पिंपरी, ता. २५ ः अनधिकृत तेही निळ्या पूररेषेत असल्यामुळे चिखलीतील ३६ बंगल्यांवर कारवाई करण्यात आली. यामुळे नागरिकांचे जागा घेणे, ती बांधणे, त्याची सजावट करणे यांसाठी झालेला लाखो रुपयांचा खर्च वाया गेला. या बांधकामांसह शहराच्या अन्य भागांतील अनधिकृत आणि विविध आरक्षणे व प्रतिबंधित क्षेत्रातील बांधकामेही रडारवर आहेत. त्यामुळे नागरिकांनी महापालिका बांधकाम विभागाची परवानगी घेऊनच बांधकामे करायला हवेत, हे चिखलीतील प्रकरणावरून स्पष्ट झाले आहे.
शहरातील अनधिकृत बांधकामे, विविध आरक्षणांवरील बांधकामे, नद्यांच्या पूररेषेतील, संरक्षण विभागाच्या रेडझोन हद्दीतील, कचरा डेपोच्या बफर झोन क्षेत्रातील आणि शहरातील हरित पट्ट्यातील बांधकामांवर कारवाई केली जाते. शिवाय, रस्ता रुंदीकरणासाठी अडथळा ठरणारी बांधकामे रीतसर जागा ताब्यात घेऊन अर्थात भूसंपादन करून जागा मालकाला मोबदला दिला जातो. त्यानंतर संबंधित भागात विकास कामे केली जातात. सध्या विकास आराखड्यातील विविध रस्ते (डीपी रोड), आरक्षणे विकासावर महापालिकेने लक्ष केंद्रित केले आहे. त्यांसह सर्वच प्रकारची अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांना नोटीस दिली आहे. त्यानुसार कारवाई सुरू आहे. अशा कारवाईला सामोरे जाण्यापेक्षा अधिकृतपणे परवानगी घेऊन बांधकाम करणे आवश्यक आहे.
बांधकाम परवानगी पद्धत
- बांधकाम परवानगी मिळवण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे अर्ज करावा
- बांधकाम परवानगीसाठीच्या अर्जासोबत मालमत्ता मालकीचे पुरावे (उदा. सातबारा, प्रॉपर्टी कार्ड) जोडावेत
- बांधकाम आराखडा (मान्यताप्राप्त वास्तुकला किंवा स्थापत्य अभियंत्याने तयार केलेला) जोडावा
- विकास शुल्क भरल्याची पावती व अन्य आवश्यक कागदपत्रेही जोडावेत
अर्ज करण्याची पद्धत
- बांधकाम करण्यासाठी महापालिकेच्या संकेतस्थळावर (https://pcmc.gov.in/) ऑनलाइन अर्ज करता येतो
- महापालिका किंवा संबंधित कार्यालयात जाऊन थेटही अर्ज करता येतो
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी
अर्जाची तपासणी आणि परवाना
- महापालिका तुमच्या अर्जाची तपासणी करेल आणि आवश्यक असल्यास अधिक माहिती किंवा कागदपत्रे मागवेल
- तपासणी पूर्ण झाल्यावर तुम्हाला बांधकाम परवाना मिळेल
- बांधकाम परवाना मिळाल्यानंतरच बांधकाम सुरू करता येईल
क्षेत्रीय कार्यालयनिहाय बांधकाम परवाने (१ जानेवारी ते २३ मे)
क्षेत्रीय कार्यालय / प्राप्त अर्ज / प्रक्रियेत / मंजूर अर्ज / नामंजूर
अ / १५६ / २६ / १३० / ००
ब / २८८ / ४१ / २४६ / ०१
क / ११७ / १५ / १०२ / ००
ड / १५८ / ३१ / १२७ / ००
इ / १८५ / ३१ / १५४ / ००
फ / १० /०१ / ०९ / ००
एकूण / ९१४ / १४५ / ७६८ /०१
‘‘आरक्षणे व पूररेषेमध्ये कोणीही बांधकामे बांधू नयेत. अशा बांधकामांवर कारवाई केली जाईल. नागरिकांनी रीतसर परवानगी घेऊनच बांधकाम करावे. बांधकाम परवानगी मिळण्यासाठीची पद्धत अतिशय सोपी असून सहजपणे नागरिकांना मिळू शकते.
- शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, महापालिका
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.