सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १० ः शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (मोरवाडी) चौकातील वाहतूक बेटासह वेगवेगळ्या प्रयोगांविरुद्ध सोमवारी (ता. १०) रिक्षा-टॅक्सी चालकांनी पिंपरी चिंचवड महापालिका मुख्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.
या आंदोलनात रिक्षाचालक, टॅक्सी चालक, दुचाकीस्वार आणि स्थानिक नागरिकांनी सहभाग घेतला. प्रशासनाच्या मनमानी कारभाराला तीव्र विरोध दर्शविण्यात आला. सकाळी साडे अकरा वाजता आंदोलन सुरू झाले. आंदोलकांनी महापालिका मुख्यालयाला घेराव घालत ‘चुकीचे दुभाजक हटवा’, ‘भ्रष्टाचार बंद करा’, ‘जनतेच्या जिवाशी खेळ बंद करा’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला.
या चौकात वाहतूक बेट उभारण्यात येत आहे. वाहतूक पोलिसांनी विरोध दर्शविणारे पत्र दिल्यानंतरही महापालिका प्रशासन वाहतूक बेटाचा प्रयोग पुढे रेटत आहे. त्यासाठी चौकात सिमेंट ब्लॉक आणि इतर साहित्य आणून टाकण्यात आले आहे. परिणामी येथे आधीपासूनच होणारी वाहतूक कोंडी आणखी वाढली आहे.
यावेळी महाराष्ट्र रिक्षा पंचायत कष्टकरी जनता आघाडी व ऑटो टॅक्सी ट्रान्स्पोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांनी महापालिका आयुक्तांच्या नावे सात प्रमुख मागण्यांचे लेखी निवेदन दिले. महापालिकेचे कार्यकारी अभियंता अभिमान भोसले यांनी आंदोलनस्थळी येऊन निवेदन स्वीकारले आणि योग्य कार्यवाही करण्याबाबत आश्वासन दिले. यावेळी मनपा फेरीवाला समितीच्या सदस्य आशा कांबळे, अल्पसंख्याक महासंघाचे अध्यक्ष रफीक कुरेशी, राजा नायर, गौरी शेलार, बळिराम काकडे, मधुरा डांगे, मिनू गिल, दामोदर मांजरे, ज्योती कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
--------
रिक्षाचालकांचेच आंदोलन
मोरवाडी चौकात रिक्षा थांबलेल्या असतात. त्यामुळे वाहतुकीत आणखी अडथळा निर्माण होतो. त्यामुळे कोंडी वाढते. अनेक चालक पदपथावरही रिक्षा उभ्या करीत असतात. त्यामुळे पादचाऱ्यांना चालणे कठीण झाले आहे. वाहतूक पोलिसांनी कारवाई केली तरीही रिक्षा हटविल्या जात नाहीत. इंडियन रोड काँग्रेसच्या (आयआरसी) नियमानुसार वळणाच्या मार्गावर कोठेही वाहने उभी करण्यास बंदी आहे. मुख्य चौकाच्या ७५ मीटर अंतरावर कोणताही बस थांबा असू नये. रिक्षाथांबाही चौकापासून ७५ मीटरपेक्षा दूर असला पाहिजे. मोरवाडी चौकात मात्र एक, दोन नव्हे तर, तब्बल चार रिक्षा थांबे उभारण्यात आले आहेत. यावर महापालिका प्रशासन कोणतीही कारवाई करताना दिसून येत नाही.
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.