पिंपरी, ता. २५ ः पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मवर्षाचे औचित्य साधत इंद्रायणी साहित्य संमेलनात विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. संमेलनस्थळाचे नामकरणही ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर साहित्यनगरी’ असे करण्यात आले होते.
यावेळी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे सांस्कृतिक योगदान’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. इंदूर येथील होळकर राजघराण्याचे वंशज भूषणसिंहराजे होळकर परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी होते. अभ्यासक डॉ. आम्रपाली कोकरे, प्रा. रूपाली अवचरे, इतिहासाचे अभ्यासक ॲड. प्रणव पाटील यात सहभागी झाले होते. संमेलनाध्यक्षा डॉ. सीमा काळभोर, स्वागताध्यक्ष नीलेश बोराटे, इंद्रायणी साहित्य परिषदेचे संस्थापक अरुण बोऱ्हाडे, परिषदेचे अध्यक्ष संदीप तापकीर यांनी परिसंवादात भाग घेतला.
भूषणसिंहराजे म्हणाले, ‘‘सर्वच महापुरुषांचे योगदान विस्मरणात जात असताना या परिसंवादाचे महत्त्व अधोरेखित होते. महापुरुषांचा इतिहास लिहिताना पूर्वग्रह बाजूला ठेवले पाहिजेत. माझे पणजोबा कविता लिहीत, तसेच त्यांनी ‘वीरध्वज’ हे नाटक लिहिले होते. चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्याशी त्यांचा संपर्क होता. अहिल्यादेवी यांनी मोगल शासन असलेल्या प्रांतात हिंदू मंदिरे उभारली. प्राचीन मंदिरांचा जीर्णोद्धार केला. यावरून त्यांचे परराष्ट्र धोरण किती प्रबळ होते, याची कल्पना यावी. अनेक चित्रपटांमध्ये मात्र राजेरजवाड्यांचे विपर्यस्त चित्रण केले जाते. वास्तविक आपली भाषा, संस्कृती आणि इतिहास आपणच जपला पाहिजे!’’
प्रा. अवचरे यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनपटाचा आढावा घेतला. ‘अहिल्यादेवी यांची धर्मश्रद्धा ही अंधश्रद्धा नव्हती,’ असे आग्रही मत त्यांनी व्यक्त केले. ॲड. पाटील यांनी अहिल्यादेवी तसेच होळकर घराण्यातील अज्ञात इतिहासाबद्दल अनेक रंजक बाबी सांगितल्या. ‘अहिल्यादेवी यांची राजकीय सत्ता संपली असली तरी त्यांची सांस्कृतिक शक्ती अजूनही चैतन्यदायी आहे,’ असे प्रतिपादन त्यांनी केले.
डॉ. कोकरे यांनी अहिल्यादेवी यांनी रयतेसाठी राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. ‘अहिल्यादेवी यांच्या सांस्कृतिक कार्याचा नंदादीप अजूनही तेवत आहे,’ असे गौरवोद्गार त्यांनी काढले. मीनल साकोरे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. पौर्णिमा कोल्हे यांनी आभार मानले.
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.