रिक्षाची तोडफोड करत रोकड लुटली
पिंपरी : ‘येथे गाडी लावायची नाही, जर गाडी लावायची असेल तर पैसे दे’, अशी धमकी देत चौघांनी मिळून एका रिक्षाचालकाला शिवीगाळ करत त्याच्या खिशातून पैसे काढून घेतले. तसेच रिक्षाची तोडफोड करून परिसरात दहशत माजवली. ही घटना भोसरीतील बालाजीनगर येथे घडली. या प्रकरणी रोहित अरुण गायकवाड (रा. बालाजीनगर, भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अशोक गोंधणे (वय २०), रोहित पारवे (वय २१), अरुण गोटे (वय २२) यांना अटक केली असून एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी कोयते हवेत फिरवत ‘आम्ही इथले भाई आहोत, कोणी पोलिसात तक्रार केली; तर आम्हाला जो नडला त्याला कायमचा तोडला’, अशी धमकी देत परिसरात दहशत निर्माण केली.
भाड्याचे पैसे न दिल्यावरून एकाला बेदम मारहाण
पिंपरी : ट्रक भाड्याचे सर्व पैसे न दिल्याच्या कारणावरून कार्यालयात घुसून एकाला बेदम मारहाण केली. ही घटना चिखलीतील पूर्णानगर येथे घडली. या प्रकरणी अमरदीप श्रीसत्यनारायण तिवारी (वय ३९, रा. विकासनगर, देहूरोड) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार जॉनर रिचर्ड उर्फ राजेश (वय ४५, रा. गोडाऊन चौक, भोसरी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीने फिर्यादीच्या कार्यालयात घुसून ट्रक भाड्याचे पैसे मागितले व न दिल्याच्या कारणावरून त्यांच्या डोक्यात दारूच्या बाटलीने मारून जखमी केले.
दोन मोटारींच्या धडकेत चालक ठार
पिंपरी : एका मोटारीने दुसऱ्या मोटारीला धडक दिली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला. ही घटना पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से टोल नाक्याजवळ घडली. विशाल पुंडलिक बडिगीर (वय ३९, रा. मोहननगर, चिंचवड) असे या अपघातात मृत्यू झालेल्या चालकाचे नाव आहे. या प्रकरणी गमनाराम रणछोडाराम चौधरी (रा. पुनावळे) यांनी शिरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विशाल यांच्या मोटारीची फिर्यादीच्या मोटारीला धडक बसली. या अपघातात दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले. तसेच विशाल हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
गॅस चोरी प्रकरणी एकाला अटक
पिंपरी : घरगुती गॅसची चोरी करून काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या तरुणाला दिघी पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई चऱ्होली येथे करण्यात आली. संदीप रामराव सूर्यवंशी (वय २५, रा. चऱ्होली, मूळ -बोरूळ, ता. देवणी, जि. लातूर.) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी सूर्यवंशी हा गॅस सिलिंडरमधून गॅस चोरी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पठारे मळा येथे छापा टाकून सूर्यवंशी याच्याकडून गॅस सिलिंडर व गॅस चोरीसाठी लागणारे एक लाख ५७ हजार २९२ रुपये किंमतीचे साहित्य जप्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.