पिंपरी-चिंचवड

वर्धापन दिन - शैक्षणिक पुरवणी - लेख

CD

वर्धापन दिन - शैक्षणिक पुरवणी लेख
---
ही आवडते मज
मनापासुनी शाळा!

गेल्या काही वर्षांत पिंपरी चिंचवड महापालिकेतील विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. ‘यू-डायस’ च्या आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे. यावरून या शाळांचा दर्जा दिवसेंदिवस अधिक सुधारत असल्याचे चित्र आहे. या शाळांच्या स्वतंत्र मूल्यमापनात शैक्षणिक निकालांमध्ये लक्षणीय सुधारणा होत आहे. त्यामुळे ‘ही आवडते मज मनापासुनी शाळा’ अशी भावना विद्यार्थी आणि पालक वर्गात निर्माण झाली असल्याचे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही.
- आशा साळवी

बा लभारतीच्या मराठीच्या जुन्या पाठ्यपुस्तकातील ही सुप्रसिद्ध कविता.
ही आवडते मज मनापासुनी शाळा ।
लाविते लळा ही, जसा माऊली बाळा ।।
यापूर्वी महापालिकेच्या शाळांमध्ये प्रवेश घेण्यास विद्यार्थी आणि त्यांचे पालक सहजासहजी तयार नसत. मात्र, आता सकारात्मक बदल घडत असून, कवितेतील ओळीप्रमाणे विद्यार्थ्यांना महापालिकांच्या शाळा मनापासून आवडू लागल्याचे दिसून येत आहे. शहरात महापालिकेच्या १३४ प्राथमिक व १८ माध्यमिक शाळा चालविल्या जातात. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सामाजिक संस्था, कॉर्पोरेट कंपन्या आदींच्या मदतीने विविध उपक्रम राबविले जात आहेत. विशेष म्हणजे महापालिकेने उचललेल्या या योजनेला सामाजिक संस्थांसह कॉर्पोरेट कंपन्यांनी स्वारस्य दाखविल्यामुळे शैक्षणिक दर्जा उंचावण्यात महापालिका शाळा ‘स्मार्ट’ होत आहेत. तत्कालीन आयुक्त शेखर सिंह यांच्या दूरदृष्टीतून राबवलेल्‍या उपक्रमातून एकूणच महापालिका शाळांची शैक्षणिक उंची वाढताना दिसून येत आहे.

स्मार्ट स्कूल प्रकल्पाचे यश
महापालिकेच्या शाळांमध्ये स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या स्मार्ट स्कूल प्रकल्पामुळे शहरातील इंग्रजी शाळांमधील विद्यार्थी आता महापालिका शाळांकडे आकर्षित होत आहेत. खासगी शाळांमधील महागडे शिक्षण गोरगरिबांना परवडत नसल्याने महापालिकेच्या शाळा त्यांच्यासाठी आधार ठरल्या आहेत. काही वर्षांपूर्वी महापालिकेच्या शाळांची झालेली दुरवस्था, ज्ञानदानात शिक्षकांची अनास्था आणि शिक्षण विभागाचे झालेले दुर्लक्ष यामुळे विद्यार्थ्यांची गळती वाढली होती. खासगी शिक्षण संस्थांकडूनही महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची पळवापळवी सुरू होती. शिक्षणाचा दर्जा खालावल्याने विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान होत होते. परंतु, वर्षभरापासून शिक्षण विभागाने कात टाकली आहे. त्यात महापालिका आणि स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून राबविण्यात आलेला स्मार्ट स्कूल प्रकल्प महापालिकेच्या शाळांचा कायापालट करणारा ठरला आहे. त्यामुळे महापालिकेच्या शाळांमधील केवळ गळतीचे प्रमाण कमी झाले नाही; तर विद्यार्थी संख्येतही वाढ झाली आहे.

विविध उपक्रमांचाही फायदा
महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचा विद्यार्थ्यांना फायदा होत आहे.
महापालिकेच्या शाळांमध्ये केवळ प्रवेश संख्याच वाढत नाही; तर मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेमध्ये देखील चांगली वाढ दिसून येत आहे. क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया (क्यूसीआय) च्या मूल्यमापनानुसार प्रारंभीच्या पातळीवरील विद्यार्थ्यांचे प्रमाण शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील २८ टक्क्यांवरून वर्ष २०२४-२५ मध्ये १३ टक्क्यांवर आले; तर उच्च पातळीवर पोहोचलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण ०.५ टक्क्यांवरून सहा टक्क्यांपर्यंत वाढले आहे. त्यामध्ये विशेषतः प्राथमिक वर्गांच्या निकालांमध्ये लक्षणीय सुधारणा दिसून आली आहे. महापालिकेच्या २११ बालवाड्यांमधील सहा हजारांपेक्षा जास्त मुलांसाठी बाल सुलभ वर्गखोल्या आहेत.

