पिंपरी, ता. ११ ः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बालेवाडीत मंगळवारी (ता. १०) झालेल्या वर्धापन दिन मेळाव्यानंतर पिंपरी-चिंचवडमधील पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारेल का? याची चर्चा सुरू झाली आहे. कारण, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत मनोमिलन होण्याबाबत नेतेमंडळींनी भाष्य केले नाही. मित्र पक्ष भारतीय जनता पक्षासोबत राहिल्यास महापालिकेच्या किती जागा वाट्याला येणार? किंवा स्वतंत्र लढल्यास भाजपच प्रतिस्पर्धी राहणार? शिवाय, निवडणूक महायुतीत लढायची की स्वतंत्र याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने कार्यकर्ते व इच्छुकांमध्ये संभ्रम आहे. आता निवडणुकीसाठी प्रभाग पद्धती निश्चित झाल्याने पक्ष संघटनेला बळकटी देण्याची आवश्यकता आहे.
पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारेल, अशी अपेक्षा होती. दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येतील का?, याकडेही लक्ष होते. मात्र, बालेवाडीत झालेल्या मेळाव्यात तसे कोणतेही संकेत मिळाले नाहीत. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातील कार्यकर्त्यांना आता स्वबळावर किंवा मित्र पक्षांच्या मदतीने स्थानिक पातळीवर लढावे लागणार आहे. शहरातील ‘राष्ट्रवादी’ला पुन्हा सत्तेच्या रिंगणात आणण्यासाठी एकत्रित आणि आक्रमक कामाची गरज आहे.
निवडणुकीची रणनीती न ठरल्याने सध्या अनेक पदाधिकारी बॅकफुटवर असल्याचे दिसत आहे. पक्षाची ताकद केवळ मोजक्याच नेत्यांपुरती सीमित राहिल्यास आगामी निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे नव्याने संघटन बांधणी, युवकांचा सहभाग, विविध घटकांशी संपर्क आणि निवडणुकीचा आराखडा तयार करणे आवश्यक आहे. दरम्यान, राज्यात भाजप हा मित्र पक्ष असला तरी शहरात ‘राष्ट्रवादी’ला स्वतंत्र अस्तित्व राखत आपली ताकद दाखवावी लागणार आहे. यासाठी केवळ अजित पवार यांचे नाव वापरून चालणार नाही, तर स्थानिक पातळीवर मजबूत संघटन, नेतृत्व आणि ठोस कृती याची नितांत गरज आहे. यामध्ये स्थानिक पदाधिकारी यशस्वी होतात का, हे आता पहावे लागणार आहे.
पिंपरी-चिंचवडमधील आव्हाने...
- मित्रपक्ष भाजपसोबत थेट किंवा मैत्रीपूर्ण लढत
- स्थानिक नेतृत्व सशक्त करणे
- कार्यकर्त्यांमध्ये उत्साह, संघटनात्मक हालचालींना गती देणे
- स्वतंत्र लढल्यास प्रत्येक प्रभागात उमेदवार शोधणे
- भाजप-शिवसेनेसोबत असल्यास जागा वाटपात २०१७ च्या विजयी जागापेक्षा अधिक मिळतील का?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.