सोमाटणे, ता. २९ : मावळात निर्भया अत्याचार व खून प्रकरणाच्या निषेधार्थ मराठा समाजासह सर्व समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या ‘मावळ बंद’ला पवन मावळच्या ग्रामीण भागात मोठा प्रतिसाद मिळाला.
चार वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला. या प्रकरणातील आरोपीवर जलदगती न्यायालयात खटला चालवून त्याला फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी उर्से ग्रामस्थांसह सर्व समाजाच्या वतीने ‘मावळ बंद’ची हाक देण्यात आली होती. या बंदला पवनमावळ परिसरातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळाला. सोमाटणेसह पवन मावळातील सर्व गावांमध्ये सकाळपासूनच या घटनेचा निषेध नोंदवत बंद पाळण्यात आला. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. व्यापारी, व्यावसायिक, विक्रेते तसेच नागरिकांनी या बंदला पाठिंबा दिला. नागरिक व विविध संघटनांच्या वतीने आरोपीचा खटला जलदगती न्यायालयात चालवून त्यास फाशीची शिक्षा द्यावी, कोथुर्णे येथील घटनेची पुनरावृत्ती झाल्याने अशा प्रकारच्या घटनांना आळा बसण्यासाठी कायद्यात बदल करावा, दररोज शाळा भरताना व सुटताना शाळा परिसरात पोलिस गस्त वाढवावी, मुलींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण द्यावे, शाळा व गाव परिसरातील बेकायदा मद्यविक्रीवर कायमची बंदी घालावी, अशा मागण्या करण्यात आल्या.