वर्धापनदिन पर्यावरण
--
पर्यावरण संवर्धन कृतियुक्त व्हावे
- विठ्ठल वाळुंज, भूगोल फाउंडेशन
‘‘नगरेची वसावी।
जलाशये निर्मावी।
महावने लावावी।
नानाविध।।...’’
इतकी व्यापक दूरदृष्टी संत ज्ञानेश्वर माउलींना होती. सुंदर अशी नटलेली वनश्री, त्यामुळे वसुंधरा माता विविधरंगी फुलांच्या ताटव्यांनी सजली होती. परंतु मानवी हस्तक्षेप झाल्याने व वृक्षांचा संहार झाल्याने निसर्गसाखळी खंडित होऊन पर्यावरणातील समतोल ढासळला आणि प्रतिकूल परिस्थिती निर्माण होऊ लागली. त्यामुळे निसर्ग संवर्धनासाठी ‘कृतियुक्त’ कार्यक्रमाची आवश्यकता आहे.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली यांच्या
‘‘हे विश्वची माझे घर।
ऐसी मती जयाची स्थिर।
किंबहुना चराचर।
आपणची जाहला।।...’’
या रचनेनुसार अखिल विश्वाची काळजी वाहणारे ज्ञानेश्वर माउली समर्पक शब्दांत संदेश देतात. या विश्वामध्ये अनेक आकाशगंगा आहेत, हजारो ग्रह, तारे आहेत. त्यातील पृथ्वी तथा वसुंधरा हा विश्वाचा एक छोटासा भाग त्यातील भारत देश हा आपला एक निसर्ग समृद्ध देश आहे. साडेसातशे वर्षांपूर्वी माउलींनी ज्ञानेश्वरी ग्रंथात सूचित केले आहे. समाजातील प्रत्येक घटकाने त्यात खारीचा वाटा उचलावा आणि या वसुंधरा मातेच्या रक्षणासाठी पर्यायाने आपल्या मानवी हितासाठी त्वरित पाऊल उचलत उपक्रमशील नियोजनाची आवश्यकता आहे. संस्कृती संवर्धन करण्यासाठी विविध सांस्कृतिक मंडळ, समाजोपयोगी संस्था यांनी एकत्रित येऊन कृतीची जोड देत ‘वृक्षारोपण आणि संवर्धन’ यावर भर देत सातत्यपूर्ण उपक्रमाची आवश्यकता आहे. त्यात नवयुवक, ज्येष्ठ नागरिक यांनी सहभाग देत यथाशक्ती मदत करत या ज्ञानयज्ञात सहभाग दिल्यास अपेक्षित यश लाभू शकते.
कृतियुक्त मोहीम हवी
‘डोंगर दऱ्यात जाऊ या।
बीज बीज टाकू या।
गायी गुरांना हिरवा चारा।
आनंदाचा देऊ नारा।।...’
अशा कृतियुक्त मोहीम राबविण्यात आपण यशस्वी झाल्यास ही वसुंधरा गतवैभव प्राप्त करून आनंदाचे आणि ऐश्वर्याचे गीत गाऊ लागेल.
लोकसहभाग वाढावा
आज हवा, पाणी, जमीन असे नैसर्गिक घटक प्रदूषित झाले आहेत. त्यांना प्रदूषणमुक्त करण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना अपेक्षित आहेत. यासाठी स्वयंसेवी संस्था, स्वयंस्फूर्तीने कार्य करणारी मंडळे, त्यासाठी अलीकडे अनेक गणेशोत्सव मंडळे अशी पर्यावरणपूरक कामे करत आहेत. असा लोकसहभाग मोठ्या प्रमाणात झाल्यास वसुंधरेच्या रक्षणासाठी पर्यायाने मानवाच्या रक्षणासाठी हजारो हात जोडले जातील.
पाणी जपूनच वापरू
‘पाणी हे पृथ्वीवरचे अमृत आहे’ अशी धारणा होईल तो सुदिन समजावा, अशी सद्यस्थिती आहे. ‘जलसाक्षरता अभियान’ हि एक चळवळ होऊन त्याची फलनिष्पत्ती आणि त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचा संस्कार प्रत्येक नागरिकांवर होणे गरजेचे आहे. बदलत्या काळानुसार सांडपाण्याचे शुद्धीकरण करून त्याचा पुनर्वापर अपरिहार्य आहे. तसेच ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ अर्थात पावसाच्या पाण्याचे जमिनीत पुनर्भरणदेखील काळाची गरज आहे. त्यामुळे भूजल पातळी वाढेल. ही संकल्पना नागरिकांमध्ये रूजवणे गरजेचे आहे.
