पिंपरी, ता. १९ ः ‘‘शहराच्या स्वच्छतेचा कणा म्हणजे सफाई सेवक आहेत. त्यांच्यामुळेच आपले शहर स्वच्छ, स्वास्थ्यदायी आणि सुंदर राहत आहे,’’ असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महापालिका उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी केले.
पिंपळे गुरव येथील लिनिअर गार्डनमध्ये ‘सफाई सेवकांशी संवाद’ कार्यक्रमात ते बोलत होते. सहाय्यक आरोग्य अधिकारी शांताराम माने, मुख्य आरोग्य निरीक्षक शंकर घाटे, प्रणय चव्हाण आदी उपस्थित होते. शहराच्या स्वच्छतेसाठी निःस्वार्थपणे कार्य करणाऱ्या सफाई सेवकांचा सन्मान करण्यात आला. ठेंगल म्हणाले, ‘‘नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढवून ‘स्वच्छ पिंपरी चिंचवड ः सुंदर पिंपरी चिंचवड’ हा संकल्प प्रत्यक्षात उतरविण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे. नागरिकांनी घरातील वापरात नसलेल्या पण चांगल्या अवस्थेतील वस्तू पालिकेच्या आर.आर.आर. केंद्रात जमा कराव्यात. जेणेकरून गरजू नागरिकांना त्याचा लाभ मिळू शकेल.’’ सार्वजनिक स्वच्छतागृहे नेहमी स्वच्छ ठेवणे, त्यांचा नियमित वापर करणे, सोसायटी, परिसर आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता राखणे याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. आरोग्य विभागातर्फे स्वच्छता, आरोग्य आणि जनजागृती संदर्भात विविध अभिनव उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.