पिंपरी, ता. १८ ः महापालिका पाणीपुरवठा विभाग यांच्या नावाने पाणीपुरवठा बंद करण्यात येत असल्याचे बनावट ‘एसएमएस’ शहरातील नागरिकांना पाठवण्याचे प्रकार घडत आहेत, अशा एसएमएसकडे दुर्लक्ष करून तो पाठवणाऱ्या क्रमांकाची तक्रार सायबर पोलिसांकडे करावी, असे आवाहन महापालिकेसह पिंपरी-चिंचवड पोलिसांनी केले आहे.
शहरातील ज्या मालमत्तांची पाणीपट्टी थकीत आहे, अशा मालमत्तेचे नळजोड तोडण्याची कारवाई सुरू आहे. याशिवाय थकीत पाणीपट्टी भरण्याचे आवाहन महापालिका ‘एसएमएस’ सह अन्य माध्यमांतून करत आहे. मात्र, महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या नावाने विविध मोबाईल क्रमांकावरून बनावट ‘एसएमएस’ पाठवण्याचे प्रकार सुरू आहेत, अशा ‘एसएमएस’कडे दुर्लक्ष करण्याचे आणि अशा आशयाचा कोणताही ‘एसएमएस’ महापालिकेकडून पाठवण्यात येत नसल्याने नागरिकांनी घाबरून न जाता ‘एसएमएस’ येताच तक्रार करावी, असे आवाहन महापालिकेसह पोलिसांनी केले आहे.
असा आहे ‘एसएमएस’
पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना पाठवण्यात येणारे बनावट ‘एसएमएस’ देवेश जोशी या नावाने आहेत. या एसएमएसमध्ये नमूद करण्यात आले आहे की, ‘प्रिय ग्राहक, मागील महिन्यातील बिल न भरल्यामुळे रात्री ९ वाजता पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. कृपया, याबाबत तत्काळ खालील नंबरवर कॉल करा.’
नागरिकांना आवाहन...
- पाणीपुरवठाबाबतचे ‘एसएमएस’ बनावट आहेत का, याबाबत खात्री करावी
- सायबर गुन्हेगारांकडून येणारी एपीके फाईल डाऊनलोड करू नये किंवा इतरांना पाठवू नये
- प्रलंबित बिलासंबंधी महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन माहिती घ्यावी
- फसवणुकीच्या प्रकारांपासून सावध राहावे
- पोलिस ठाणे किंवा सायबर पोलिस ठाण्याशी तत्काळ संपर्क साधून तक्रार करावी
इथे करा तक्रार
- आपल्या जवळचे पोलिस ठाणे
- सायबर पोलिस ठाणे, प्रेमलोक पार्क, चिंचवड
- www.cybercrime.gov.in संकेतस्थळ
- हेल्पलाइनवर १९३० संपर्क करावा
महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या नावाने बनावट ‘एसएमएस’ वारंवार विविध क्रमांकावरून नागरिकांना पाठवण्यात येत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. नागरिकांनी फसवणूक करणाऱ्या ‘एसएमएस’कडे दुर्लक्ष करून त्यामध्ये नमूद क्रमांकावर संपर्क करू नये. तसेच बनावट ‘एसएमएस’द्वारे पाठविण्यात येणारे ‘एपीके’ डाऊनलोड करू नये. बनावट ‘एसएमएस’ पाठवणाऱ्यांबाबत महापालिकेने सायबर पोलिसांना माहिती दिली आहे. नागरिकांनीही देखील बनावट ‘एसएमएस’ प्राप्त झाल्यास सायबर पोलिसांकडे तक्रार करावी.
- शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, महापालिका
व्हॉट्सअपद्वारे नागरिकांना पाठवण्यात येणाऱ्या ‘एसएमएस’मध्ये एपीके (APK) फाईल पाठवली जात आहे. ही एपीके फाईल डाऊनलोड केल्यानंतर मोबाईल फोनमधील डेटा, बँक खात्याची माहिती, पासवर्ड अशा स्वरुपाच्या माहितीची इत्यादींची चोरी होऊन बँक खात्यातून पैसे काढून नागरिकांची फसवणूक केल्याचे प्रकार घडत आहेत. फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांनी असा ‘एसएमएस’ किंवा लिंकला प्रतिसाद देऊ नये. पोलिस ठाण्यात किंवा सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार करावी.
- संदीप डोईफोडे, पोलिस उपआयुक्त, गुन्हे शाखा, पिंपरी-चिंचवड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.