पिंपरी, ता. १६ : पिंपरी बाजारपेठेतील सार्वजनिक वाहनतळाच्या कंत्राटदाराकडून वाहनचालकांना ना पार्किंगची पावती दिली जाते, ना वाहनांची सुरक्षा. मात्र, कर्मचाऱ्यांकडून वाहनचालकांशी अरेरावीची भाषा केली जात आहे. वाहनांची चावी काढणे, उद्धट बोलणे असे प्रकार घडत असल्याचे दिसून आले. या कंत्राटदारावर कोणाचा धाक आहे की नाही ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
रविवार सुट्टीचा दिवस असल्याने नागरिकांनी पिंपरी बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी केली होती. खरेदीसाठी येताना अनेकांनी आपली वाहने आणली होती. महापालिकेकडून पिंपरी बाजारपेठेत सार्वजनिक वाहनतळ उभारले आहे. त्याचे कंत्राट एका खासगी कंपनीला दिले आहे. पिंपरी बाजारात येणारे शेकडो वाहनचालक दररोज वाहनतळावर वाहने उभी करत असतात. मात्र, या वाहनतळावर वाहनांची कुठलीही सुरक्षा नसल्याचे दिसून येते. तसेच नागरिकांना पार्किंगच्या पैशांची कोणतीही पावती दिली जात नसल्याचे समोर आले. वाहनतळाचे कर्मचारी नागरिकांशी उद्धट वर्तन करताना तसेच काही कर्मचारी दुचाकीस्वारांची चावी काढून घेत असल्याचे दिसून आले. तीन ते चारजण घोळका करुन वाहनचालकांकडून पैसे वसूल करत असल्याने वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. पिंपरी पुलाखाली मसाला, अत्तरे, सुकी मासळी आणि इतर अनेक दुकाने आहेत. या दुकानांमध्ये नागरिक खरेदीसाठी गेले तरी त्यांच्याकडून पार्किंगचे पैसे वसूल केले जात आहेत. पैसे देण्यास विरोध केल्यास कर्मचाऱ्यांकडून दमदाटी केली जाते. त्यावर कोणी कारवाई करणार की नाही ? असा सवाल सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.
मी पिंपरी बाजारात लाल मिरची घेण्यासाठी गेले होते, मी वाहन तळावर दुचाकी उभी केली नाही तरी देखील माझ्याकडून पार्किंगचे पैसे घेतले. येथील कर्मचारी थेट वाहनांची चावीच काढतात. त्यांचे वर्तन देखील एकदम उद्धट आहे. त्यांना कोणी आवर घालणार आहे की नाही ?
- मनीषा पाटील, वाहनचालक
पिंपरी भाजी मंडईच्या बाजूला वाहन उभे केले. पण, येथे वाहने सुरक्षित असल्याचे दिसून येत नाही. पार्किंगचे पैसे घेतात. मात्र, वाहनांची जबाबदारी घेत नाहीत.
- अक्षय प्रजापती, वाहनचालक
काय आहेत दर ?
दुचाकी - प्रतितास १५ रुपये
चारचाकी - प्रतितास ३० रुपये
फोटो - 90530
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.