पिंपरी, ता. १९ : राज्यात तब्बल ६० ठिकाणी घरफोडी करणाऱ्या सराईताला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा पथकाने अटक केली. त्याच्याकडून सात लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगत केले असून त्याचे दोन साथिदार फरारी आहेत.
धनंजय हरिश काळे (वय २९, रा. गणेशनगर, पिंपळे गुरव), चंद्रकांत अनंता माने (अजंठानगर) आणि सुनील मल्हारी तलवारे (काळेवाडी) अशी चोरट्यांची नावे आहेत. गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘‘प्राधिकरण निगडी परिसरात एक संशयित दागिने विक्रीसाठी येणार असल्याची माहिती उपनिरीक्षक शिवानंद स्वामी व हवालदार देवा राऊत यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून काळे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून गंठन, साखळी आणि अंगठ्या असा मुद्देमाल जप्त केला. त्याने चंद्रकांत माने आणि सुनील तलवारे यांच्या मदतीने पिंपळे गुरव प्रभातनगर व निगडीतील भिमशक्तीनगर परिसरात घरफोड्या केल्याची कबुली दिली. रेकी करून घरफोड्या ते करत होते.
.....