माय फ्रेंड श्रीगणेशा नऊ ः पीतांबर लोहार
--
पांडुरंग स्वरूपा
संत तुकोबारायांनी गणपतीचे केलेल्या सुंदर वर्णनावर आपण मंथन करत आहोत. गणपती हा सुंदरच आहे. मात्र, त्याचे तुकोबारायांनी शब्दसुमनांनी केलेले वर्णनही सुंदरच आहे. अशा या सुंदर गणपती संदर्भात एक संस्कृत श्लोक आहे, कीर्तनकार महाराज सांगू लागले,
यं ब्रह्मावरुणेन्द्र-रुद्रमरुतः स्तुन्वन्ति दिव्यैः स्तवैः।
वेदैः साङ्गपद-क्रमोपनिषदै-र्गायन्ति यं सामगाः।।
ध्यानावस्थित-तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो।
यस्यान्तं न विदुः सुरासुरगणा देवाय तस्मै नमः।।
या संस्कृत श्लोकाचा अर्थ बघितल्यास लक्षात येते की, ब्रह्मा, वरुण, विष्णू, इंद्र आदी सर्वे देवांनी आणि वेदांतील सामवेदाने गायन केलेल्या, ध्यानावस्थेतील मुनीजनांनी चिंतन केलेल्या आणि सुर-असुर गणांचा जो देव आहे, त्याला नमस्कार असो. या वरून असे लक्षात येते की, गणपती बाप्पा हा अखिल ब्रह्माण्डाचा नायक आहे. देव आणि दानवांचेही दैवत आहे. तो विद्यापती आहे. संतांनी वर्णन केलेला देवदेवेश्वर गणपती आहे. गणपतीने दैत्यांच्या किंवा राक्षसांच्या वधासाठी कोणा देवतेची आराधना केली, असे कुठेही आढळत नाही किंवा माझ्या तरी वाचनात वा श्रवणात आलेले नाही. उलट देवदेवतांसह सकल मानव जातीवरील विघ्ने गणपतीने दूर केलेली आहेत. म्हणूनच तो विघ्नहर्ता ठरतो. तुकोबारायांनी त्याला ‘विघ्नें वारी’ म्हटले आहे. अशा गणपतीला कोणत्याही पूजाविधीमध्ये अग्रस्थान आजही दिले जाते. त्या गणपतीच्या गळ्यामध्ये नागाचे यज्ञोपवीत आहे. यज्ञोपवीत म्हणजे गणपतीच्या गळ्यामध्ये नागाचे जानवे आहे. आणि त्या गणपतीने शुभ वस्र परिधान केले आहे. अशा या नागाचे यज्ञोपवीत घातलेल्या आणि शुभ्र वस्र परिधान केलेल्या गणपतीचे सुंदर असे वर्णन तुकोबाराय करतात.
नागयज्ञोपवीत रुळे।
शुभ्र वस्त्र शोभित साजिरें।।
कीर्तनकार महाराजांनी इशारा करताच गायक साधकांनी सुंदर अशा आवाजात अभंगाचे चौथे चरण ‘नागयज्ञोपवीत रुळे।...’ गायला सुरुवात केले. त्यांना पखवाज वादक साधकांनी सुंदर अशी साद दिली. टाळकरी टाळ वाजवत गायकाच्या मागे अभंगाचे गायन करू लागले. दोन वेळा ‘नागयज्ञोपवीत रुळे।...’ या चरणाची आळवणी झाल्यानंतर कीर्तनकार महाराज म्हणाले, गणपतीने नागाचे जाणवे घातले आहे. शुभ्र वस्र नेसले आहे. ‘ऐसा गजानन महाराजा।’ आहे. त्याचाच हा उत्सव आहे. हा गणपती म्हणजे अखिल ब्रह्माण्डाचा नायक आहे. देव आणि दानवांचाही देव आहे. तो सर्वांचा लाडका आहे. केवळ हिंदुस्थानातच नव्हे तर परदेशातही त्याचे पूजन केले जाते, असा ‘ऐसा गजानन महाराजा’ आहे. अखंड हिंदुस्थानातील असे एकही शहर नसेल किंवा गाव नसेल की जिथे गणपतीची आराधना केली जात नाही. असे एकही गाव नाही की त्या गावामध्ये गणपतीचे मंदिर नाही आणि असे एकाही हिंदूचे घर नाही की तिथे गणपतीची मूर्ती किंवा प्रतिमा नाही. असा हा गणपती महाराजा, गजानन महाराजा विद्यार्थ्यांचा, कलावंतांचा, कवींचा, लेखकांचा, संतांचा आणि साधकांचा सर्वांचा लाडका आहे. म्हणून आपण सर्वजण त्याचा ‘गणपती बाप्पाऽ मोरयाऽऽ’ म्हणून जयजयकार करतो. अशा या गणपतीबाबत जगद्गुरू संत तुकोबारायांचा एक अभंग आहे. त्याचा सारांश असा आहे की, एकदा संत तुकाराम महाराज आणि चिंचवड येथील महासाधू मोरया गोसावी यांचे उत्तराधिकारी चिंतामणी महाराज यांच्यात गणपतीला भोजनाला बोलविण्यासंदर्भात संवाद झाला. त्याचे वर्णन अभंगातून तुकोबारायांनी केले आहे.
गायकांनी सूर धरला आणि गायन करू लागले,
चिंतामणी देवा गणपतीसी आणा।
करवावें भोजना दुजे पात्रीं।।
देव म्हणती तुकया एवडी कैची थोरी।
अभिमानाभीतरी नागवलों।
वाडवेळ जाला सिळें जाले अन्न।
तटस्थ ब्राह्मण बैसलेती।।
तुका म्हणे देवा तुमच्या सुकृतें।
आणीन त्वरित मोरयासी।।
अभंग गायन झाल्यानंतर कीर्तनकार महाराज म्हणाले, ‘चिंतामणी देवा गणपतीसी आणा। करवावें भोजना दुजे पात्रीं।।’ हा अभंग म्हणजे संत तुकोबाराय आणि चिंचवड येथील महासाधू मोरया गोसावी यांच्या कार्याकाळानंतरचे गाणपत्य साधक चिंतामणी महाराज यांच्यातील संवाद आहे. तुकोबारायांनी चिंतामणी महाराजांना साकडे
घातले आहे की, अहो, चिंतामणी देवा तुमचे दैवत गणपती यांना जेवण्यास बोलवा आणि दुसरे पात्र तुमच्या शेजारी टाकून त्यांना भोजन करण्यास बसवा. त्यावेळी चिंतामणी महाराज म्हणाले, ‘तुकया एवडी कैची थोरी। अभिमानाभीतरी नागवलों।’ म्हणजे अहो तुकोबा आमची एवढी मोठी थोरवी नाही, तर अभिमानाने फजिती झाली आहे. खूप उशीर झाल्यामुळे अन्न शिळे होत आहे. ब्राह्मण आपापल्या ताटावर तटस्थ बसलेले आहेत.’ त्यावर तुकोबाराय म्हणतात की, ‘देवा तुमच्या सुकृतें। आणीन त्वरीत मोरयासी।’ म्हणजे अहो चिंतामणी देवा मी तुमच्या पुण्याईने देवाला म्हणजे गणपती रायाला बोलावून आणू शकतो. आणि असे म्हटले जाते की, खरोखर तुकोबारायांनी विनंती करताच पांडुरंगराया गणपतीच्या रूपात तिथे आले आणि भोजन करून गेले.
विठ्ठलऽऽऽऽ विठ्ठलऽऽऽ विठ्ठलऽऽ विठ्ठलऽ....
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.