचा उपयोग करून घेतला जात आहे. आपल्या नातेवाइकांमार्फत संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे.