प्रदीप लोखंडे/अविनाश ढगे : सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ३० : केंद्र आणि राज्य शासनाने वारंवार आवाहन करूनही शिधापत्रिकाधारक ‘केवायसी’ (नो युवर कस्टमर) प्रक्रियेबाबत उदासीन असल्याचे दिसत आहे. शहरात पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीन कार्यालयांतर्गत ‘केवायसी’ची कामे केली जात आहेत. मात्र, तिन्ही ठिकाणी ही प्रक्रिया अपूर्ण आहे.
सध्या शहरातील सुमारे एक लाख २७ हजार २१३ शिधापत्रिकाधारकांचे ‘केवायसी’ अपूर्ण आहेत. ती पूर्ण करण्यासाठी परिमंडळ अधिकाऱ्यांनी स्वस्त धान्य दुकानदारांची बैठक बोलावून प्रक्रियेला गती देण्याची सूचना दिली आहे. राज्यातील सर्व ग्राहकांच्या रेशनकार्डला आधार क्रमांक जोडले आहेत. तरीही धान्य वितरणात गळती आहे. ती रोखण्यासाठी राज्यातील सर्व रेशन कार्डधारकांना ‘ई-केवायसी बंधनकारक केले आहे. कार्डवर नावे असलेल्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी अद्ययावत असलेले आधारकार्ड घेऊन दुकानदाराकडे गेल्यानंतर नवीन फोर-जी ‘ई-पॉस’ मशिनमध्ये बोटांचे ठसे स्कॅन करून ‘ई-केवायसी’ करणे बंधनकारक आहे. एप्रिल २०२५ अखेर १०० टक्के ‘ई-केवायसी’ पूर्ण न झाल्यास अनुदान रोखण्याचा आणि अन्नधान्य कपात करण्याचा इशारा राज्यांना दिला आहे.
मुदतवाढ ३० एप्रिलपर्यंत
शिधापत्रिकेत नावे असलेल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला ‘ई-केवायसी’ पडताळणी शासनाने बंधनकारक केली आहे. मात्र, सर्व्हर डाउन, मशीनमधील तांत्रिक अडचणी आणि शिधापत्रिकाधारकांची उदासीनता यामुळे अजूनही लाखों शिधापत्रिकाधारकांचे ‘ई-केवायसी’ पूर्ण झालेले नाही. त्यामुळे केंद्र शासनाने या प्रक्रियेस ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
भोसरी येथील अधिकारी प्रशिक्षणाला
भोसरी येथील अन्न धान्य पुरवठा व वितरण कार्यालयाचे परिमंडळ अधिकारी प्रशिक्षणासाठी बाहेर आहेत. त्यामुळे या कार्यालयांतर्गत ‘केवायसी’ची कामे पूर्ण कोण करणार, असा प्रश्न आहे. या कार्यालयांतर्गत किती केवायसी पूर्ण झाली, या बाबत परिमंडळ अधिकारीही अनभिज्ज्ञ आहेत.
ई-केवायसीला मुदतवाढ
प्रथम मुदत : ३१ ऑक्टोबर २०२४
प्रथम मुदतवाढ : ३१ डिसेंबर २०२४
द्वितीय मुदतवाढ : ३१ मार्च २०२५
आताची मुदतवाढ : ३० एप्रिल २०२५
परिमंडळनिहाय माहिती
परिमंडळ कार्यालये / ई-केवायसी बाकी
पिंपरी / ५०,९२१
चिंचवड / ४५,८९२
भोसरी / ३०,४००
शिधापत्रिका धारकांसह त्यात नमूद सदस्यांची ‘ई-केवायसी’ करण्यास शासनाने ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार प्रक्रियेला गती देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. धान्य दुकानदारांनाही सूचना दिलेल्या आहेत.
- विजयकुमार क्षीरसागर, परिमंडळ अधिकारी, चिंचवड.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.