पिंपरी, ता. १३ ः शहरात सध्या मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरू आहेत. त्यामुळे बांधकामासाठी आवश्यक कच्चा माल पुरविणाऱ्या गाड्यांचीही वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, या बांधकामाच्या साइटमधून किंवा आरएमसी प्लॅंटमधून बाहेर या गाड्या कोणत्याही नियमांचे पालन करत नसल्याचे निदर्शनास आले आहे. परिणामी, या गाड्यांच्या चाकांना कधी चिखल लागून येतो. तर खडी रस्त्यावर सांडते. अनेकदा राडारोडा वाहून नेणाऱ्या गाड्यांवर अच्छादन नसल्याने रस्त्यावर धूळ पसरते. त्यामुळे धुळीचा त्रास होण्यासोबतच रस्त्यावर आलेल्या चिखलामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.
नियमांचे उल्लंघन
शहरात विविध विकासकामांसोबतच गृहनिर्माण सोसायट्यांची बांधकामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. या बांधकामासाठी आवश्यक असणारे रेडी मिक्स कॉक्रीट, वाळू, खडी, सिमेंट अशा कच्च्या मालाची वाहतूक वाढल्याने शहरात सर्रास अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. या गाड्या अनेकदा वेगमर्यादा पाळत नाहीत. एवढेच नाही तर या वाहनांसाठी आखून दिलेल्या नियमावलीचेही अनेकदा उल्लंघन करतात. नियमानुसार बांधकामाच्या ठिकाणहून किंवा आरएमसी प्लॅंटच्या बाहेर पडताना संबंधित वाहनांची चाके स्वच्छ धुणे आवश्यक आहे. जेणे करून या ठिकाणचा चिखल रस्त्यावर येणार नाही. मात्र, असे असूनही वाहने या नियमाचे पालन करताना दिसत नाहीत. त्यामुळे बांधकामाच्या ठिकाणचा चिखल रस्त्यावर येतो. या चिखलावरून दुचाकी घसरल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहेत. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करून शहरभर फिरणाऱ्या या गाड्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
पर्यावरण विभागाची उदासीनता
शहरातील रस्त्यांवर राडारोडा पाडणाऱ्या व रस्ते चिखलमय करणाऱ्या या गाड्यांवर कारवाई करण्यासाठी करण्यासाठी स्क्वॉड नेमण्यात आले असून, त्याद्वारे प्रत्यक्ष बांधकामाच्या ठिकाणी जाऊन कारवाई करण्यात येत असल्याचे पर्यावरण विभागाने स्पष्ट केले आहे. मात्र, असे असूनही शहरभर फिरणाऱ्या या गाड्यांना जरब का बसत नाही. रस्ते खराब करणाऱ्यांकडून ते पुन्हा स्वच्छ केले जात नाहीत, असा प्रश्न उपस्थित राहतो.
तक्रारीनंतर बांधकाम व्यावसायिकाने धुतले रस्ते
हिंजवडी परिसरात नागरिकांनी केलेल्या तक्रारींची दखल घेत एमआयडीसी प्रशासनाने तातडीने कारवाई केली. एका बांधकाम व्यावसायिकाच्या साइटवरून बाहेर येणाऱ्या वाहनांमुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल झाला होता. नागरिकांच्या तक्रारीनंतर, एमआयडीसीच्या आदेशानुसार संबंधित बांधकाम व्यावसायिकाने तत्काळ रस्ते धुऊन स्वच्छ केले. अशाच प्रकारे शहरातील इतर भागांमध्येही प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची गरज आहे, अशी मागणी आता जोर धरत आहे.
‘पंधरा दिवसांपूर्वीच आमच्या परिसरात एका महिलेचा ट्रेलर खाली आल्याने जीव गेला. जिथे अपघात झाला तो रस्ता तर चांगला होता. मात्र, त्यावर चिखल झाल्याने गाडी घसरून हा अपघात झाला. आमच्या परिसरात अवजड वाहनांची कायम वर्दळ असते. या गाड्या कोणतेही नियम पाळत नाहीत. त्यामुळे आरोग्यासोबतच येथील नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.’
- एक नागरिक, पुनावळे
‘प्रत्येक आरएमसी प्लॅंटवर आणि बांधकामाच्या ठिकाणी व्हील वॉशिंग सिस्टिम असणे अनिवार्य आहे. त्यामुळे या गाड्यांची चाके धुवूनच त्या रस्त्यावर येणे अपेक्षित आहे. ही यंत्रणा आहे का हे पाहण्यासाठी आमच्या विभागाने स्क्वॉड नेमले आहेत. तसेच तक्रार आली की आम्ही त्वरित कारवाई करतो.’
- संजय कुलकर्णी, मुख्य अभियंता, पर्यावरण विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.