पिंपरी, ता. २२ : थेरगावच्या गणेशनगरमधील शिव कॉलनी परिसरातील राहदारीचा मुख्य रस्ताच अनधिकृत बांधकामामुळे अडविण्यात आला आहे. मिक्सर लावून खडी, सिमेंट आणि इतर साहित्य रस्त्यात टाकून ठेकेदाराने बिनधास्तपणे काम सुरु केल्याने परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. शनिवारी (ता. २२) दिवसभर रस्ता बंद असल्याने अनेकांना दुहेरी वळसा मारावा लागला. या भागात अनधिकृत बांधकामांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे बकालपणा वाढला आहे.
रस्त्यातच बांधकाम साहित्य टाकल्याने रस्ता वाहतुकीसाठी पूर्ण बंद झाला आहे. त्यामुळे जाण्या-येण्यासह वाहने लावण्याचीही मोठी समस्या निर्माण झाली आहे. नागरी सुविधांवर ताण पडला आहे. याच परिसरात ११ अनधिकृत बांधकामे झाल्याची माहिती आहे. प्रत्येक वेळी रस्त्यावर साहित्य टाकले जाते. जलवाहिन्या तोडल्या जातात. सांडपाणी वाहिन्या तुंबविल्या जातात.
इतके अवैध प्रकार घडत असूनही महापालिका केवळ नोटिसा बजावण्यापुरतीच कारवाई करीत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. दिवसाढवळ्या रस्ते अडवले जात असूनही बांधकाम विभागाचे अधिकारी किंवा अग्निशमन यंत्रणा कुठलीही सुरक्षिततेची काळजी घेताना दिसत नाही. असे विदारक वास्तव असतानाही अधिकारी मात्र, या सर्व प्रकाराला अभय देऊन अर्थपूर्ण दुर्लक्ष करत आहेत.
---
ठेकेदार-अधिकारी युती?
रस्त्यावर कोंडी करून सुरु असलेल्या अवैध बांधकामांना थेट अधिकाऱ्यांचेच अभय मिळत असल्याने अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांची हिम्मत वाढत आहे. बांधकाम ठेकेदार, बांधकाम मालक आणि महापालिका अधिकारी अशी अभद्र युती परिसर बकाल करत आहेत. महापालिकेतील अधिकाऱ्यांसोबत बांधकाम ठेकेदारांची असलेली मिलीभगत यामुळे शेकडो बांधकामे बिनबोभाट उभी राहत आहेत. ही बांधकामे करताना रस्तेच गहाण पडतायेत, नागरिकांचा जीव धोक्यात येतोय, स्थानिक क्षेत्रिय अधिकारी आणि बांधकाम विभाग मौनात राहून या प्रकाराला खतपाणी घालत असल्याचा आरोप होत आहे.
--------