पिंपरी, ता. ३० : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात (पीएमआरडीए) बारामती तालुक्याचाही समावेश करण्याच्या हालचालींना वेग आला असून, याबाबतचा सविस्तर प्रस्ताव ‘पीएमआरडीए’ प्रशासनाने सप्टेंबरमध्ये राज्य शासनाकडे पाठविला आहे. मात्र, या प्रस्तावावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.
बारामती शहर व तालुक्यातील नागरिकरणाचा वाढता वेग पाहता लोकसंख्या, रस्ते, पाणीपुरवठा, वाहतूक तसेच गरज लक्षात घेता स्वतंत्र नियोजन यंत्रणेची आवश्यकता भासू लागली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर राज्य शासनाने पीएमआरडीएकडे अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने ‘पीएमआरडीए’ प्रशासनाने दोन सप्टेंबर रोजी शासनाकडे अहवाल पाठविला आहे. मात्र, समावेश करायचा की नाही, तसेच त्याची व्याप्ती काय असावी, याबाबतचा अंतिम निर्णय शासनस्तरावर होणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. गेल्या चार महिन्यांपासून हा निर्णय प्रलंबित आहे.
सध्या ‘पीएमआरडीए’ हद्दीत पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, मावळ, मुळशी व हवेली हे तालुके तसेच भोर, दौंड, शिरूर, खेड, पुरंदर आणि वेल्हे तालुक्यांतील निवडक भागांचा समावेश आहे. या क्षेत्रात दोन महापालिका, तीन कॅन्टोन्मेंट बोर्ड, सात नगरपालिका परिषद आणि दोन नगरपंचायतींचा समावेश असून, रस्ते व इतर विकासकामे पीएमआरडीएच्या माध्यमातून राबविली जात आहेत. बारामतीचा समावेश कधी होणार या कडे सर्वांचे लक्ष आहे. प्रस्तावाबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचे आयुक्त योगेश म्हसे यांनी सांगितले.