पीतांबर लोहार ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १८ ः ‘आईन्स, त्स्वाय, ड्राय, फियर, फ्युन्फ, झेक्स, झीबन, आख़्ट, नॉइन, त्सेन’ हे शब्द न अडखळता विद्यार्थ्याने उच्चारले. जर्मन भाषेतील हे शब्द असून, गणितीय आकडे आहेत, एक ते दहा. शिवाय, ‘माझी शाळा’ या विषयी विद्यार्थ्यांनी मत मांडले, तेही जर्मन भाषेतूनच. आणि ही किमया साधली आहे, महापालिकेच्या बोऱ्हाडेवाडी शाळेतील विद्यार्थी आणि उपक्रमशील शिक्षकांनी. विनामोबदला शाळेच्या व्यतिरिक्त वेळेत येथील शिक्षक विद्यार्थ्यांना जर्मन भाषा गेल्या सहा महिन्यांपासून शिकवत असून, त्याचे फलित आता मिळू लागले आहे. विद्यार्थी घरामध्येसुद्धा जर्मन शब्द उच्चारून पालकांना कोड्यात पाडत आहेत.
महापालिकेच्या वा सरकारी शाळा म्हणजे ‘नको रे बाबा!’ असा सूर काही पालक आळवतात. मात्र, ही नकारात्मक भावना आता पिंपरी-चिंचवड महापालिका शाळांबाबत कमी होऊ लागली आहे. कारण, या शाळांमध्ये विविध उपक्रम शिक्षण विभाग राबवत आहे. आयुक्त शेखर सिंह आणि अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांचे प्रोत्साहन त्यांना मिळत आहे. कला, क्रीडा बरोबरच विविध उपक्रम शाळांमध्ये राबविले जात आहेत. केवळ मराठीच नव्हे तर इंग्रजी माध्यमाचे वर्गही सुरू केले आहेत. आता काही शिक्षकांनी फॉरेन लॅंग्वेज ऑनलाइन ॲप्लिकेशन संस्थेच्या माध्यमातून जर्मन भाषेचे धडे विद्यार्थ्यांना देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यात महापालिकेच्या बोऱ्हाडेवाडी येथील पीसीएमसीज् पब्लिक स्कूल मुले क्रमांक १३ या शाळेने पुढाकार घेतला आहे.
विद्यार्थी म्हणतात...
आम्हाला जर्मन भाषा शिकायला मिळतेय, हे आमचे भाग्य आहे. आपण मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषांमध्ये नेहमी बोलतो, लिहितो. पण, जर्मन भाषा आम्ही पहिल्यांदाच ऐकली आणि ती शिकण्यासाठी नोंदणी केली. एक-दोन-तीन म्हणण्याऐवजी ‘आईन्स’, ‘त्स्वाय’, ‘ड्राय’, ‘फियर’ म्हणताना आपण काहीतरी वेगळे बोलतोय, शिकतोय याचा अधिक आनंद होतो, अशी भावना जर्मन भाषा शिकणारे सातवीतील सम्यक पडघम, आयुष कांबळे, श्रीकर बडदे, स्वराज बोऱ्हाडे आणि सहावीतील ज्ञानेश्वर शेलार या विद्यार्थ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली.
‘‘आमचा मुलगा वेगळी भाषा शिकतो, याचा आनंद वाटतो. घरामध्ये अनेकदा तो जर्मन शब्द वापरतो. पण, ते आम्हाला कळत नाही. आम्हाला बोलताही येत नाहीत. पण, परकीय भाषा मुलगा शिकतोय याचा अभिमान वाटतो. याचे श्रेय त्यांच्या शिक्षकांना आहे.
- पूजा बोऱ्हाडे, विद्यार्थ्याचे पालक, बोऱ्हाडेवाडी शाळा
‘‘परकीय भाषा शिकवण्याचा छान उपक्रम आहे. आमच्या शिक्षकांमुळे मुलांना वेगळी भाषा शिकायला मिळत आहे. शाळेव्यतिरिक्त वेळ देत आहेत. यामध्ये आणखी संख्या वाढवायची आहे. मुलांना चांगली संधी मिळाली आहे. आमची मुले कला, क्रीडामध्ये चमकली आहेत. बॉक्सिंग राष्ट्रीय पातळीवर खेळली आहेत. सुवर्णपदक मिळवले आहे. चित्रकला महोत्सवात सहभागी होत आहेत. आता परकीय भाषा शिकत आहेत, याचा अधिक अभिमान आहे.
- चंदा काकडे, मुख्याध्यापक, पीसीएमसीज् पब्लिक स्कूल मुले-१३, बोऱ्हाडेवाडी
‘‘डिजिटल माध्यमातून ऑनलाइन स्वरूपात मुलांना जर्मन भाषा शिकवली जात आहे. जर्मन ते मराठी, जर्मन ते इंग्रजी अशा शब्दकोशांचा उपयोग होत आहे. शिवाय, घरी असतानाही ऑनलाइन स्वरूपात त्यांना शिकता येते. जर्मन भाषा प्रथमस्तर परीक्षा ३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात चौघांनी विशेष प्रावीण्य मिळवले आहे. २३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. जर्मन शिकण्याबाबत पालकही सकारात्मक आहेत.
- विनायक जाधव, जर्मन भाषा शिक्षक, पीसीएमसीज् पब्लिक स्कूल मुले-१३, बोऱ्हाडेवाडी
‘‘परकीय भाषा शिकवणीचे शुल्क खूप आहे. सर्वसामान्य विद्यार्थ्यांना ते परवडू शकत नाही. मात्र, त्यांनाही परकीय भाषा शिकता आली पाहिजे, बोलता आली पाहिजे, या विचाराने उपक्रम सुरू केला. त्यासाठी एमएमजीएलचे साहाय्य मिळत आहे. जर्मन भाषा परीक्षेचे चार स्तर आहेत. फ्रेंचही शिकवली जाते. राज्यातील ३० जिल्हे आणि देशातील २२ राज्यात हा उपक्रम सुरू आहे. त्यात साडेनऊ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी झाले आहेत.
- शैलेश लेले, संस्थापक, फॉरेन लॅंग्वेज ऑनलाइन ॲप्लिकेशन
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.