पिंपरी, ता. ७ : भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी १९१३ मध्ये निर्मिती केलेल्या ‘राजा हरिश्चंद्र’ या चित्रपटापासून ते २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटापर्यंतचा मराठी सिनेसृष्टीचा प्रवास पिंपरी चिंचवडमधील रसिकांनी अनुभवला.
निमित्त होते, ‘राजा हरिश्चंद्र ते हरिश्चंद्राची फॅक्टरी’ या कार्यक्रमाचे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’अंतर्गत प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमातून रुपेरी पडद्यावरच्या मराठी चित्रपटांचा शंभरहून अधिक वर्षांची वाटचाल सुरेल गाण्यांच्या माध्यमातून रसिकांसमोर उलगडली गेली. तर मराठी नाटक ‘सूर्याची पिल्ले’ आणि शाहिरी पोवाड्यांचा कार्यक्रम ‘गजर मराठीचा.... जागर शाहिरीचा’ या कार्यक्रमांना देखील प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला.
‘राजा हरिश्चंद्र’ चित्रपटापासून कार्यक्रमाची सुरुवात झाली. महाराष्ट्र फिल्म कंपनीचे चित्रपटसृष्टीतील योगदान, प्रभात फिल्म कंपनीच्या स्थापनेची कथा, पहिला बोलपट ‘अयोध्येचा राजा’ याचे स्मरण यावेळी करण्यात आले. व्ही. शांताराम यांच्या कलादृष्टीचा परिचय, पु. ल. देशपांडे यांचे भावनांना स्पर्श करणारे चित्रपट, ग. दि. माडगूळकर आणि सुधीर फडके यांच्या चित्रपट संगीतातील योगदान, पं. हृदयनाथ मंगेशकर यांचे संगीत, दादा कोंडके यांचे विनोदी चित्रपट यांचा संगीतमय पट रसिकांसमोर उलगडला. यानंतर १९८० च्या दशकातील विनोदी आणि भयपट चित्रपटांचा संगम, महेश कोठारे, सचिन पिळगावकर, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या अभिनयाचे सुवर्णक्षण यांसह मराठी सिनेमाची उत्क्रांती रसाळ शैलीत कलाकारांनी रसिकांसमोर उलगडली. तर ‘लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया’ या गाण्याने मराठी चित्रपटसृष्टीतील प्रत्येक कलाकार, तंत्रज्ञ तसेच या चित्रपटसृष्टीसाठी योगदान देणाऱ्या प्रत्येकाला मुजरा करण्यात आला.
संजय चांदगुडे व प्रशांत बरिदे यांनी निवेदन केले. गायक समीर नगरकर, पियूष भोंडे, अजय खटावकर, प्रशांत व्ही. साळवी, अजिंक्य देशपांडे, गायिका शुभ्रा घायतडके, निशा गायकवाड, सुवर्णा कोळी, प्रियल निळे, सावनी सावरकर यांनी गाण्यांचे सादरीकरण केले. त्यांना वादक अमृता दिवेकर, अमन सय्यद, विशाल थेलकर, सचिन वाघमारे, अभिजित भदे, नागेश भोसेकर, हर्षद गणबोटे यांनी साथ दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.