कारच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
पिंपरी : कारने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी युवकाचा मृत्यू झाला. ही घटना सुस-नांदे रस्त्यावर तापकीर फार्म हाऊससमोर घडली. या प्रकरणी प्रशांत तुकाराम गोफणे (२९, रा. पाषाण) यांनी बावधन पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी आणि त्यांचा मित्र अक्षय भागवत करे हे दुचाकीवरून जात असताना, समोरून आलेल्या स्वीप्ट कारने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. या अपघातात फिर्यादी जखमी झाले. तर, अक्षय करे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर आरोपी पसार झाला.
वाहनचोरी प्रकरणात दोघांना अटक
पिंपरी : मोशीतील नागेश्वर महाराज उप बाजार समितीत भुसार मार्केट येथून वाहन चोरी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिसांत गुन्हा दाखल आहे. राजकुमार महालिंग बागल (३५, आल्हाट वस्ती, मोशी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांनी त्यांची हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकल चोरली. पोलिसांनी तपास करून संतोष उर्फ शरद गजानन इंगोले (वय २९) आणि ज्ञानेश्वर गजानन इंगोले (वय ३२, दोघे रा. कुटे कॉलनी, आळंदी) यांना अटक केली आहे. फिर्यादीने त्यांची दुचाकी दुकानासमोर उभी केली होती.
कोयता बाळगणाऱ्या दोघांना अटक
पिंपरी : शस्त्रे बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. ही कारवाई थेरगाव स्मशान भूमीजवळ, जगतापनगर येथे करण्यात आली. पोलिस कॉन्स्टेबल तौसिफ शेख यांनी काळेवाडी पोलिसांत फिर्याद दिली आहे. चैतन्य नागनाथ माने (१९, शिवतीर्थनगर, थेरगाव) आणि विशाल उर्फ मन्या उर्फ विशाल भीमराव कांबळे (२१, थेरगाव) यांना अटक करण्यात आली आहे. चैतन्य मानेकडे लोखंडी कोयता आणि विशाल कांबळेकडे चार कोयते असे एकूण पाच लोखंडी कोयते पोलिसांना आढळून आले.
पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना अटक
पिंपरी : पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगल्याप्रकरणी तरुणाला अटक करण्यात आली. ही कारवाई मंगळवारी रात्री फुगेवाडी उड्डाणपुलाखाली करण्यात आली. पोलिस कॉन्स्टेबल नवनाथ पोटे यांनी या प्रकरणी दापोडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सागर श्याम गायकवाड (२१, दापोडी) याला अटक करण्यात आली आहे. तर, अन्य एका कारवाईत वाकड परिसरात प्रमोद अंकुश कळंबे (२१, पर्वती दर्शन, पुणे) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडेही पिस्तूल आणि जिवंत काडतूस आढळले. या प्रकरणी सहाय्यक फौजदार नरेश बलसाने यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
गावठी कट्टा बाळगणाऱ्या तरूणास अटक
मोरे वस्ती, चिखली येथील मोकळ्या मैदानात एका तरुणाला बेकायदेशीरपणे गावठी बनावटीचा कट्टा बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब गर्जे यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राजनकुमार इंद्रदेव राजभर (२९, मोरेवस्ती, चिखली) याला अटक करण्यात आली आहे.
लग्नाच्या आमिषाने १४ लाखांची फसवणूक
पिंपरी : विवाहविषयक संकेतस्थळावरून झालेल्या ओळखीतून तरुणाने लग्नाचे आश्वासन देऊन महिलेची १४ लाख ४४ हजार ७०० रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणात शार्दुल अविनाश म्हेत्रे (३५, मार्केटयार्ड, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी देहुरोड देहूरोड येथील ३३ वर्षीय महिलेने पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपीने त्याच्या आई-वडिलांच्या आजारपणाचे आणि वैयक्तिक अडचणींचे कारण सांगून फिर्यादीकडून वेळोवेळी धनादेश, क्रेडिट कार्ड आणि बँकेतून एकूण १४ लाख ४४ हजार ७०० रुपये घेतले. त्यापैकी तीन लाख ९३ हजार ९१ रुपये परत केले. तर, उर्वरित पैसे परत न करता लग्नासही नकार दिला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
रेस्टॉरंटला रेटिंगच्या नावाखाली दोन लाखांची फसवणूक
पिंपरी : हॉटेलला ऑनलाइन रेटिंग देऊन पैसे कमावण्याच्या नावे भोसरी येथील महिलेची दोन लाख १२० रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी ३१ वर्षीय महिलेने भोसरी पोलिसांत फिर्याद दिली आहे. आरोपीने महिलेसोबत टेलिग्रामवरून संपर्क साधला. त्यांना हॉटेल रेस्टॉरंटला फाइव्ह स्टार रेटिंग देऊन त्याचे स्क्रीनशॉट पाठवण्याचा टास्क दिला. सुरुवातीला काही पैसे पाठवले आणि त्यानंतर मिळालेले पैसे बिटकॉइनमध्ये गुंतवत अधिक नफ्याचे आश्वासन दिले. या बहाण्याने आरोपीने एक लाख १२ हजार ४० रुपयांची फसवणूक केली. ही रक्कम परत मिळवण्यासाठी फिर्यादीने आरोपीचा मोबाइल नंबर मिळवला. तेव्हा संबंधित व्यक्तीने केंद्र सरकारी अधिकारी असल्याचे सांगून फिर्यादीला ८८ हजार रुपये पाठविण्यास सांगितले. अशा प्रकारे ही फसवणूक करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.