पीतांबर लोहार ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १९ ः राजस्थानमध्ये काही भागांत पाच दिवस तर काही भागांत सहा दिवस दिवाळी सण साजरा केला जातो. धनत्रयोदशीच्या दिवशी दिवाळीला प्रारंभ होतो. लक्ष्मी पूजन आणि गोवर्धन पूजा यांना अधिक महत्त्व असते, पिंपरी चिंचवडमधील कोयनानगरमध्ये राहणारे आणि मूळचे राजस्थानचे रहिवासी हुकुमसिंग राठोड सांगत होते.
पिंपरीतील टाटा मोटर्स कंपनीत क्वॉलिटी कंट्रोल विभागातून २०१२ मध्ये निवृत्त झालेले हुकुमसिंग राठोड यांच्याकडून राजस्थानात दिवाळी सण साजरा करण्याच्या प्रथा-परंपरांबाबत जाणून घेतले. विशेषतः त्यांनी शुद्ध मराठीत बोलून माहिती दिली. एकही शब्द राजस्थानी किंवा हिंदी उच्चारला नाही. त्यांचा मुलगाही एका कंपनीत उच्चपदावर कार्यरत आहेत. राठोड यांचे मूळगाव बुटाटीधाम (जि. नागोर, राजस्थान) आहे. सध्या ते गावी आहेत. ते म्हणाले, ‘‘पुणे, पिंपरी-चिंचवड अर्थात महाराष्ट्राप्रमाणेच राजस्थानातही दिवाळी सणाला तेलाचे दिवे घरोघरी लावले जातात. रांगोळ्या काढल्या जातात. विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र दिवाळीचा प्रारंभ धनत्रयोदशीपासून होतो. लक्ष्मी मातेची पूजा केली जाते. ‘घेवर’, ‘फेणी’ यांसारखी पारंपरिक मिठाई एकमेकांना वाटली जाते. घरोघरी तसेच किल्ले, राजवाड्यांवर रोशणाई केली जाते. तेलाचे दिवे, आकाश कंदील लावल्यामुळे सर्व उजळून निघते. घरोघरी देवी लक्ष्मी मातेची पूजा केली जाते. फटाके वाजवून आतिषबाजी केली जाते. काही भागांत सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जातात. या सणाचा एक वेगळाच आनंद असतो. लक्ष्मी पूजन, गोवर्धन पूजा आणि भाऊबीजही उत्साहात साजरी केली जाते.
श्रीकृष्णाप्रति कृतज्ञता
भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत आपल्या बोटावर उचलून वृंदावनातील लोकांना मुसळधार पावसामुळे वाचवले होते. या घटनेची आठवण म्हणून गोवर्धन पूजा दिवाळीच्या चौथ्या दिवशी केली जाते. याला ‘अन्नकुट’ म्हणजे अन्नाचा डोंगर असेही म्हटले जाते. समृद्धी आणि देवाच्या कृपाशीर्वादासाठी गोवर्धन पूजा केली जाते. काही ठिकाणी गाईंची पूजाही केली जाते. ही पूजा भक्ती, कृतज्ञता आणि देवावरील श्रद्धेचे प्रतीक मानली जाते, असे राठोड यांनी सांगितले.
‘‘महाराष्ट्रसारखीच राजस्थानातही दिवाळी सण साजरा केला जातो. धनत्रयोदशीला धन्वंतरी देवतेबरोबरच धनाची, सोने, चांदी, मौल्यवान रत्ने, पैशांची पूजा केली जाते. घरासमोर किंवा अंगणात गाईच्या शेणापासून डोंगराची प्रतिकृती केली जाते. त्याची मनोभावे पूजा केली जाते. दिवे लावले जातात. त्याला गोवर्धन पूजा म्हणतात. त्यानंतर एकमेकांच्या घरी जाऊन ज्येष्ठांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले जातात. त्याला रामाश्यामा म्हटले जाते.
- हुकुमसिंग राठोड, सेवानिवृत्त कामगार, कोयनानगर, मूळगाव बुटाटीधाम, राजस्थान
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.