विद्यार्थ्यांची उत्तुंग भरारी
महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी यशाची उत्तुंग भरारी घेत आहेत. राष्ट्रीय विज्ञान उपक्रम, भारतीय अवकाश संशोधन संस्थेला (इस्रो) भेट, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी, शाळांना मिळालेले ‘आयएसओ’ मानांकन, इंग्रजी माध्यमातून शिक्षण,
दहावीसह विविध शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये यश, विद्यार्थ्यांचे समुपदेशन, नावीन्यपूर्ण उपक्रम, सुरक्षित वातावरण आदी कारणांमुळे महापालिका शाळांमध्ये मुलांना दाखल करण्याकडे पालकांचा कल वाढल्याचे दिसत आहे. मूल्यमापनात प्रारंभिक साक्षरता, अंकगणित व इतर कौशल्यांमध्ये २०-२४ टक्के सुधारणा आढळली आहे. याशिवाय ‘स्पंदन’ कार्यक्रम सामाजिक-भावनिक शिक्षण व जीवन कौशल्यांवर भर दिला जात आहे. ‘इंग्रजी अॅज सेकंड लँग्वेज’ (ईएसएल) उपक्रमांतर्गत २७ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी इंग्रजी भाषेचा वापर आत्मविश्वासाने करीत आहेत. ‘द आर्ट बॉक्स’ प्रदर्शन व ‘जल्लोष शिक्षणाचा’ यासारखे सांस्कृतिक उपक्रम विद्यार्थ्यांचा दृष्टीकोन विस्तारण्यास मदत करीत आहेत. ‘भारत दर्शन’ दौऱ्यांतून गुणवंत विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक अनुभव मिळत आहेत.

सुरक्षा लेखापरीक्षण
सुरक्षित शिक्षण वातावरणासाठी महापालिकेने एनसीपीसीआर व एनसीईआरटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार शाळांचे सुरक्षा लेखापरीक्षण सुरू केले आहे. पोलिस विभागाच्या ‘पोलिस काका’ व ‘दामिनी स्क्वॉड’ यांच्या सहकार्याने तसेच मुस्कान फाउंडेशन व अर्पण यांच्या माध्यमातून शाळांमध्ये बाल संरक्षण प्रशिक्षण दिले जात आहे. शाळांमध्ये सध्या २३ समुपदेशक कार्यरत असून शाळा व्यवस्थापन समित्या सुरक्षा व बाल संरक्षण उपाययोजनांवर काटेकोरपणे लक्ष देत आहेत.

असे करताहेत मूल्यमापन
- प्रारंभिक साक्षरता, अंकगणित व इतर कौशल्यांमध्ये २० ते २४ टक्के सुधारणा
- ‘स्पंदन’ कार्यक्रमातून सामाजिक-भावनिक शिक्षण व जीवन कौशल्यांवर भर
- ‘इंग्रजी अॅज सेकंड लँग्वेज’ उपक्रमांतर्गत २७ हजारांवर विद्यार्थ्यांकडून इंग्रजीचा आत्मविश्वासाने वापर
- द आर्ट बॉक्स प्रदर्शन व ''जल्लोष शिक्षणाचा'' उपक्रमातून विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन विस्तारण्यास मदत
- भारत दर्शन दौऱ्यातून गुणवंत विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक अनुभव
- सुरक्षेसाठी एनसीपीसीआर व एनसीईआरटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार शाळा सुरक्षा लेखापरीक्षण
- ‘पोलिस काका’, ‘दामिनी स्क्वॉड’, मुस्कान फाउंडेशन व ‘अर्पण’च्या माध्यमातून बालसंरक्षण प्रशिक्षण
- शाळांमध्ये २३ समुपदेशक असून शाळा व्यवस्थापन समित्यांद्वारे सुरक्षा व बालसंरक्षणावर काटेकोरपणे लक्ष

‘क्यूसीआय’चे मूल्यमापन
- प्रारंभिक पातळीवरील विद्यार्थ्यांचे प्रमाण २०२३-२४ मध्ये २८ टक्के होते, ते २०२४-२५ मध्ये १३ टक्क्यांवर आले
- उच्च पातळीवर पोहोचलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण ०.५ टक्क्यांवरून ६ टक्क्यांपर्यंत वाढले
- प्राथमिक वर्गाच्या निकालांमध्ये लक्षणीय सुधारणा
- दुसरीतील प्रारंभिक पातळीवरील विद्यार्थी ३० टक्क्यांवरून सात टक्क्यांपर्यंत कमी झाले
- प्रगत विद्यार्थ्यांचे प्रमाण शून्य टक्क्यांवरून २५ टक्क्यांवर पोहोचले
---

Chrome Users Warning : 'क्रोम युजर्स'साठी सरकारी एजन्सीने जारी केला गंभीर इशारा!

Eknath Shinde: राजस्थानमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपला इशारा, निवडणुकीवरुन दिला 'हा' अल्टिमेटम

Latest Marathi News Update : दिवसभरात देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Marathwada Crime : कडेठाण येथे मुलाने केला पित्याचा खून; प्रेत पुरले घरात; आठ दिवसानंतर घटना उघडकीस!

Theur Crime : पिऊन रस्त्यावर पडलेल्या व्यक्तीला उचलुन बाजुला करण्याकरीता गेलेल्या दोघांना तिघांनी केली मारहाण!

SCROLL FOR NEXT