लेख वाचला आहे
---------
वर्धापन दिन ः विद्या पुरवणी लेख
---
पिंपरी चिंचवड होतंय
‘एज्युकेशन हब’
पिंपरी चिंचवड शहराच्या पश्चिमेकडील भाग विशेषतः वाकड, ताथवडे, पुनावळे, रावेत, किवळे, मामुर्डी या परिसरांत विविध शैक्षणिक संस्थांची संकुले आहेत. अगदी ‘केजी’ अर्थात पूर्व प्राथमिक शाळा ते ‘पीजी’पर्यंतच्या म्हणजेच पदव्युत्तर पदवीची महाविद्यालये येथे आहेत. पूर्वेकडील उपनगरांतही शिक्षणाच्या सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे पिंपरी चिंचवड ‘एज्युकेशन हब’कडे वाटचाल करीत असल्याचे दिसत आहे.
- पीतांबर लोहार
पिंपरी चिंचवड शहरात पूर्वी मोजक्याच शाळा, महाविद्यालये होती. त्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पुण्यात जावे लागत होते. मात्र, कालांतराने रोजगाराच्या संधी वाढल्या. नोकरी-व्यवसायानिमित्त बाहेरून आलेल्या नागरिकांची संख्या वाढली. शहरातील लोकसंख्या वाढली. शेती क्षेत्र कमी होऊन नागरी वस्ती वाढली. शाळा, महाविद्यालयांची गरज भासू लागली. पूर्वीच्या स्थानिक शैक्षणिक संस्थांनी वर्गखोल्या वाढवल्या. तसेच, शाळा-महाविद्यालयांची संख्याही वाढली. विद्यार्थी व पालकांची गरज ओळखून पुण्यातील शैक्षणिक संस्थांनी आपल्या शाखा पिंपरी चिंचवड शहराच्या विविध भागांत सुरू केल्या. ताथवडेतील इंदिरा कॉलेज, जेएसपीएम स्कूल, राजर्षी शाहू महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय, डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ, सिंबायोसिस विद्यापीठ, मारुंजी येथील अलार्ड ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, साई बालाजी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, रावेत येथील एस. बी. पाटील कॉलेज, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाची शैक्षणिक संकुले अशा संस्थांमुळे शहरातील विद्यार्थ्यांची सोय झाली. उच्च शिक्षणासाठीच्या सर्व सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. अगदी पदवी, पदविकेचे अभ्यासक्रम उपलब्ध झाले आहेत. कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गालगतचा वाकड ते किवळे-मामुर्डीपर्यंतचा परिसर असो, किंवा चऱ्होली, मोशी, डुडुळगाव, चिखली, निगडी, आकुर्डी परिसर आता शैक्षणिक संकुलांनी परिपूर्ण होत आहे. त्यामुळे आपले शहर आता ‘एज्युकेशन हब’ म्हणून उदयास येत आहे.
‘केजी’ ते ‘पीजी’ शिक्षण
‘केजी’ ते ‘पीजी’ शिक्षणाची सुविधा शैक्षणिक संस्थांमुळे विद्यार्थी व पालकांना उपलब्ध झाली आहे. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिकपर्यंतच्या शिक्षणासाठी एसएससी, सीबीएसई आणि आईसीएसई बोर्डाच्याही शाळा शहरात आहेत. कला, वाणिज्य व विज्ञान या विद्याशाखांसह अन्य व्यावसायिक अभ्यासक्रम, पदवी, पदव्युत्तर पदवीपर्यंतच्या अभ्यासक्रम महाविद्यालयांमध्ये शिकविले जात आहेत. अभियांत्रिकी, वैद्यकीय, औषधनिर्माण, पत्रकारिता, व्यवस्थापन, हॉटेल मॅनेजमेंट अशा अभ्यासक्रमांचाही यामध्ये समावेश आहे.
विद्यार्थ्यांची पसंती
उत्तम दर्जाचे शिक्षण, मोठे कॅम्पस, एकाच ठिकाणी अनेक अभ्यासक्रम, अभ्यासेतर उपक्रम आदी कारणांमुळे शहरासह लगतच्या ग्रामीण भागातील आणि राज्य व राज्याबाहेरील विद्यार्थ्यांनीही शिक्षणासाठी पिंपरी चिंचवडमध्ये येत आहेत. शिवाय, शहरातील वाहतूक सुविधा व महामार्गांशी कनेक्टिव्हिटी, शैक्षणिक संस्थांसह खासगी वसतिगृहांची अर्थात निवास व भोजनाची व्यवस्था, शिक्षण घेतानाच रोजगाराची अर्थात विविध कंपन्यांमध्ये ‘प्लेसमेंट’ची संधी आदी कारणांमुळे विद्यार्थ्यांनी पिंपरी चिंचवडमधील शैक्षणिक संस्थांना पसंती दिली आहे.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.