अश्विनी पवार : सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. २५ : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्प सुरू होण्यास २०२६ पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. सध्या या प्रकल्पाचे ८५ टक्क्यांपेक्षा जास्त काम पूर्ण झाले आहे. मात्र, घरापासून ऑफिसपर्यंत जाण्यासाठी आवश्यक ‘लास्ट माइल कनेक्टिव्हिटी’चे काम अद्यापही सुरू झाले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मेट्रो सुरू झाली, तरी स्टेशनपर्यंत पोचणार कसे? हा प्रश्न ‘आयटीयन्स’ अर्थात आयटी कर्मचाऱ्यांनी विचारला आहे.
‘लास्ट माइल कनेक्टिव्हिटी’ची गरज का?
हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेवरील स्थानकापासून कार्यालयापर्यंत किंवा घरा पर्यंत ये-जा करण्यासाठी फीडर बस, रिक्षा यांसारखी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारणे. स्टेशनपर्यंच चालत येणे सोयीचे व्हावे यासाठी वॉक-वे, पदपथ, भुयारी मार्ग उभारणे ही कामे ‘लास्ट माइल कनेक्टिव्हिटी’अंतर्गत येतात. सध्या हिंजवडी आयटी पार्क परिसरातील खराब रस्ते, तुटलेले पदपथ आणि अतिक्रमणांचे प्रमाण पाहता मेट्रो सुरू कतानाच या समस्यांवर उपाय काढणे गरजेचे आहे; तरच हिंजवडीतील वाहतूक कोंडी कमी होईल. अन्यथा मेट्रो स्टेशनपर्यंत पोचण्यासाठी पुन्हा अडथळे सहन करावे लागणार आहेत.
या सुविधा आवश्यक
- सर्व मुख्य रस्त्यांबाजूची अतिक्रमणे हटविणे
- मेट्रो स्थानकाबाहेर प्रवाशांसाठी वाहनतळ
- रिक्षा व फीडर बससाठी थांबे
- स्थानकाहून कंपनीपर्यंत जाण्यासाठी वॉक-वे
- मेट्रो स्थानकातून रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी उतरण्यासाठी जिने
- प्रवाशांसाठी पदपथ बांधणी आणि त्यांची दुरुस्ती
मेट्रो स्टेशनपर्यंत उत्तम पदपथ गरजेचे आहेत. पदपथ झाले नाहीत, तर मेट्रो स्टेशनपर्यंत येण्यासाठी पुन्हा वाहनांचा वापर केला जाईल. अशाने स्टेशन परिसरात वाहतूक कोंडी होईल. त्याने मेट्रोचा मूळ उद्देश साध्य होणार नाही. त्यामुळे येथील रहिवाशांसाठी ‘लास्ट माइल कनेक्टिव्हिटी’ गरजेची आहे.
- विजय पाटील, रहिवासी, ब्लू रिज सोसायटी, हिंजवडी
मेट्रोला वर्षभर उशीर झाला आहे. यामध्येही ‘लास्ट माइल कनेक्टिव्हिटी’बद्दल कोणतेही कामे सुरू झालेली नाहीत. मेट्रो सुरू होतानाच पदपथ, स्काय वॉक होणे गरजेचे आहे. त्यापैकी कोणतेही काम झालेले नाही. ना अतिक्रमण काढण्यात आलेले आहे. मेट्रो झाल्यामुळे हिंजवडीच्याही रस्त्यांचा विकास होईल, असे वाटले होते. मात्र तसे चित्र दिसत नाही. या पावसाळ्यातील रस्त्यांची स्थिती पाहता मेट्रोपर्यंत येणेही येथील कर्मचाऱ्यांना कठीण जाणार आहे. ’
- पवनजीत माने, अध्यक्ष, फोरम फॉर आयटी एम्प्लॉइज
‘पीएमआरडीए’ नेमणार सल्लागार
हिंजवडीतील इन्फोसिस कॅम्पसपासून मेट्रो स्टेशनपर्यंत येण्यासाठी ‘स्काय वॉक’ उभारला जाणार आहे. मेट्रो मार्गिकेवरील रस्त्यांची कामे करण्याची सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यांच्याकडून या रस्त्यांचा अभ्यास करून आराखडा तयार केला जाईल. मेट्रो-३ सुरू होईपर्यंत रस्ते, पदपथांचे काम सुरू केले जाईल. तत्पूर्वी खराब झाले आहेत, त्याची दुरुस्तीही टाटासोबत झालेल्या कराराप्रमाणेच करण्यात येत आहे. असे ‘पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.