पिंपरी, ता. १९ : शहर परिसर आणि उपनगरांत सोमवारपासून सुरू असलेल्या पावसाने मंगळवारीही (ता.१९) जोरदार हजेरी लावली. पहाटेपासूनच संततधार असलेल्या पावसाने मध्येच जोरदार रूप धारण केले. त्यामुळे कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्यांची गैरसोय झाली. सर्वच उपनगरांमध्ये ठिकठिकाणी पाणी साचले. पाऊस, खड्डे, साचलेले पाणी यामुळे वाहनचालकांची कसरत असे चित्र दिसून आले. तर, वेग मंदावल्याने सकाळच्या सुमारास रस्त्यांवर वाहनांच्या रांगा दिसून आल्या.
गेल्या महिन्यात उघडीप दिल्यानंतर सोमवारपासून (ता.१९) शहरात सर्वत्र पावसाने हजेरी लावली. त्यामुळे आठवड्याच्या सुरवातीलाच नागरिकांना वाहतूक कोंडीच्या त्रासाला सामोरे जावे लागले. मंगळवारीही पावसाचा जोर कायम राहिल्याने बहुतांश कर्मचाऱ्यांनी चारचाकी घेऊन कार्यालयात जाणे पसंत केले. सध्या शहरात मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची कामे सुरू आहेत. तसेच जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील बीआरटी मार्गाचे काम सुरू असल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे. खराब रस्ते, सुरू असलेली कामे आणि रस्त्यात साठलेले पाणी यामुळे सकाळी व सायंकाळी रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसल्या. तर, चाकण, तळवडे हिंजवडी या भागांत जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही वाहतूक कोंडी आणि खड्डेमय रस्त्यांमुळे वाट आणखी बिकट झाली.
उपनगरांमध्येही हजेरी; वीजपुरवठाही खंडित
पिंपरी चिंचवडमध्ये पिंपरी, चिंचवड, भोसरी, निगडी, दापोडी, वाकड, सांगवी, पिंपळे गुरव यांच्यासह सर्वच उपनगरांमध्ये जोरदार पाऊस झाला. त्यामुळे बहुतांश नागरिकांनी घरीच राहणे पसंत केले. दुपारी तुरळक वाहतूक दिसून आली. दुपारनंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाला; मात्र रिमझिम पाऊस सुरूच असल्याने रेनकोट, छत्री असा जामानिमा करून नागरिक घराबाहेर पडलेले दिसले. तर, काही भागांमधील वीजपुरवठा खंडित झाला.
धरणांमधून करण्यात येणारा विसर्ग ( सायंकाळी सहापर्यंत)
पवना धरण (पवना नदी)- ९,९५० क्युसेक
कासारसाई धरण (पवना नदी) - १,४६० क्युसेक
मुळशी धरण (मुळा नदी) - १९,५०० क्युसेक
वडिवळे धरण (इंद्रायणी नदी) - ७,५७४ क्युसेक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.