वर्धापनदिन लेख ः पीसीएमसी @ ३२
---
डिझेल ते हायड्रोजन;
पीएमपी बसचा प्रवास
लाल पिवळ्या रंगाच्या डिझेलवर धावणाऱ्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसमध्ये टप्प्याटप्प्याने बदल होत गेले. हरित ऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन देत कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी डिझेलवर धावणारी बस नंतर सीएनजीवर धावू लागली. पीएमपीच्या ताफ्यात २०१९ मध्ये पहिल्या टप्यात २५ इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या. त्यानंतर टप्याटप्याने वाढ होत गेली. सध्या ४९० इलेक्ट्रिक बस आहेत. नजीकच्या काळात दोन हजार बस येणार आहेत. शिवाय, हायड्रोजन बससाठीही हालचाली सुरू आहेत.
- अविनाश ढगे
सा र्वजनिक वाहतूक व्यवस्था विकसित झाल्यास शहराचा विकास झपाट्याने होतो अशी एक धारणा असते. पिंपरी-चिंचवड शहराच्या जडणघडणीतही वाहतूक व्यवस्थेने मोलाची भूमिका बजावली आहे. पिंपरी, चिंचवड, आकुर्डी आणि भोसरी या ग्रामपंचायतीचे क्षेत्र एकत्र करून ४ मार्च१९७० रोजी पिंपरी चिंचवड नगरपालिकेची स्थापना झाली. तेव्हा ग्रामस्थ एका गावातून दुसऱ्या गावात जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन (एसटी) महामंडळाच्या किंवा पुणे महानगरपालिका परिवहन (पीएमटी) बसचा वापर करायचे. पण मर्यादित मार्ग आणि अपुरी बस संख्या त्यामुळे नगरपालिका स्थापनेनंतर जलद प्रवासासाठी आणि व्यापार वृद्धिसाठी सार्वजनिक वाहतूक सुविधा देणारी नगरपालिकेची एखादी स्वतंत्र संस्था असावी, अशी मागणी पुढे येऊ लागली. यातूनच चार मार्च १९७४ रोजी पिंपरी चिंचवड महानगर परिवहन (पीसीएमटी) मंडळाची स्थापना झाली. तत्पूर्वी त्यावेळेच्या पिंपरी गावातील आणि आताच्या लालबहादूर शास्त्री भाजी मंडईच्या ठिकाणाहून२८ फेब्रुवारी १९७४ रोजी एमएचएफ ३१०६ क्रमांकाची पहिली बस धावली ती पिंपरी ते भोसरी या मार्गावर. तेव्हा बसचे तिकीट होते अवघे २५ पैसे. शहराचे शिल्पकार अण्णासाहेब मगर यांनी बस सुरू करण्यामध्ये मोलाची भूमिका बजावली होती. मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम, १९४९ च्या कलम २५ अंतर्गत स्थापन झालेल्या परिवहन समितीमार्फत पीसीएमटीचे व्यवस्थापन केले जात होते. पहिले वाहतूक अधीक्षक म्हणून रोहिदास कोंडे यांनी कार्यभार सांभाळला. सुरुवातीला पिंपरी ते भोसरी आणि चिंचवड ते भोसरी आणि वडगाव मावळ ते ॲम्युनेशन फॅक्टरी या तीन मार्गांवर बससेवा सुरू होती. हळुहळू मार्गांचा विस्तार होत गेला आणि पुणे शहरात पहिल्यांदाच पीसीएमटीची बस धावली ती १९८५-८६ च्या कालावधीत. ५३ क्रमाकांची बस पिंपरी ते पुणे स्टेशन मार्गावर धावली. आठ बस आणि तीन मार्गांवरून सुरू झालेला प्रवास एप्रिल २००७ मध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका परिवहन संस्थाचे (पीएमटी आणि पीसीएमटी) विलीनीकरण होईपर्यंत १५० बस आणि ८० मार्गांवर पोहोचला होता. दोन्ही परिवहन संस्थाचे १९ ऑक्टोबर २००७ रोजी विलीनीकरण होऊन पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) स्थापन झाले. यानंतर मोठ्या प्रमाणावर मार्गांचा विस्तार होत गेला. बसची संख्या वाढली. तसेच दोन्ही महामंडळामध्ये असलेली स्पर्धा संपली. सद्यःस्थितीत पुणे, पिंपरी चिंचवड शहर आणि पीएमआरडीए हद्दीत ३८९ मार्गांवर १,७५० बस धावत आहेत. यात ४९० इलेक्ट्रिक बस, १३०० सीएनजी बस आणि २७७ डिझेल बसचा समावेश आहे. इलेक्ट्रिक बस नंतर पीएमपीएमएलच्या ताफ्यात हायड्रोजन बसही दाखल करण्याच्या हालचाली सुरू आहेत. नुकतीच हायड्रोजन बसची चाचणी झाली. हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या रासायनिक अभिक्रेयेद्वारे तयार होणाऱ्या उर्जेवर ही बस धावणार आहे. या प्रक्रियेत फक्त पाणी आणि उष्णता उत्सर्जित होणार असल्याने या बस प्रदूषण विरहित आणि पर्यावरणस्नेही असणार आहेत.
