पिंपरी, ता. ३० ः पिंपरी चिंचवडमध्ये महाविकास आघाडी तुटली असून काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला. शेवटच्या दिवशी काँग्रेसने ६० जागांवर अर्ज दाखल केले. शिवसेना ठाकरे आणि मनसे एकत्र लढणार असून त्यांनी अनुक्रमे ६० व ३० इच्छुकांना एबी फॉर्मचे वाटप केले आहेत.
काँग्रेस, शिवसेना ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि मनसे यांनी महाविकास आघाडी करण्यासाठी स्थानिक नेत्यांच्या मॅरेथॉन बैठका घेतल्या. खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार यांनी शहरात येऊन बैठक घेऊन स्वतंत्र की ‘महाविकास आघाडीत लढायचे की राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी करायची याची चाचपणी केली. तर; शिवसेनेचे ठाकरे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख, आमदार सचिन आहिर यांनीही मित्रपक्षांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बैठका घेऊन आघाडीसाठी प्रयत्न केले. दरम्यान; राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार आणि डॉ. कोल्हे यांच्या बैठकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या घडामोडींनी वेग घेतला.
अजित पवार यांनी रविवारी (ता. २८) दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार अशी घोषणा करून चर्चांना पूर्णविराम दिला. त्यानंतरही काँग्रेस, शिवसेना ठाकरे, मनसे व राष्ट्रीय समाज पक्ष अशी आघाडी होणार असल्याची चर्चा होती. अखेरीस काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे पक्षात काही जागांवर एकमत न झाल्याने या जागावाटपाची चर्चा फिसकटली.
शेवटच्या दिवसापर्यंत महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे आणि मनसे या तीनही पक्षांनी उमेदवार यादी जाहीर केली नव्हती. एबी फॉर्मही दिले नसल्याने इच्छुकांमध्ये धाकधूक होती. पण, शेवटच्या दिवशी या तीनही पक्षांनी जो येईल त्याला घेऊन एबी फॉर्म दिल्याने बऱ्याच प्रभागात काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे एकमेकांविरोधात निवडणूक लढवणार आहेत.
---
महाविकास आघाडी करायची असती तर; एबी फॉर्म वाटण्याअगोदर केली असती. पण, आता काँग्रेस पक्ष महापालिका निवडणूक स्वतंत्र लढवणार आहे.
- भरत पाटील, प्रभारी, पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस
----------