पिंपरी, ता. ४ ः नागरिकांना सकाळी आणि सायंकाळी चालता यावे, मुलांना खेळता यावे, ज्येष्ठांना विरंगुळा घेता यावा, याकरिता शहराच्या विविध भागात महापालिकेने उद्याने विकसित केली आहेत. मात्र, उद्यानाच्या देखभाल दुरुस्तीकडे उद्यान विभागातील अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे. काळेवाडीतील ज्योतिबा उद्यानाची दुरवस्था झाली असून, झाडाच्या मुळ्या उघड्या पडल्या आहेत. खेळणी तुटली आहेत. राडारोडा पडला असून, उद्यानात फिरायला येणाऱ्या नागरिकांचा हिरमोड होत आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या काळेवाडीतील ज्योतिबा उद्यानात दररोज सकाळी आणि सायंकाळी फिरण्यासाठी काळेवाडी, थेरगाव, रहाटणी भागातील रहिवासी येत असतात. लहान मुले देखील खेळण्यांचा आनंद लुटण्यासाठी येत असतात. त्यांना पिण्यासाठी पाण्याची सोय नाही. उद्यानातील नागरिकांसाठी लोकार्पण केलेल्या पाणपोईची दुरवस्था झाली आहे. नळ तुटले आहेत. आजूबाजूला घाण साठली आहे. शोभेचा धबधबा उखडला आहे. झाडांच्या मुळ्या उघड्या पडल्या आहेत. मोठ्या वादळात ही झाडे उन्मळून पडण्याची शक्यता आहे. उद्यान विकसित करून दहा वर्षाचा कालावधी लोटला. येथील झाडे सुद्धा दहा वर्षांची झाली असून, मोठ्या वादळात उन्मळून पडल्यास मोठी हानी होणार आहे. झाडांच्या मुळा उघड्या असल्यामुळे पाणी सोडल्यानंतर इतरत्र वाहून जाते. झाडांना नित्यनियमाने पाणी देण्यासाठी बुडाला मातीचे आळे करण्याची गरज आहे.
उद्यानात छत्रपती संभाजी महाराज योग साधना सभामंडपाचे काम सुरू आहे. त्याचा राडारोडा, सिमेंटची पोती आजूबाजूला पडली आहेत. पवना नदीकाठी सीमाभिंत नसल्यामुळे उद्यानात भटक्या कुत्र्यांचा मुक्त वावर आहे. फिरायला येणाऱ्या नागरिकांना, लहान मुलांना व महिलांना कुत्र्यांची भीती वाटू लागली आहे, असे फिरायला आलेल्या महिला सांगत आहेत. उद्यान निरीक्षक, सुरक्षारक्षक व इतर कर्मचारी येथील बंद खोलीत बसलेले असतात. त्यांचे लक्ष नसल्यामुळे उद्यानाची दुरवस्था झाली आहे. महापालिका उद्यान विभागातील अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन उद्यानाची नियमित देखभाल दुरुस्ती करण्याची अपेक्षा आहे.
उद्यानातील समस्या
- उद्यानातील खेळणी तुटली
- झाडांच्या मुळा उघड्या पडल्या
- उद्यानाला सीमाभिंत नाही
- कुत्र्यांचा मुक्त वावर
- नदी पुरात उद्यान पाण्याखाली
- दारूच्या बाटल्या पडलेल्या स्थितीत
दररोज सकाळी चालण्यासाठी तसेच व्यायाम करण्यासाठी मी आणि माझे सहकारी मित्र उद्यानात येतो. उद्यानाची दुरवस्था पाहून वाईट वाटते. उद्यानाला सीमाभिंत नाही. भटकी कुत्री उद्यानात प्रवेश करतात. दारू, थंड पेय तसेच पाण्याच्या बाटल्या पडलेल्या असतात. अशा प्रकारावर महापालिका अधिकाऱ्यांनी नियंत्रण ठेवले पाहिजे.
- भरत आसवले, नागरिक
उद्यानाला सीमाभिंत नसल्यामुळे पावसाळ्यात नदीला पूर आल्यानंतर उद्यान पाण्याखाली जाते. त्यामुळे झाडाच्या बुडातील माती पाण्यासोबत वाहून गेली आहे. माती उपलब्ध करून देण्याची मागणी वरिष्ठांकडे केली आहे. तसेच, इतर दुरवस्थेबाबत वरिष्ठांना कळवले आहे. लवकरच दुरुस्ती काम हाती घेतले जाईल.
- ज्ञानेश्वर कांबळे, सहायक उद्यान निरीक्षक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.