पिंपरी, ता. २० ः पिंपरी चिंचवड महापालिकेच्या १२ प्रभागांमध्ये लोकसंख्येपेक्षा मतदारसंख्या अधिक आहे. कारण, कोविड प्रतिबंधक नियमांमुळे २०२१ मध्ये जनगणना झालेली नाही. त्यामुळे २०११ च्या जनगणनेनुसारची लोकसंख्या ग्राह्य धरून महापालिका निवडणूक होत आहे. दरम्यानच्या १५ वर्षांमध्ये शहरातील बांधकामे वाढली, परिणामी लोकसंख्या वाढली आहे. २०११ च्या लोकसंख्येच्या तुलनेत आताची मतदारसंख्या जास्त दिसत आहे.
कोरोना प्रतिबंधक नियम, इतर मागासवर्गीय आरक्षणाचा न्यायप्रविष्ट मुद्दा आणि राज्यातील बदलती राजकीय परिस्थिती यामुळे १३ मार्च २०२२ रोजी मुदत संपलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक प्रलंबित राहिली. आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ३१ जानेवारी २०२६ पूर्वी निवडणूक होणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्य सरकारने चार सदस्यीय प्रभाग पद्धती निश्चित केली आहे. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने ३२ प्रभागांतील १२८ जागांसाठी प्रभाग रचना केली आहे. त्यांची आरक्षण सोडतही काढली आहे. आता प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. त्यामध्ये १२ प्रभागांत लोकसंख्येपेक्षा मतदारसंख्या अधिक दिसत आहे.
दुबार मतदारयादी प्रसिद्ध
पिंपरी चिंचवडमधील दुबार मतदारांची यादी राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिकेच्या निवडणूक विभागाला प्राप्त झाली आहे. ती पाहण्यासाठी अ, ब, क, ड, ई, फ, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालयांमध्ये, तसेच सावित्रीबाई फुले सभागृह आणि महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील निवडणूक विभागात उपलब्ध आहे. तसेच, महापालिकेच्या संकेतस्थळावरही https://www.pcmcindia.gov.in दुबार मतदारयादी अपलोड केली आहे. या यादीत मतदारांची नावे अनुक्रमांक एक पासून सुरू होत असून यादीतील शेवटचा अनुक्रमांक हा ९२ हजार ६६४ आहे, अशी माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली.
मतदार यादी विक्रीतून कोट्यवधी जमा
निवडणूक विभागाकडून मतदारयाद्या विक्रीसाठी ठेवल्या आहेत. एका पृष्ठासाठी (पान) दोन रुपये शुल्क आकारले जाणार आहेत. ३२ प्रभागांच्या मतदार याद्यांमिळून एक लाख २८ हजार ३०७ पाने आहेत. म्हणजेच सर्व प्रभागांच्या मतदारयाद्या खरेदी करण्यासाठी दोन लाख ५६ हजार ६१४ रुपये शुल्क भरावे लागणार आहे. एक प्रभागात चार जागा आहेत. एका जागेसाठी प्रत्येकी पाच उमेदवार इच्छुक आहेत, असे गृहित धरल्यास एका प्रभागात किमान २० उमेदवार म्हणजेच ३२ प्रभाग मिळून किमान ६४० उमेदवार असू शकतील. प्रत्येकाने मतदार याद्या विकत घेतल्यास १६ कोटी ४२ लाख ३२ हजार ९६० रुपये मोजावे लागतील.
१,७४० मतदार वगळले
मयत, पत्त्यात बदल अशा एक हजार ७४० मतदारांची नावे मतदान यादीतून वगळण्यात आली आहेत. यामध्ये ९१३ पुरुष आणि ८२७ महिला मतदारांचा समावेश आहे.
१९ प्रभागांत ५० हजारांवर मतदार
महापालिकेच्या १, २, ३, ४, ९, १०, ११, १४, १६, १७, १८, १९, २१, २२, २५, २६, २७, २९, ३० अशा १९ प्रभागांमध्ये मतदारांची संख्या ५० हजारांपेक्षा अधिक आहे.
हेही नसे थोडके
- ९ प्रभागांमध्ये ४० ते ५० हजारांच्या दरम्यान मतदार आहेत
- ४ प्रभागांमध्ये ४० हजारांपेक्षा कमी मतदार आहेत
- पाटीलनगर मोरेवस्ती प्रभाग एकमध्ये सर्वाधिक ७४ हजार ३४० मतदार आहेत
- थेरगाव गावठाण प्रभाग २३ मध्ये सर्वांत कमी ३४ हजार ७६५ मतदार आहेत
प्रभागनिहाय लोकसंख्येपेक्षा अधिक मतदार
प्रभाग क्रमांक / प्रभागाचे नाव / मतदारसंख्या / लोकसंख्या
१ / पाटीलनगर मोरेवस्ती / ७४,३४० / ६५,३२०
२ / बोऱ्हाडेवाडी जाधववाडी / ६५,०१७ / ५७,६९४
३ / मोशी डुडुळगाव चऱ्होली / ७२,४११ / ५१,६२८
९ / नेहरूनगर मासुळकर कॉलनी / ६३,३३० / ५९,३९०
११ / घरकुल कोयनानगर / ६५,७०७ / ५२,८७८
१४ / मोहननगर काळभोरनगर / ५७,८१८/ ५६,४२७
१६ / रावेत किवळे मामुर्डी / ७२,२२३ / ५९,३३०
१९ / पिंपरी कॅम्प, विजयनगर / ५५,१६७ / ५४,७६९
२५ / वाकड ताथवडे पुनावळे / ६४,७४० / ५२,६७९
२६ / पिंपळे निलख विशालनगर / ६८,३१७ / ४९,८४७
२७ / रहाटणी श्रीनगर / ५३,९२६ / ५०,३२१
२९ / पिंपळे गुरव सुदर्शननगर / ५५,३३४ / ४९,१४६
असे आहेत मतदार
पुरुष / ९,०४,८१५
महिला / ८,०७,१३९
इतर / १९७
दृष्टिक्षेपात मतदार व लोकसंख्या
मतदार / १७,१२,१५१
लोकसंख्या / १७,२७,६९२
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.