पिंपरी, ता. १८ ः संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याच्या स्वागताची पिंपरी चिंचवड महापालिकेने जोरात तयारी केली आहे. पालखी सोहळ्यातील लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी आरोग्य, वैद्यकीय, पाणी पुरवठा, अग्निशामक आदी विभाग सज्ज झाले आहेत. निगडी येथील प्रवेशद्वारावर पालखीचे स्वागत करण्यापासून ते आकुर्डी येथील मुक्कामासह दुसऱ्या दिवशी दापोडी येथे पालखीचे प्रस्थान होईपर्यंत या मार्गावर ठिकठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. तर संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी आळंदी - दिघी मार्गावर सेवा देण्याची पूर्वतयारी झाली आहे.
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या निगडी येथील आगमनाच्या ठिकाणी आरोग्य विभागाकडून चोख व्यवस्था करण्यात आली आहे. स्वागत कक्षाच्या परिसरात पालखी सोहळ्यादरम्यान रस्त्यावर टाकल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या बाटल्या, केळीच्या साली, खाद्य पदार्थांची पाकिटे, यूज ॲण्ड थ्रो पाकिटे आदी कचरा उचलण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. सफाई कामगार, कचरा वेचक हे पालखी सोहळ्यातील शेवटचा वारकरी मार्गस्थ होईपर्यंत स्वच्छतेची देखभाल करणार आहेत. आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरातील मुक्कामाच्या ठिकाणी तसेच परिसरात स्वच्छता ठेवण्यासाठी ५० हून अधिक सफाई कामगार नेमण्यात आले आहेत.
वारकऱ्यांसाठी सोयी-सुविधा...
- शाळेत वारकऱ्यांची राहण्याची व्यवस्था. स्वच्छता देखील चोखपणे केली जाणार
- शाळेच्या ठिकाणी पाणी पुरवठा विभागाकडून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था
- दुसऱ्या दिवशी वारकऱ्यांच्या अंघोळीसाठीही पाण्याची सोय
- आकुर्डी, चिंचवड, पिंपरी, नाशिक फाटा, फुगेवाडी, दापोडी पालखी मार्गावर एक किलोमीटर अंतरावर महिला आणि पुरुषांसाठी स्वच्छतागृहाची वेगवेगळी व्यवस्था.
- संत ज्ञानेश्वर माऊली पालखी मार्गावर आळंदी ते दिघी दरम्यान फिरती स्वच्छतागृहे, ठिकठिकाणी पाण्याचे टॅंकर
ठिकठिकाणी वैद्यकीय पथकांची नेमणूक
वैद्यकीय विभागाने निगडी येथील स्वागत कक्षापासून ते दापोडीपर्यंत प्रत्येक चौकात डॉक्टर, नर्स यांची पथके कार्यरत ठेवली आहेत. वारकऱ्यांना आरोग्य विषयक वैद्यकीय सेवा त्वरित देता यावी, यासाठी विभाग प्रमुखांनी सर्व पथकांना आदेश दिले आहे. आकुर्डी येथील मुक्कामी एक रुग्णवाहिका आणि डॉक्टरांचे पथक तैनात केले आहे. त्याचबरोबर आकुर्डी येथील खंडोबा माळ, चिंचवड, पिंपरी, नाशिक फाटा, फुगेवाडी, दापोडी सीएमई येथे वैद्यकीय पथके कार्यरत केली आहेत. तुकोबा आणि माऊली दोन्ही पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना तपासणी करुन औषधे विनामूल्य दिली जाणार आहेत.
आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्जता
अग्निशामक विभागाकडून आपत्कालीन परिस्थितीला प्रतिबंध घालण्यासाठी आकुर्डी येथील मुक्कामाच्या ठिकाणी तसेच निगडी येथील स्वागत कक्षाजवळ अग्निशामकचे बंब ठेवले जाणार आहेत. ज्ञानेश्वर माऊली पालखी मार्गावर आळंदी ते दिघी दरम्यान एक रुग्णवाहिका, एक अग्निशामक बंब आणि पाण्याचे टॅंकर कार्यरत केले आहेत. त्याचबरोबर पालखी सोहळ्यासोबत पंढरपूरपर्यंत एक अग्निशामक बंब, एक रुग्णवाहिका आणि एक पाण्याचा टॅंकर पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना सेवा पुरवणार आहेत.
संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊली या दोन्ही पालखी सोहळ्यांतील सहभागी वारकऱ्यांना सेवा देण्यासाठी ठिकठिकाणी डॉक्टरांची पथके कार्यरत राहणार आहेत. वारकऱ्यांची तपासणी करुन त्यांना औषध पुरवठा केला जाणार आहे.
- डॉ. लक्ष्मण गोफणे, मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय विभाग
दोन्ही पालखी सोहळ्यांच्या पार्श्वभूमीवर आपत्ती उद्भवणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. दोन्ही पालखी मार्गांच्या जवळील अग्निशामक केंद्रांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. तुकोबांच्या पालखी सोहळ्यासोबत एक बंब कार्यरत राहणार आहे.
- मनोज लोणकर, उपायुक्त, अग्निशामक विभाग
पालखी सोहळ्याच्या दोन्ही मार्गांवर वारकऱ्यांना शुद्ध पाणी पुरवठा
केला जाणार आहे. आकुर्डीतील मुक्कामी पालखी सोहळ्यादरम्यान पूर्णवेळ पाणी पुरवले जाणार आहे. ठिकठिकाणी टॅंकरची व्यवस्था आहे. एक टॅंकर पंढरपूरपर्यंत सेवा देणार आहे.
- प्रमोद ओभासे, मुख्य अभियंता, पाणी पुरवठा विभाग
निगडीतील स्वागत ठिकाणापासून ते आकुर्डीतील पालखी मुक्काम आणि दापोडीपर्यंत पालखी मार्गावर आरोग्य कर्मचारी कार्यरत असतील. आळंदी ते दिघी पालखी मार्गावर आरोग्य कर्मचारी काम करतील. वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल.
- सचिन पवार, उपायुक्त, आरोग्य विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.