पिंपरी, ता. १६ ः थरांचा थरथराट... पावसाच्या सरी अंगावर घेत गोविंदांचे मानवी मनोरे ...ढोल-ताशांचा गजर, ‘डीजे’च्या ठेक्यावर थिरकणारी तरुणाई... लाखो रुपयांचे बक्षीसरूपी ‘लोणी’ आणि सिने कलाकारांची हजेरी असे जल्लोषपूर्ण वातावरण शनिवारी (ता.१६) दहीहंडी उत्सवात पाहायला मिळाले. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आलेल्या दहीहंडी उत्सवात राजकीय नेत्यांनी गोविंदा पथकांना लाखो रुपयांची बक्षीस जाहीर केली.
पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, प्राधिकरण, वाकड, भोसरीसह शहरातील विविध ठिकाणी राजकीय पक्ष आणि संघटनांकडून दहीहंडी उत्सव आयोजन करण्यात आले. शहरातील स्थानिक पथकांसह मुंबई आणि ठाणे शहरातून आलेल्या पथकांनी हजेरी लावली. गोविंदा पथकांनी दहीहंडी फोडण्यासाठी तसेच सलामी देण्यासाठी रचलेले चित्तथरारक थर सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते. दहीहंडी पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. या उत्सवात अनेक ठिकाणी ‘सेलिब्रिटीं’नी हजेरी लावल्यामुळे गोविंदांचा उत्साह द्विगुणित झाला. अनेक ठिकाणी पाच, सहापासून आठ थरांचे चित्तथरारक मानवी मनोरे रचण्याची स्पर्धा लागली. फुगेवाडी येथील श्रीकृष्ण दहिकाला पथक, मुंबईतील चेंबूर येथील गोविंदा पथकांचा बोलबाला राहिला.
महिला पथकांचा सहभाग
एरवी दहीहंडी उत्सवामध्ये पुरुषांची पथके भाग घेत असतात. पण, गेल्या काही वर्षांपासून महिला गोविंदा पथके तयार होत आहेत. पिंपरी चिंचवड शहरात शनिवारी राज्याच्या विविध भागांतील महिला गोविंदा पथके दाखल झाली. गोविंदा रे गोपाळा’ असा जल्लोष करत महिला गोविंदा पथकांनीही दहीहंडी फोडली.
लाखोंच्या बक्षिसांची लयलूट
पावसाची तमा न बाळगता गोविंदा पथके थर लावण्यासाठी सज्ज झाली. गोविंदा पथक थरावर थर लावत होते. बक्षीस मिळविण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चढाओढ पाहण्यास मिळाली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदा दहीहंडी उत्सवात राजकीय शक्तिप्रदर्शन मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळाले. आयोजकांकडूनही गोविंदांसाठी लाखोंच्या बक्षिसांची लयलूट करण्यात आली. गोविंदा पथकांच्या सलामीला थरांनुसार दहा हजारांपासून ते दोन लाखांपर्यंतची बक्षीसांची रक्कम देण्यात आली. तर दहीहंडी फोडणाऱ्या पथकांसाठी एक लाखापासून ते आठ लाख रुपयांपर्यंतच्या बक्षीसांचे वाटप करण्यात आले. शहरात सुमारे चाळीस ते पन्नास लाख रुपयांच्या बक्षिसांचे वाटप करण्यात आल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
गोविंदांच्या सुरक्षेची खबरदारी
दहीहंडीसाठी सरकारने विशेष नियमावली जारी केली आहे. खेळाडूंच्या सुरक्षेसाठी आणि दुदैवी घटना टाळण्यासाठी गोविंदा पथकांना सुरक्षा साधनांचा वापर करणे अनिवार्य आणि प्रत्येक गोविंदाचा विमा काढणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार अनेक मंडळांनी आणि पथकांनी गोविंदांच्या सुरक्षेची खबरदारी घेतल्याचे दिसून आले.
सिनेतारकांची हजेरी
गेल्या काही वर्षांत दहीहंडीच्या सणाला ‘ग्लॅमर’चे स्वरुप आले आहे. कोण किती मोठा ‘सेलिब्रिटी’ स्टेजवर घेऊन येतो...यासाठी मंडळांमध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे. यंदा शहरात दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री श्रीलीला, सायली संजीव, तेजस्विनी पंडित, कृती खरबंदा, स्मिता गोंदकर, मानसी पुणेकर, त्रिधा चौधरी, श्रुती हासन, जिया शंकर, फेम शिवानी सुर्वे, माधवी निमकर यांना निमंत्रित करण्यात आले.
‘इव्हेंट मॅनेजमेंट’वर लाखोंचा खर्च
दहीहंडी उत्सवाला आता ‘इव्हेंट’चे स्वरूप आले आहे. जाहिरातीपासून उत्सवात होणारी गर्दी नियत्रंण करण्यासाठी लागणाऱ्या बाऊन्सरपर्यंतचे सर्वच काम इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला दिले जात आहे. इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचे प्रशांत जाधव म्हणाले, ‘‘यंदा आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा केला जात आहे. आयोजकांकडून साऊंड सिस्टिम, लेझर-शो, एलईडी-लाइट वॉलची मागणी होती. साऊंड सिस्टिमसाठी ८० हजार रुपयांपासून ते पाच लाखांपर्यंत खर्च येतो. एलईडी-लाइट वॉल, लाइव्ह कॅमेरासाठी जिमी, जनरेटर यांचे नियोजन
करावे लागते. सिनेतारकांना बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. गर्दीचे नियोजन करण्यासाठी आता आयोजक बाऊन्सरचीही मागणी करतात. एका दहीहंडीचे नियोजन करण्यासाठी सुमारे १५ ते २० जणांची टीम काम करते. एका कार्यक्रमासाठी किमान १५ लाख रुपयांपासून ते ४० लाखांपर्यत खर्च येतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.