पिंपरी-चिंचवड

महायुती का तुटली ? आघाडी का फुटली ??

CD

जयंत जाधव
सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ३१ : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी सर्वच प्रमुख पक्षांनी कंबर कसली असून महायुतीतील भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांच्यातील चर्चा शेवटच्या टप्प्यात तीन जागांवरून फिसकटली. तर; महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना यावेळी कसलीच जोखीम न घेता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याची घोषणा केली. त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, काँग्रेस व राष्ट्रीय समाज पक्ष यांच्यामधील चर्चेतही जागावाटपाबाबत शेवटच्या टप्प्यात एकमत झाले नाही. त्यामुळे काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला. अशा कारणांमुळे महायुती तुटली तर; महाविकास आघाडीही फुटली.
महापालिकेत भाजपला मागील २०१७ च्या निवडणुकीत १२८ पैकी ७७ जागा मिळाल्या होत्या. तर; शिवसेनेला ९ जागा मिळालेल्या होत्या. भाजपला ५ अपक्ष नगरसेवकांनी पाठिंबा दिला होता. विधानसभा निवडणुकीतील यशामुळे भाजपचा स्वबळाचा आत्मविश्‍वास अगोदरच वाढला होता. शिवसेनेचे नऊ पैकी बहुतांश माजी नगरसेवक भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या गळाला लागले होते. त्यातही चर्चेची खलबते सुरु होती.
शिवसेनेने सुरवातीला २९ जागांची मागणी केली होती. नंतर चर्चेत त्या जागा १६, १३ व ११ अशी मागणी कमी झाली. शारदा बाबर व मीनल यादव यांच्या दोन जागा ते देत होते. परंतु; त्यांनी प्रचार सुरु केला होता. त्यामुळे त्यावर व शहर प्रमुख नीलेश तरस यांच्या जागेवरून एकमत झाले नाही. शिवसेनेचे नेते, खासदार श्रीरंग बारणे यांनी माध्यमांशी बोलताना, ‘शेवटी आम्ही १० जागांवर आलो. आपण स्वत: युती होण्यासाठी खूप प्रयत्न केले, मी व पक्षाचे प्रमुख, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. वरिष्ठ नेत्याची युती व्हावी अशी इच्छा होती. परंतु; स्थानिक नेत्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे युती झाली नाही,’ अशा शब्दांत खंत व्यक्त केली.
वास्तविक थेरगाव-गणेशनगर-दत्तनगर प्रभाग क्रमांक २४ मध्ये खासदार बारणे यांचे पुत्र विश्‍वजीत व पुतणे माजी नगरसेवक नीलेश बारणे यांच्यासह रावेत-किवळे-मामुर्डी प्रभाग क्रमांक १६ मध्ये शिवसेना शहरप्रमुख नीलेश तरस या तीन जागांवरून महायुतीची चर्चा अडकली होती. भाजपने प्रभाग २४ मध्ये दोन पैकी एक जागा देऊ असे सांगत व किवळेतील जागेबाबतही नकार दिला. त्यामुळे बारणे यांच्यासमोर मुलाला बसवायाचे की पुतण्याला या प्रश्नासह पक्षाच्या शहर प्रमुखालाही न्याय देता येणार नाही, असा पेच निर्माण झाला. तेही भाजपने जाणीवपूर्वक शेवटच्या काही तासांत महायुती होत नसल्याचे संकेत दिले. परिणामी बारणे यांना स्वबळावर लढण्याचा नारा देण्याशिवाय पर्याय उरला नाही. अवघ्या दोन तासांत ७० अर्ज वाटप केल्याचा दावा बारणे यांनी केला असला तरी पदाधिकाऱ्यांना त्यांनी आदल्या दिवशीच स्वबळाचे संकेत दिले होते.

