माय फ्रेंड श्रीगणेशा आठ ः पीतांबर लोहार
--
गणपती
आपला गणपती बाप्पा बुद्धिदाता आहे. सुखकर्ता आहे. दुःखहर्ता आहे. म्हणून त्याला नित्य उपासनेत अग्रस्थान आहे. त्यामुळेच अनेक जण गणपतीची व्रते करतात. मग ही व्रते कोणती?, असे श्रोत्यांना विचारत कीर्तनकार महाराज स्वतःच व्रतांची नावे सांगू लागले,
संकष्टी चतुर्थी, विनायकी चतुर्थी, अंगारकी चतुर्थी, श्रीसत्यविनायक अशी व्रते केली जातात. आता संकष्टी चतुर्थीचे व्रत कधी करायचे? आणि अंगारकी चतुर्थी व्रत कधी करायचे? हे तुम्हाला चांगलेच माहिती आहे. तरीही माहिती म्हणून विचारतो. जबाबदारीने उत्तर द्या.
‘संकष्टी चतुर्थी व्रत कधी करतात?’
श्रोत्यांमधून आवाज आला, ‘प्रत्येक महिन्याच्या कृष्णपक्षातील चतुर्थीच्या दिवशी.’
‘अगदी बरोबर, मग अंगारकी चतुर्थी व्रत कधी करतात?’
‘कृष्ण पक्षातील चतुर्थी मंगळवारी आल्यास अंगारकी चतुर्थी व्रत केले जाते,’ श्रोत्यांमधून सामूहिक आवाज आला.
‘अगदी बरोबर, जसे प्रत्येक महिन्याच्या कृष्णपक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात. तसे हीच चतुर्थी मंगळवारी आल्यास अंगारकी म्हणून व्रत केले जाते. पण, काही जण विनायकी चतुर्थीचे व्रत करतात. हे व्रत कधी करतात? माहिती आहे का?’ कीर्तनकारांनी विचारले.
श्रोत्यांमधून सामूहिक आवाज आल्यानंतर कीर्तनकार म्हणाले, अगदी बरोबर, कोणत्याही मराठी महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायकी चतुर्थी असं म्हणतात. तिलाच वरद चतुर्थी असंही म्हणतात’ असे सांगून कीर्तनकार महाराजांनी ‘विठ्ठलऽऽऽऽ विठ्ठलऽऽऽ विठ्ठलऽऽ विठ्ठलऽ....’ असा गजर केला. त्यांना टाळकरी व पखवाज वादक साधकांसह गायक साधकांनीही साद दिली आणि ‘विठ्ठलऽऽऽऽ विठ्ठलऽऽऽ विठ्ठलऽऽ विठ्ठलऽ....’ गजर झाला. अशा प्रकारे गणपतीला खूप महत्त्वाचे स्थान आहे. त्याची आराधना अनेक जण करतात. कोणत्याही पूजेविधीपूर्वी गणपतीला नमन करतात.
नमिली गणपती। माउली शारदा।
आता गुरुराया। दंडवत।।
या रचनेची आळवणी गायकांनी केली. त्यांना अन्य टाळकरी आणि मृदंगवादकाने साद दिली. दोन-तीन वेळा आरोह-अवरोह झाल्यानंतर गायकांना कीर्तनकार महाराजांनी थांबण्याचा इशारा केला आणि गणपतीचा आळवणी थांबली. हाच धागा पकडत कीर्तनकार महाराज म्हणाले, ‘नमिला गणपतीऽऽ’ म्हणजे गणपतीला प्रत्येक जण कोणत्याही पूजाकार्यप्रसंगी सर्वप्रथम नमन करते. कोणत्या गणपतीचे नमन केले जाते? त्याचे वर्णन संत तुकोबारायांनी केले आहे,’ असे म्हणून कीर्तनकार महाराजांनी गायकांना इशारा करत, ‘अभंगाचे तिसरे चरण’ असे म्हणत सुचविले. कीर्तनकार महाराजांचा इशारा लक्षात घेऊन गायकांनी संत तुकाराम महाराज यांच्या ‘धरोनियां फरश करी।’ या निरुपणासाठी घेतलेल्या अभंगातील तिसरे चरण गायला सुरुवात केली.
उंदिर असे जयाचें वाहन।
माथां जडितमुगुट पूर्ण।।
या चरणांची दोन-तीन वेळा आळवणी झाल्यानंतर अभंगाचे ध्रुवपद गायकांनी गायिले,
ऐसा गजानन महाराजा।
त्याचें चरणीं हालो लागो माझा।।
अभंगाचे गायन थांबल्यानंतर कीर्तनकार महाराज बोलू लागले, ‘ज्याचे वाहन उंदीर आहे आणि ज्याने माथ्यावर म्हणजे डोक्यावर रत्नजडित मुकुट परिधान केला आहे, अशा गणपतीला माझे नमन असो’, असे तुकोबाराय सांगतात. म्हणजेच उंदीर असे जयाचें वाहन। माथां जडितमुगुट पूर्ण।।’ असे जे वर्णन तुकोबारायांनी केले आहे, ते सरळ सरळ भगवान गणेशाबद्दल आहे. गणपतीबद्दल आहे, हे स्पष्ट होते. म्हणजे, ज्याचे वाहन उंदीर आहे, ज्याच्या डोक्यावर मुकुट आहे, अशा गजानन महाराजांच्या चरणी, गणपतीच्या चरणी माझा नमस्कार असो’ असे तुकोबाराय म्हणतात.
विठोबा रुखमाईऽऽ
विठोबा रुखमाईऽऽऽ
जय जय विठोबा रुखमाईऽऽ
जय जय विठोबा रुखमाईऽऽ
कीर्तनकार महाराज भजनात दंग झाले. गायकांसह टाळकरी भजनात दंग झाले. पावली खेळू लागले. मृदंगवादकही भजनात तल्लीन झाले. आयोजकांपैकी तिघे जण उठले. त्यांच्या हातात एक ताट होते. त्यात
बुका होता आणि तुळशीचा हार होता. एक छोटा हार होता. आयोजकांपैकी एकाने महाराजांजवळ जाऊन त्यांच्या कपाळाला बुका लावला. महाराजांनीही आयोजकांच्या कपाळाला बुका लावला. आयोजकांनी तुळशीचा हार कीर्तनकार महाराजांच्या गळ्यात घालून त्यांच्या पाया पडले. दुसऱ्या आयोजकाने महाराजांचे दर्शन घेऊन हाती ताट घेतले. वीणेकऱ्यांजवळ आले. त्यांना बुका लावला आणि वीणेला हार घातला. त्यांच्या पाया पडले. वीणेकऱ्यांनीही आयोजकांच्या कपाळाला बुका लावला. त्यानंतर त्या आयोजक तरुणाने सर्व टाळकरी, गायक व मृदंगावादकांना एक एक करून बुका लावला आणि श्रोत्यांमध्ये बसून ‘विठोबा रुखमाईऽऽ’ नामस्मरणात दंग झाला. कीर्तनकार महाराजांनीही श्रोत्यांना उद्देशून ‘टाळी’ अशी साद घालत ‘विठोबा रुखमाईऽऽ’चा एकच गजर केला. सर्व श्रोते हात उंचावून टाळी वाजवत ‘विठोबा रुखमाईऽऽ’ नामस्मरणात दंग झाले.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.