पिंपळे गुरव, ता. १४ : येथील राजमाता जिजाऊ उद्यानात फोटोग्राफीसाठी येणाऱ्या नागरिकांना २५० रुपये शुल्क आकारण्यात येते. पण, यात अनियमितता असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे. या शुल्काची अधिकृत पावती नागरिकांना आतापर्यंत एकदाही देण्यात आलेली नाही. त्यामुळे हे पैसे कोणाच्या खिशात जातात, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
या उद्यानात प्रवेश करण्यासाठी सामान्य तिकिटे दहा आणि २० रुपयांची असून ती त्वरित दिली जातात. मग फक्त २५० रुपयांच्या तिकिटासाठीच गुंतागुंत का, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. या गोंधळातच चलन रजिस्टर कर्मचारी घरी नेऊन भरत असल्याची माहिती मिळाली आहे. महसुलाशी संबंधित कागदपत्रे कार्यालयाबाहेर नेणे नियमबाह्य असून या पद्धतीमुळे गैरव्यवहाराची शक्यता वाढते, असे नागरिकांनी सांगितले. याबाबत विचारण केली असता, कर्मचाऱ्यांकडून ‘‘चलन वरिष्ठ कार्यालयात जाते’’ असे सांगण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात कोणालाही पुढील दिवशी पावती मिळाल्याचे रेकॉर्ड नाही. त्यामुळे महसूल प्रक्रियेत गैरव्यवहाराचा संशय व्यक्त केला जात आहे.
फोटोग्राफर्ससाठी असलेल्या फॉर्ममध्ये ओळखपत्र क्रमांक, संपर्क माहिती किंवा परवानगीशी संबंधित तपशील नसतो. त्यामुळे उद्यानात कोण व्यावसायिक फोटोग्राफी करत आहे, याची अधिकृत नोंद राहत नाही. वरून काही फोटोग्राफर्स स्वतःच्या नावाने तिकीट न घेता त्यांच्या क्लायंटना पावती बनवण्यासाठी पाठवतात. या प्रणालीमुळे सुरक्षेची जबाबदारी आणि उत्तरदायित्व याबाबतही प्रश्न निर्माण झाले आहेत. गेल्या आर्थिक वर्ष २०२४-२५ दरम्यान महापालिका उद्यान विभागाला तब्बल ७८ लाख दोन हजार रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. एवढ्या मोठ्या उत्पन्नात २५० रुपयांच्या तिकिटाची हिशेबपद्धतीच अस्तित्वात नाही, हे धक्कादायक आहे. हे उद्यान २००७ पासून सुरू असूनही महसूल पद्धत आणि लेखा प्रणालीत सुधारणा झाली नसल्याने पैशांच्या व्यवहाराबाबत शंका उपस्थित होत आहे.
नागरिकांनी विचारलेले प्रश्न
- पावती न देता २५० रुपये आकारणी का केली जाते?
- चलन रजिस्टर उपलब्ध का नाही?
- छायाचित्रकारांच्या नाव नोंदणीची व्यवस्था का नाही?
- या सर्व प्रकाराची सखोल चौकशी आणि दोषींवर कारवाई का नाही?
- महापालिका प्रशासनाने तातडीने लक्ष घालून पारदर्शक व्यवस्था सुरू करावी
तिकिटांची माहिती
प्रौढ तिकीट : २० रुपये
लहान मुलांचे तिकीट : १० रुपये
फोटोग्राफी तिकीट : २५० रुपये
वार्षिक महसूल : ७८ लाख रुपये
या प्रकाराच्या सत्यता पडताळणीसाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मी स्वतः उद्यानाला भेट देणार आहे. तपासात अनियमितता आढळल्यास संबंधितांवर नक्कीच दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
- महेश गारगोटे, उद्यान अधीक्षक
उद्यानात आम्हाला २५० रुपयांची पावती कधीच मिळाली नाही. कर्मचारी सांगतात, ‘उद्या घ्या’, पण उद्या कधीच येत नाही. एवढ्या वर्षांपासून हे चालत असेल तर हा स्पष्ट गैरव्यवहार आहे. महापालिकेने तातडीने तपास करून दोषींवर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे.
- एक छायाचित्रकार
राजमाता जिजाऊ उद्यानातून दरवर्षी ८० लाख रुपयांचा महसूल मिळतो. येथे येणाऱ्या छायाचित्रकारांच्या नोंदी व्यवस्थित केल्या असत्या, तर प्रशासनाला आणखी महसूल मिळाला असता. महसूल बुडवणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी.
- एक ज्येष्ठ नागरिक
PMG25B02936