पिंपरी, ता. २९ : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप-शिवसेना युतीची गुप्तता संपण्याऐवजी अधिकच गडद झाली आहे. चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतरही काही मोजक्या जागांवर दोन्ही पक्षांचे नेते अडून बसले. त्यामुळे सोमवारी (ता. २९) सायंकाळी सहापर्यंत युतीबाबत संभ्रमावस्था कायम राहिली. उमेदवारी अर्ज भरण्यास अवघा एक दिवस शिल्लक असताना युतीवर अवलंबून न राहता शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी सुरू केल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. प्रत्येक प्रभागात उमेदवार देण्यासाठी शिवसेनेच्या हालचालींना वेग आला असून, त्यामुळे महापालिका निवडणुकीतील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत युती करून लढण्याबाबत भाजप आणि शिवसेनेचे नेते सुरुवातीला सकारात्मक होते. त्या पार्श्वभूमीवर मागील आठ दिवसांपासून जागा वाटपावर सखोल चर्चा सुरू होती. मात्र, शिवसेनेला महत्त्वाच्या काही जागा सोडण्यास भाजप तयार नसल्याने युतीतील तिढा वाढत गेला आणि शिवसेनेची गोची झाली. या कोंडीतून मार्ग काढण्यासाठी शिवसेनेच्या नेत्यांनी विविध अटी-शर्तींसह तोडगा काढण्याचे प्रयत्न केले. तथापि, भाजपकडून ‘बघू’, ‘चर्चा करू’, ‘इच्छुकांशी बोलून निर्णय घेऊ’ अशा शब्दांत शेवटच्या क्षणापर्यंत शिवसेनेला झुलवत ठेवण्यात आल्याची चर्चा आहे.
उमेदवारी अर्ज भरण्यास अवघे काही तास शिल्लक असतानाही भाजपकडून युतीच्या निर्णयाबाबत अपेक्षित गांभीर्य दिसून न आल्याने शिवसेनेपुढील पेच अधिकच वाढत गेला. अखेर दोन जागांवरील तिढा सुटत नसल्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये युती होण्याची शक्यता मावळत चालल्याची चर्चा शिवसैनिकांमध्ये सुरू आहे. परिणामी, युतीची अपेक्षा बाजूला ठेवत शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेत ३२ प्रभागांमध्ये उमेदवार देण्याच्या हालचालींना वेग दिल्याचे समजते. या घडामोडींमुळे भाजपला धोबीपछाड देण्यासाठी शिवसेना पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
शिवसेनेत २०१७ ची पुनरावृत्ती? सर्व प्रभागांत तयारी
महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे लढत दिली होती. त्या निवडणुकीत शिवसेनेने ३२ प्रभागांतील १२८ पैकी ११९ जागांवर उमेदवार उभे केले. यापैकी नऊ उमेदवार निवडून आले होते. तसेच, काही प्रभागांमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांनी द्वितीय क्रमांकाची मते मिळवत भाजपच्या उमेदवारांना जोरदार टक्कर दिली होती. यावेळीही शिवसेनेकडून सर्वच प्रभागांमध्ये उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू असल्या, तरी नेमक्या किती जागांवर पक्ष लढणार, याबाबत पक्षाकडून अद्याप अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.
शिवसेनेसमोर नवे आव्हान
मागील निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवून द्वितीय क्रमांकाची मते मिळवणाऱ्या काही उमेदवारांनी आता भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने शिवसेनेसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. या उमेदवारांच्या जागी सक्षम आणि ताकदवान चेहरे देण्यासाठी शिवसेनेकडून संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू असल्याचे चित्र आहे.
भाजप-रिपाइं युती जवळपास निश्चित
भारतीय जनता पक्ष आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) यांच्यातील युती जवळपास निश्चित झाल्याचे चित्र आहे. रिपाइंने सुरुवातीला निवडक प्रभागांतील १५ जागांची मागणी केली होती. त्यावर चर्चेअंती सकारात्मक तोडगा काढत भाजपाने पाच जागा देण्याची तयारी दर्शवल्याची माहिती समोर येत आहे. या युतीअंतर्गत प्रभाग क्रमांक ९, १६, २१, २५ आणि ३० मधील जागांचा समावेश असल्याचे सांगितले जात असून, या प्रस्तावावर रिपाइंच्या पदाधिकाऱ्यांचे एकमत झाल्याने भाजप आणि रिपाइं एकत्र लढण्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. मात्र, रिपाइंचे उमेदवार कोणत्या निवडणूक चिन्हावर लढवणार, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. युतीची घोषणा झाल्यानंतरच यासंदर्भातील अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.
‘महापालिका निवडणुकीसाठी महायुती होणार की नाही, यावर चर्चा करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत बैठका घेऊन चर्चा करण्याचे नियोजन आहे. चर्चेअंती होणारा अंतिम निर्णय कळवला जाईल. सर्व सुधारित घडामोडींची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवली जाईल.
- श्रीरंग बारणे, खासदार तथा शिवसेना उपनेते
-----------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.