जागतिक मधुमेह दिन
पिंपरी,ता.१३ ः एरवी चाळीशी ते पन्नाशीनंतर होणारा आजार म्हणून ओळखला जाणारा मधुमेह आता तरुणाईमध्येही मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहे. तज्ज्ञांच्या निरीक्षणानुसार २५ ते ३० वर्षे वयोटातील तरुण-तरुणींमध्ये मधुमेहाचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढलेले आहे. अयोग्य जीवनशैली, व्यायामाचा अभाव, ताणतणाव ही याची मुख्य कारणे आहेत. आनुवंशिकरीत्या एका पिढीकडून पुढच्या पिढीपर्यंत मधुमेह जाण्याचे प्रमाण दहा टक्के आहे.
दरवर्षी १४ नोव्हेंबर हा दिवस जागतिक मधुमेह दिन साजरा केला जातो. मधुमेह इतरही अनेक आजारांना निमंत्रण देतो. या पार्श्वभूमीवर मधुमेह टाळण्यासाठी सध्याच्या धकाधकीच्या जीवनात काही गोष्टींचे पालन करणे आता गरजेचे बनले आहे.
मधुमेह हा टाईप १ व टाईप २ या दोन प्रकारात मोडतो. त्यातील पहिल्या प्रकारातील मधुमेह हा लहान मुलांमध्ये दिसून येतो. त्याची विविध कारणे असतात. अनेकदा ती शोधणेही अशक्यप्राय असते. मात्र, यातील दुसऱ्या प्रकारातील मधुमेहाचे प्रमाण वेगाने वाढत आहे. ह्रदयरोग, मूत्रपिंडाचे विकार, डोळ्यांचे विकार हे रोग मधुमेहामुळे उद्भवतात. हे टाळण्यासाठी आपली जीवनशैली उत्तम ठेवणे गरजेचे असल्याचे डॉक्टर सांगतात.
चुकीची जीवनशैली
२० ते ३० वर्षे वयोगटातील बहुतांश तरुण हे उच्चशिक्षण घेत असतात किंवा नोकरी करत असतात. अभ्यासासाठी किंवा कामानिमित्त सतत बसून काम करणे हा जीवनाचा भाग झाला आहे. बैठ्या कामामुळे शारीरिक हालचाली होत नसल्याने स्थूलता वाढते. त्यामुळे मधुमेहाला आमंत्रण मिळते.
फास्ट फूडचे सेवन
घरचा संतुलित आहार खाण्यापेक्षा फास्ट फूड खाण्याकडे तरुणाईचा कल वाढला आहे. त्यातून शरीराला पोषण कमी मिळते मात्र अतिरिक्त कॅलरीची भर पडते. त्यामुळे प्रक्रिया केलेले मैदायुक्त व साखरयुक्त पदार्थांचे अतिसेवन केल्यास रक्तातील साखर वाढते.
ताणतणावाही परिणाम
शिक्षणातील किंवा नोकरीतील स्पर्धा, स्वतःला सिद्ध करण्याचा तणाव याचा आरोग्यावर थेट परिणाम होतो. ताणतणाव कमी करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले जात नाहीत. याउलट तरुण व्यसनांच्या आहारी जातात. त्यामुळेही मधुमेह उद्भवतो.
अनुवंशिकता
कुटुंबातील आधीच्या पिढीला मधुमेह असल्यास त्याचा धोका पुढील पिढीलाही असतो. मात्र हे प्रमाण केवळ १० टक्के असून हा धोका ५० वर्षांच्या पुढे आढळतो. याउलट ताणतणाव, चुकीचा आहार, बदलती जीवनशैली हे अधिक प्रमाणात मधुमेहासाठी कारणीभूत असल्याचे डॉक्टर सांगतात.
काय करावे ?
- सकस व संतुलित आहार घ्यावा
- चालण्याचा नियमितपणे व्यायाम करावा
- पुरेशी झोप घ्यावी
- रात्री उशिरा जेवणे टाळावे, सातच्या आत जेवावे
- जंक फूडचे सेवन टाळावे
- मद्यपान, धुम्रपान करू नये
- नियमित व्यायाम करावा
देशात गेल्या काही वर्षांमध्ये मधुमेहाचे प्रमाण वाढले आहे. याला जीवनशैली कारणीभूत आहे. सध्याच्या पिढीत अगदी कमी वयातही वर्ग-२ चा मधुमेह आढळून येतो. हे टाळण्यासाठी अगदी लहान वयापासूनच उत्तम आहार, व्यायामाची आवड या सोबतच वेळेवर जेवण व झोपण्याची सवय लावणे गरजेचे आहे.
- डॉ. चंद्रशेखर अन्नदाते, वैद्यकीय तज्ज्ञ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.