पिंपरी, ता. २९ : पिंपरी चिंचवड शहरात मेट्रो सेवेला दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळत आहे. मेट्रोला पूरक ठरणाऱ्या फिडर बस सेवेमुळे पीएमपीएमएल (पुणे महानगर परिवहन महामंडळ) मालामाल झाले आहे. केवळ एका ‘पीएमपी’च्या तिजोरीत तब्बल तीन कोटी रुपयांहून जास्त उत्पन्न जमा झाले आहे. उशिरा का होईना, पण फिडर सेवा सुरू केल्याचा सकारात्मक परिणाम प्रवासी संख्या आणि महसुलावर दिसून येत आहे.
मेट्रो प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन सध्या नऊ मेट्रो फिडर सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. यामुळे मेट्रो स्थानकापासून घर, कार्यालय किंवा इतर ठिकाणी जाणे प्रवाशांना सुलभ झाले आहे. शहरातून पुण्याला नोकरी, शिक्षण व व्यवसायासाठी जाणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. मेट्रोमुळे कमी वेळेत जास्त अंतर पार करणे शक्य झाले आहे. त्यामुळे विद्यार्थी, महिला, नोकरदार तसेच ज्येष्ठ नागरिक मेट्रोला पसंती देत आहेत.
शहरातील संत तुकारामनगर, नाशिक फाटा, कासारवाडी, फुगेवाडी ही मेट्रोची प्रमुख स्थानके असून, या ठिकाणी फिडर बस सेवा उपलब्ध आहे. स्थानकापासून पुढील प्रवासासाठी पर्याय नसल्याने अनेक प्रवासी यापूर्वी खासगी वाहन किंवा ऑनलाइन रिक्षाकडे वळत होते. ‘पीएमपी’च्या बससेवेकडे प्रवाशांचा ओढा कमी होता. ही बाब लक्षात घेऊन मेट्रो फिडर सेवा सुरू करण्यात आली.
एकूणच मेट्रो फिडर सेवा ही पीएमपीएमएलसाठी ‘उत्पन्नवाढीचा मार्ग’ ठरत असून, भविष्यात या सेवांचा विस्तार झाल्यास प्रवासी संख्या आणि महसूल आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
फिडर सेवेचे फायदे
- मेट्रो व बस सेवेमधील समन्वय वाढला
- प्रवाशांचा वेळ आणि खर्च कमी झाला
- खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी झाले
- ‘पीएमपी’च्या उत्पन्नात लक्षणीय वाढ
..........
दृष्टिक्षेपात
- पिंपरी चिंचवड शहरात ४ ऑगस्ट २०२३ रोजी फिडर बस सेवेचे उद्घाटन झाले.
- निगडी पासून नाशिक फाटा : निगडी आगारातून सुटणारी बस आकुर्डी , चिंचवड, पिंपरी, नेहरूनगर, नाशिक फाटा या मार्गावर जाते. याशिवाय भोसरी आगारातून दोन गाड्या आहेत. भोसरीतील सेक्टर १२ ‘पीएमपी’ आवास योजना ते नाशिक फाटा या मार्गावरील बसचा मार्ग ‘पीएमपी’ आवास योजना, भोसरी , लांडेवाडी, वल्लभनगर, नाशिक फाटा असा आहे. तसेच दिघी ते पिंपरी मेट्रो स्टेशनचा मार्ग दिघी, भोसरी, लांडेवाडी, वायसीएम, नेहरूनगर, पिंपरी असा आहे.
- सप्टेंबर २०२४ मध्ये शहरात नऊ फिडर बस सुरू झाल्या.
१ जानेवारी ते ३० नोव्हेंबरपर्यंत मेट्रोचे फिडर बससेवेचे उत्पन्न : ३ कोटी ३१ लाख ९३ हजार ३३५ रुपये.
....