स्मृतिवृक्ष लागवड मोहीम
स्मृतिवृक्ष लागवड मोहीम अंगीकारल्यास हिरवाईने नटलेली गावे पर्यटकांना खुणावतील आणि समृद्ध गाव परस्परांशी स्पर्धा करत सारा परिसर हिरवागार होऊन प्राणी, पक्षी यांना आश्रय मिळून सृष्टीचे गतवैभव प्राप्त होऊन विविधरंगी पक्षी आनंदाचे गाणे गाऊन ‘किलबिल किलबिल पक्षी बोलती’ म्हणत पहाटगीत श्रवण करत खेड्यातील नागरिक शिवार फेरी करतील. संत श्री तुकाराम महाराज यांच्या ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ या अभंगाच्या एका ओळीत माणूस-निसर्ग आणि संपूर्ण सृष्टीचे नाते सामावले आहे. यात मानवी अस्तित्वाचे सार आहे. कारण, झाडे फक्त सावली देत नाहीत; तर ती मानवाच्या जगण्याला अर्थ देतात, श्वास देतात आणि संस्कृती घडवतात.
वृक्ष संस्कृती मोलाची
भारतीय संस्कृती झाडांच्या सावलीत वाढली आणि निसर्गाशी तिचे नाते आजही जिवंत आहे. आपले ऋषि-मुनी त्यांच्या आश्रमात वड, पिंपळ, निंब, अशोक या वृक्षांच्या छायेत बसून वेद-उपनिषदांचे चिंतन करत असत. झाडे म्हणजे ज्ञान, संयम आणि समाधीचे प्रतीक आहेत. याची अनेक उदाहरणे आपल्या संस्कृतीत आहेत. गौतम बुद्धांना पिंपळाच्या झाडाखाली ज्ञानप्राप्ती झाली आणि तो ‘बोधी वृक्ष’ म्हणून पूजला जाऊ लागला. भगवान महावीरांनी साल या क्षाखाली ध्यानधारणा केली.
भगवान शिवाच्या पूजेत बिल्वपत्र अर्थात बेलाच्या पानाचे स्थान अनन्यसाधारण आहे. भगवान विष्णू हे वटवृक्षाच्या रुपात विश्वपालन करतात. भगवान श्रीकृष्णाने वृंदावनात कदंब वृक्षाखाली बासरी वाजवून निसर्गाशी एकरूप होण्याचे तत्त्व शिकवले.
रामायणात सीतेचे आश्रयस्थान ‘अशोकवन’ म्हणून वर्णिले गेले आहे. ‘अशोक’ म्हणजे दुःखाचा अभाव. या नावातूनही आपल्या पूर्वजांनी वृक्षांना दिलेल्या शांतता, आशा आणि मुक्तीच्या प्रतीकात्मक अर्थाची जाणीव उमटते. यासोबतच झाडे ही पूजा, औषध आणि जीवनाचे प्रतीक आहेत. आपल्या घराघरात तुळशीचे रोप लावले जाते. तुळस ही केवळ वनस्पती नाही; ती देवीचे रूप मानली जाते. वटसावित्रीला महिला वडाची पूजा करतात. तुळशीविवाह निसर्गाशी पवित्र नाते जोडतो. वारकरी पंढरपूरच्या दिंड्यांमधून निसर्गाच्या सान्निध्यात चालतात. यात वड, पिंपळ, आंबा, बाभळीच्या सावलीत त्यांचा वारसा जपला जातो. सर्व संतपरंपरेत झाडे प्रेम, संयम आणि सहजीवनाचे प्रतीक राहिली आहेत. त्यामुळे आपल्या संस्कृतीत झाडांना केवळ पर्यावरणाचा नव्हे; तर अध्यात्म, श्रद्धा आणि प्रतीकांचा मान दिला गेला आहे.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.