मॅन्युअली ‘ट्रे’ ते ‘डिजिटल’ तिकीट प्रवास
प्रारंभीच्या काळात टप्पेनिहाय तिकीट देताना विशिष्ट क्रमांकावर पंचिंग केले जात. कंडक्टरच्या एका खांद्यावर तिकिटांचा ॲल्युमिनिअमचा मॅन्युअली ट्रे, दुसऱ्या खांद्यावर पैशांची चामडी बॅग असे. एका हाताने प्रवासाची तिकिटे मोजून थांब्यांच्या क्रमांनुसार पंचिंगच्या चिपळीने कर्णमधूर ‘टिकटिक’ करणारा बस कंडक्टर तिकीट-तिकीट म्हणत हातातील पंचिंग मशिन वाजवीत तिकीट देत असत. तीन ठिकाणी पंच करीत कडक पुठ्ठ्याच्या तिकिटावर प्रवासाच्या तारखेचे पंचिंग करणाऱ्या मशिनची तिकीट उपलब्ध होत.
कालांतराने हे तिकीट कागदी स्वरुपात उपलब्ध आहे. त्यात बदल होत २००९ मध्ये इलेक्ट्रॉनिक तिकीट मशिन्सवर स्वीच केले; पण या दोन्ही प्रणालींमध्ये सुट्या पैशांवरून वाहक-प्रवाशांत अनेकदा वाद होत. त्यामुळे हा चिंतेचा विषय बनला होता. दरम्यान, ऑक्टोंबर २०२३ पासून एक पाऊल पुढे टाकले असून, ‘डिजिटल’ प्रणालीद्वारे प्रवाशांना तिकीट खरेदी करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला. नव्या मशिनमुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान रोख पैशांऐवजी यूपीआय, क्यूआर कोड आदी डिजिटल पेमेंटचा वापर करीत तिकीट काढता येत आहे. पीएमपीएमएलने प्रवाशांना घरबसल्या बसचे ‘लाइव्ह लोकेशन’ दिसावे, ऑनलाइन तिकीट व पास काढता यावा, ऑनलाइन तक्रार करता यावी, म्हणून ‘आपली पीएमपीएमएल’ हे ॲप विकसित केले असून, १५ ऑगस्ट २०२४ पासून हे ॲप प्रवाशांच्या सेवेत दाखल झाले आहे. त्यामुळे पीएमपीएमएलचा प्रवास मॅन्यूअली ट्रे ते डिजिटल तिकीटापर्यंत येऊन ठेपला आहे.
सात ई-डेपोंचा समावेश...
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात धावणारी पीएमपीएमएल आता ग्रामीण भागातही धावू लागली आहे. दिवसेंदिवस पीएमपीएमएल बस मार्गांचा विस्तार वाढत असून, डेपोंची संख्या देखील वाढत आहे. पुणे आणि पीसीएमसी परिवहन संस्थाचे विलिनीकरण झाले तेव्हा दोन्ही शहरात पीएमपीएमएलचे एकूण ११ डेपो होते. पण, बस संख्येत वाढ होत गेल्याने डेपोंची संख्या अपुरी पडत गेली त्यामुळे पीएमपीएमएलकडून पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेकडे विविध जागांची मागणी करुन सात नवीन डेपो सुरू करण्यात आले असून, सध्या १७ डेपो आहेत. यात पीएमपीएमएलच्या भेकराईनगर, पुणे स्टेशन, बाणेर, निगडी (भक्ती-शक्ती), वाघोली, हिंजवडी फेज-२ आणि चऱ्होली या सात ई-डेपोंचा समावेश आहे. पीएम-ई-ड्राइव्ह अंतर्गत सहा महिन्यांत आणखी एक हजार इलेक्ट्रिक बस दाखल होणार असून, १,२०० सीएनजी बसही दाखल होणार आहेत. त्यामुळे अस्तित्वात असलेले डेपो अपुरे पडणार आहेत. पीएमपीएमएल प्रशासनाने चाकण, रांजणगाव एमआयडीसीत देखील डेपो सुरू करण्यासाठी एमआयडीसीकडे जागेची मागणी केली असून, पीएमआरडीए प्रशासनाकडेही डेपोंसाठी जागेची मागणी केली आहे. त्यामुळे भविष्यात पीएमपीएमएलचे आणखी पाच नवीन डेपो वाढण्याची शक्यता असून, २२ वर डेपोंची संख्या जाणार आहे. प्रदूषण विरहित आणि पर्यावरणस्नेही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकडे पीएमपीएमएलची वाटचाल सुरू असून, डिझेल बसपासून सुरू झालेला प्रवास आता हायड्रोजन बसपर्यंत येवून ठेपला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.