पिंपरी, ता. २२ ः शहरातील विविध सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांच्या प्रशासकीय अडचणी, कायदेशीर प्रक्रिया आणि सदस्यांचे हक्क याबाबत मार्गदर्शनासाठी आयोजित सहकार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सहकार तज्ज्ञ ॲड. अजित बोराडे यांनी महत्त्वाच्या कायदेशीर बाबींबाबत सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. सहकारी संस्थांना कामे करताना येणाऱ्या अडचणी कशा सोडवाव्यात आणि निर्णय घेऊन अंमलबजावणी करण्याबाबत त्यांनी माहिती दिली. एका कुटुंब म्हणून दृष्टिकोन ठेवल्यास वाद कमी होऊन सोसायटी प्रगतिपथावर नेण्यास मदत होते, असे नमूद करताना त्यांनी विविध खटल्यांचे दाखले दिले.
या मेळाव्याला पिंपरी, चिंचवड, पुण्यासह सोलापुर, अहिल्यानगर, सातारा आदी शहरांमधील सोसायट्यांचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.
ॲड. बोराडे यांनी स्वयंपुनर्विकासाबाबतही माहिती दिली. स्वतः सदनिकाधारक म्हणजेच सोसायटीने पुनर्विकास केल्यास दुप्पट किंवा त्याहून जास्त जागेची घर मिळू शकतात. बांधकाम व्यावसायिकाला मिळणारा लाभ सदनिकाधारकांना होईल. वेगवेगळ्या पायाभूत सुविधांचा विकास करता येईल. सर्वसामान्य सदनिकाधारकांची फसवणूक होणार नाही. स्वयंपुनर्विकास सोसायटी स्वतः करीत तो वेळेत पूर्ण होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.
-----