पिंपरी, ता. ८ : पिंपरी-चिंचवड शहरातील विविध रस्त्यांवरील रस्ता ओलांडण्याचा पट्टा (झेब्रा क्रॉसिंग) व थांबण्याचे पट्टे दिसेनासे झाले आहेत. चौकात सिग्नल लागल्यानंतर वाहन चालकांनी कुठे वाहन थांबवायचे, पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी कोणती जागा असावी, हे स्पष्ट होण्यासाठी झेब्रा क्रॉसिंग स्टॉप लेनचे पट्टे आखले जातात. यामुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांचाही प्रवास सुरक्षित होतो. मात्र, शहरातील अनेक ठिकाणच्या चौकांतील तसेच रस्त्यांवरील सफेद पट्टेच गायब झाले आहेत. यामुळे सिग्नल लागल्यानंतरही वाहने चौकात येत असून, यातून मार्ग काढताना पादचाऱ्यांना कसरत करावी लागत आहे.
चौकात सिग्नल असल्यास झेब्रा क्रॉसिंगच्या अगोदर असलेल्या स्टॉप लेनच्या आत वाहने थांबवणे आवश्यक आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना सुरक्षितरीत्या रस्ता ओलांडणे शक्य होते. मात्र, शहरातील विविध चौकातील झेब्रा क्रॉसिंगचे पट्टेच नसल्याने अनेक वाहने थेट पुढे येऊन थांबतात. असे झाल्यास पादचाऱ्यांना अडचण निर्माण होते. धोका पत्करून रस्ता ओलांडावा लागतो.
खराब रस्त्यांमुळे अपघात
अगोदरच खड्ड्यांमुळे शहरातील काही रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. खड्ड्यांमुळे रस्ते अपघाताचे प्रमाण वाढले आहे. दुचाकी चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. अशातच रस्त्यावर सफेद पट्टे नसणे, बंद सिग्नल तसेच काही वाहन चालकाकडून होणारे वाहतूक नियमांचे उल्लंघन यामुळे अपघाताच्या घटनांमध्ये भर पडत आहे.
आठ हजार ५४३ वाहन चालकांवर कारवाई
चौकात स्टॉप लेन असताना त्या अगोदर वाहन उभे करणे आवश्यक असते. तरीही त्या लेनवरच वाहन उभे करणाऱ्या वाहन चालकांवर तसेच झेब्रा क्रॉसिंगवर वाहन उभे करणाऱ्या बेशिस्त वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. या वर्षात जानेवारी ते जुलै या सात महिन्यांच्या कालावधीत अशा आठ हजार ५४३ वाहन चालकांवर कारवाई केली असून, त्यांच्याकडून दंड वसूल केला आहे.
पावसामुळे तसेच रस्ते दुरुस्तीच्या कामामुळे काही ठिकाणी झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे, स्टॉप लेन दिसेनासे झाले आहेत. लवकरच हे पट्टे आखणीचे काम तसेच रस्ते दुरुस्तीचे कामही सुरू करण्यात येणार आहे.
- बापूसाहेब गायकवाड, कार्यकारी अभियंता महापालिका
झेब्रा क्रॉसिंग करणाऱ्या वाहन चालकांवर पोलिसांनी केलेली या वर्षातील कारवाई
महिना ः कारवाई दंड
जानेवारी १९२९ १२४८५००
फेब्रुवारी १७१७ ११४३५००
मार्च १८९१ १२७३५००
एप्रिल १४१६ ९२८०००
मे ७९४ ५१४०००
जून ४६८ ३०००००
जुलै ३२८ २०९०००
-------------------------------------------------
एकूण ८५४३ ५६१६५००
----------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.