अजित पवार यांनी मोट बांधल्यामुळे निकराची झुंज
महापालिकेत सलग १५ वर्षे एकहाती सत्ता असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी निर्धार केला आहे. निवडणुकीपूर्वीच पाच-सहा महिने अगोदरच त्यांनी तयारी सुरु केली होती. पिंपरी व चिंचवड मतदारसंघांत ‘जनसंवाद’ कार्यक्रमाद्वारे त्यांनी नागरिकांशी थेट संपर्क साधला. प्रशासनावर पकड असल्यामुळे अधिकाऱ्यांची बैठक घेत त्यांनी लोकांचे प्रश्‍न तातडीने मार्गी लावले. या सर्व घडामोडींमध्ये त्यांना पुन्हा सत्तेत येण्यासाठी कुठलीही जोखीम पत्करायची नव्हती. त्यामुळे त्यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाबरोबर आघाडीची घोषणा केली. तत्पूर्वी, त्यांनी आदल्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरद पवार यांचे कट्टर समर्थक असलेले शहरातील ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला. शहरातील पक्षाच्या जुन्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोट बांधण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला. त्यामुळेच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यामुळे महाविकास आघाडीत पहिली फूट पडली.

काँग्रेसच्या अडेलपणामुळे उर्वरित आघाडीही फुटली

मागील तीन महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस, मनसे व रासप यांच्यात महाविकास आघाडीबाबत बैठका सुरु होत्या. पहिल्या दोन बैठकांना काँग्रेसचे तत्कालीन शहराध्यक्ष कैलास कदम उपस्थित राहिले नाहीत, नंतर एक बैठक कदम यांच्याकडेच झाली. त्यानंतर कदम यांनी पदाचा राजीनामा दिला. आघाडीला काँग्रेसच्या प्रदेश नेतृत्वाचा हिरवा कंदील नसल्यामुळे उर्वरित पक्षांनी जागा वाटप करून घेतले. पुन्हा काँग्रेसच्या नेत्यांचा हिरवा कंदील मिळाल्यामुळे बैठक घेऊन ३० ते ३५ जागा देण्यात आल्या. दरम्यान; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर गेला. काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव पृथ्वीराज साठे व प्रदेश सरचिटणीस बाबू नायर यांच्याबरोबर जागा वाटपाची चर्चा सुरु होती. पुन्हा काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्यासह अन्य घटक पक्षांची बैठक घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दिलेल्या जागा अन्य पक्षांमध्ये वाटून घेण्याबाबत चर्चा झाली. या बैठकीमध्ये महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा सायली नढे यांच्यासाठी काळेवाडी-विजयनगर प्रभाग क्रमांक २२ ही जागा मागण्यात आली. याच जागेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सुजाता नखातेही प्रबळ दावेदार होत्या. त्यामुळे वाद झाला. मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्तावही देण्यात आला. जोशी यांना स्थानिक माहिती नसल्याने ते ठराविक जागेवर आडून बसले. त्यांच्या सहभागामुळे साठे व नायर यांनी आघाडीच्या बैठकांमधून अंग काढून घेतले व उर्वरित महाविकास आघाडीही फुटली. त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस, मनसे व रासप यांच्यात आघाडी होन जागा वाटप झाले. एकंदरीत वरिष्ठ नेत्यांचे दुर्लक्ष व स्वत:च्या पक्षाच्या सद्यःस्थितीतील आवाक्याचा अंदाज नसल्यामुळे समन्वयात व चर्चेत घडलेल्या अपयशामुळे काँग्रेसने विरोधी पक्षांची चांगली मोट बांधण्याची संधी गमावली.
......

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli breaks Viv Richards' record : विराट कोहलीने २०२५च्या शेवटच्या दिवशी मोडला विव्ह रिचर्ड्स यांचाही विक्रम!

Sankalp Kalkotwar : शिक्षक वडिलांनी दिलं पंखात बळ, आता नागपूरच्या मैदानात चमकतोय अहेरीचा खेळाडू

Beed Crime: परप्रांतीय ऊसतोड मजुरांच्या दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Pune Election Drama : एबी फॉर्मचा घोळ; नाराज इच्छुकांचे अर्ज; पुण्यात सर्वच पक्षांसमोर बंडखोरीचे संकट!

Chandrapur Crime : पद्मश्री नामांकित डॉक्टरांचा तपास; अवैध किडनी व्यवहारातील मोठे खुलासे; चंद्रपूर पोलिसांची विशेष कारवाई सुरु!

SCROLL FOR NEXT